सातारा – जिल्ह्यातील ३१९ पैकी ४९ गावांमध्ये बिनविरोधचा डंका वाजला होता. आता २४२ ग्रामपंचायतीसाठी रविवारी (दि. १८) मतदान होणार आहे. जिल्हा प्रशासनाच्यावतीने निवडणुकीची तयारी करण्यात आली असून प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. मतदान केंद्रांवर कुठलाही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. जिल्ह्यात ३१९ ग्रामपंचायतींच्या थेट सरपंच निवडी व सदस्य निवडीची प्रक्रिया जाहीर झाली होती. अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी ४९ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या. उर्वरित २४२ सरपंचपदांसाठी ६५५ जण रिंगणात आहेत. तर १८१२ जागांसाठी ३८९७ जण रिंगणात आहेत. ८ ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदासाठी एकही अर्ज प्राप्त झाला नव्हता. अर्ज माघारीनंतर निवडणुकांचे चित्र स्पष्ट झाले होते. सातारा तालुक्यात ३९ ग्रामपंचायतींपैकी दहा गावे बिनविरोध झाली असून एकूण बारा सरपंच बिनविरोध निवडून आले आहेत. २६ सरपंचपदांसाठी ६८ तर २०४ सदस्य पदांसाठी ४४७ जण रिंगणात आहेत. एका गावात सरपंचपदासाठी एकही अर्ज दाखल झाला नाही. कराड तालुक्यात ४४ पैकी ७ ग्रामपंचायती पूर्ण, तर चार अंशत: बिनविरोध झाल्या आहेत.
चार ठिकाणी सरपंचपदाचा एकही अर्ज आला नाही. सरपंचपदाच्या २९ जागांसाठी ९०, तर २६७ सदस्य पदाच्या जागांसाठी ५१५ जण रिंगणात आहेत. पाटणमध्ये ८६ पैकी ११ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. ६५ गावांमध्ये निवडणुका होत आहेत. बिनविरोध सरपंच २० ठिकणी निवडून आले आहेत. त्यामुळे ६५ सरपंचपदासाठी १६१ जण, तर ४२६ सदस्यपदांसाठी ८८२ जण मैदानात उतरले आहेत. कोरेगावात ५१ पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या, तर एक अंशत: बिनविरोध झाली. ४१गावांमध्ये सरपंचपदासाठी १०० जण, तर २८७ सदस्य पदांसाठी ६०८ जण रिंगणात आहेत. वाईमध्ये सातपैकी एका ग्रामपंचायतीत सरपंचपदाची निवडणूक बिनविरोध झाली.
उर्वरित सहा सरपंचपदासाठी १९ तर ६६ सदस्यपदांसाठी १३३ जण मैदानात आहेत. खंडाळा तालुक्यात दोन ग्रामपंचायती असून सरपंचपदासाठी १३, तर सदस्यपदांच्या २६ जागांसाठी ८६ जण रिंगणात आहेत. महाबळेश्वरमध्ये सहा ग्रामपंचायतींपैकी तीन ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या तर ३८ ठिकाणी ग्रामपंचायत सदस्य बिनविरोध निवडून आले. आता तीन सरपंचपदांसाठी सहाजण, तर चार सदस्यपदासाठी आठ जण रिंगणात आहेत. जावळीत १५ पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित ११ ग्रामपंचायतींत सरपंचपदासाठी २५, तर सदस्यपदासाठी ९० उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत.
फलटणमध्ये २४ पैकी चार ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या असून उर्वरित २० ठिकाणी सरपंचपदासाठी ६९ जण, तर १८८ सदस्यपदासाठी ४१८ जण मैदानात उतरले आहेत. माण तालुक्यात ३० पैकी २ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. तर २७ गावांत सरपंचपदासाठी ७२, तर २१३ सदस्यपदांसाठी ४५८ जण रिंगणात आहेत. खटावमध्ये १५ पैकी दोन पूर्णत: तर एक ग्रामपंचायत अंशत: बिनविरोध झाली. आता १२ सरपंच पदासाठी ३२ जण, तर ८६ सदस्य पदांसाठी १७२ जण रिंगणात आहेत. दरम्यान, ग्रामपंचायत निवडणूक प्रचारात आरोप- प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाल्याने जिल्ह्यात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रविवारी मतदान प्रक्रिया होत असून ही प्रक्रिया शांततेत होण्यासाठी पोलीस यंत्रणा सतर्क आहे.