मनोरंजन

पूजाचा पहिला डान्स रंगला, म्युझिक शिवाय

त्या एका संधीने घडवलं पूजाचं आयुष्य

By : अनुराधा कदम

संधी एकदाच दार ठोठावते असं म्हटलं जातं आणि ते खरंही आहे. माणसाच्या आयुष्यामध्ये त्याला यशाची कवाडे खुली करणारी संधी कधी आणि कुठे चालून येईल हे काही सांगता येत नाही. मात्र त्या संधीचं सोनं कसं करायचं हे मात्र त्याच्या हातात असते.

अशा संधीच्या शोधात प्रत्येकजण असतो. अभिनेत्री पूजा सावंतला देखील एक अशीच संधी आली. खरेतर त्या संधीला तिला नकार द्यायचा होता पण माणसाच्या नशिबात असते ते कोणी हिरावून घेऊ शकत नाही या उक्तीचा प्रत्यय पूजाला आला आणि त्या एका संधीने पूजाचे आयुष्य बदलून टाकलं. बेस्ट डान्सर या शो च्या परीक्षकाच्या खुर्चीवर मला त्याच संधीने स्थान दिलं आहे असं सांगताना पूजाने तिच्या आयुष्यातील ती संधी कोणती होती ही गोष्ट तिच्या शेअर केली आहे.


मराठी सिनेमा , मालिका, वेगवेगळ्या शोध मधील एक आकर्षक चेहरा आणि कमालीचे टॅलेंट अशी ओळख असलेली पूजा सावंतने बेस्ट डान्सर मधील नव्या दमाच्या डान्सर्सचे परीक्षण केले आहे. या शोची टॅगलाईन देखील अशीच होती की संधी दवडू नका. याच निमित्ताने पूजाने तिच्या आयुष्यातील पहिली संधी आणि त्या संधीच्या निमित्ताने तिला एक नृत्यांगना म्हणून मिळालेली ओळख तिच्या आयुष्यात किती महत्त्वाची आहे हे तिने सांगितलं.


पूजाच्या शब्दात सांगायचं झालं तर, खरेतर तिला त्या दिवशी ऑडिशनला जायचंच नव्हतं. तिला तिचं शिक्षण पूर्ण करायचं होतं. आधी हातामध्ये पदवी घ्यायची होती आणि मगच एक प्रोफेशनल डान्सर म्हणून या क्षेत्रामध्ये यायचं होतं. परंतु तिच्या आईला तिने डान्सर म्हणून करिअर करावं असं मनापासून वाटत होतं.

कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असताना एक डान्स ऑडीशनची जाहिरात आईच्या वाचनात आली. आईच्या आग्रहाखातर तिने त्या ऑडिशनला जाण्याचा निर्णय घेतला. पूजा ऑडिशनच्या ठिकाणी पोहोचली.

त्यानंतर काही वेळाने पूजा सावंत असं नाव पुकारल्यानंतर पूजा तिचा डान्स परफॉर्मन्स करण्यासाठी स्टेजवर गेली. काही स्टेप केल्या असतील तोपर्यंत लाईट गेल्यामुळे म्युझिक बंद झालं.

तिच्या समोर बसलेल्या परीक्षकांनी तिला विचारलं की लाईट नसल्यामुळे म्युझिक लागणार नाही, मग तू काय करणार? तुझा डान्स परफॉर्मन्स थोड्यावेळाने देणार का?

खरं तर ऑडीशनला जायचे हे पूजाच्या मनातच नव्हतं. त्यामुळे मी नंतर ऑडिशन देईन किंवा देणारच नाही असं पूजा परीक्षकाना उत्तर देईल अशी शंका समोर बसलेल्या तिच्या आईच्या मनात आली. पूजाने क्षणभर विचार केला आणि तिने ती म्युसिक विना डान्स ऑडीशन दिली.


पूजा सांगते , मला आजही त्या गोष्टीचं कारण कळले नाही. मी त्या परीक्षकांना असे म्हणू शकले असते की मी थोड्या वेळाने ही ऑडिशन देते. लाईट आल्यानंतर पुन्हा म्युझिक ठेक्यावर मी माझा डान्स परफॉर्मन्स देते. परंतु मला असं वाटलं की ती सुरुवात आहे.

कारण ही माझ्या आयुष्यातील पहिली ऑडिशन होती. आणि ही सुरुवात मला पुन्हा मिळणार नाही. ही एनर्जी मला पुन्हा कदाचित मिळणार नाही. म्हणून माझ्याकडून नकळत परीक्षकांना सांगितलं गेलं की, काही हरकत नाही. या गाण्यावर मी जो डान्स करणार आहे ते गाणं माझ्या मनात आहे.

ते गाणं गुणगुणत मी डान्स करते. परिक्षकांनी संमती दिली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माझ्या आयुष्यातील पहिली ऑडिशन मी विदाऊट म्युझिक सादर केली.

माझी निवड झाली. पुढे मला डान्स करण्याची संधी मिळाली. आज मी अभिनेत्री म्हणून जरी नावारूपाला आले असले तरी माझ्या आयुष्यातील पहिली ऑडिशन विनाम्युझिक डान्स अशी दिली असल्यामुळे माझे डान्सवर विशेष प्रेम आहे.

मला डान्स करायला खूप आवडतं. त्या दिवशी जर मी ऑडिशनला गेले नसते किंवा लाईट गेल्याचे निमित्त करून परफॉर्मन्स देणार नाही असं सांगितलं असतं तर कदाचित मी आज इथपर्यंतचा प्रवास करू शकले नसते.

म्हणूनच मला असं वाटतं की माणसाच्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या रूपांमध्ये, वेगळ्या वळणावर एक संधी वाट बघत असते मात्र कुठल्याही कारणास्तव तुम्ही ती संधी सोडू नका. त्यादिवशी ती संधी मी सोडली असती तर आज मी माझं डान्सचे स्वप्न पूर्ण करू शकले नसते.


पूजा सावंतने सिनेमा आणि डान्स शोमध्ये काम केले आहे. दगडी चाळ या सिनेमातील तिची भूमिका विशेष गाजली होती.

तर जंगली या हिंदी सिनेमात ती महिला माहूतच्या भूमिकेत पडद्यावर दिसली होती. भेटली ती पुन्हा या सिनेमात वैभव तत्ववादी सोबत तिची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली होती. नीलकंठ मास्तर या सिनेमातील अधीर मन झाले…

मधुर घन आले या गाण्यावरील पुजाच्या नृत्याने कमाल केली आहे.


मध्यंतरी एक डान्स शो करत असताना अचानक स्टेज कोसळल्याची घटना घडली होती. त्यावेळी पूजा त्या अपघातातून बचावली होती. तो प्रसंग देखील तिने तिच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर केला होता तसेच त्या वेळेचा अनुभव देखील तिने प्रेक्षकांना सांगितला होता.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment