अमरावती – बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने गीताजयंती निमित्त आयोजित शौर्य यात्रा व धर्मसभेला कालीपुत्र कालीचरण महाराज संबोधित करणार आहेत. २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता स्थानिक राजपुत पुरा येथे या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. विश्व महावीर ट्रस्ट चे संस्थापक जैन मुनी निलेशचंद्र महाराज यांची सुद्धा या निमित्ताने प्रमुख उपस्थिती असणार आहे.
या शौर्य यात्रा व धर्मसभेला बजरंग दल विदर्भ प्रांत संयोजक ऍड.अमोल अंधारे,सहसंयोजक नवीन जैन,विशाल पुंज,संतोषसिंह गहरवार,बंटी पारवानी,रुपेश राऊत, योगेश मोरघडे,विजय वडनेरकर,आशुतोष भिताडे,अभय वाजपेयी,दिनेश सिंग, चेतन वाटणकर,त्रिदेव डेंडवाल आदी विहिप व बजरंग दल पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
मध्यप्रदेशातील भोजपुर येथे एका मंदिरात शिवतांडव स्रोत गायनाचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात असणारे कालीपुत्र कालीचरण महाराज यांची सध्या सर्वत्र चर्चा आहे. आपल्या बयाणबाजी मुळे देखील ते सदैव चर्चेत असतात. बजरंग दल व विश्व हिंदू परिषदेच्या वतीने आयोजित शौर्य यात्रा व धर्मसभेला आपले ज्वलंत व प्रखर विचार मांडण्यासाठी त्यांना आमंत्रित करण्यात आले आहे.
२५ डिसेंबर ला सायंकाळी ५ वाजता संत काशिनाथ महाराज यांच्या देवस्थानापासून शौर्य यात्रेला प्रारंभ होणार असून राजपूत पुरा,कामठा, माळी पुरा,कुंभार पुरा, रंधवे पुरा, संगमेश्वर नगर, बारी पुरा, बाजार चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक तेथून राजपूत पुरा येथील कार्यक्रमस्थळी ही यात्रा समाप्त होईल. याठिकाणी महाआरती झाल्यानंतर धर्मसभेला प्रारंभ होईल. कार्यक्रमस्थळी सुरक्षेच्या दृष्टीने संपूर्ण व्यवस्था करण्यात आली असून पोलीस प्रशासन देखील सज्ज असणार आहे. या धर्मसभेला नागरिकांनी आवर्जून उपस्थित राहण्याचे आवाहन बजरंग दल विभाग संयोजक संतोषसिंह गहरवार यांनी केले आहे.