महाराष्ट्र महिला

प्रिया बनली ६५ कोरोनाग्रस्त मृतदेहांची सारथी, जागतिक महिला दिन विशेष

जागतिक महिला दिन विशेष

प्रिया बनली ६५ कोरोनाग्रस्त मृतदेहांची सारथी

कोरोना योध्दा म्हणून मिळवली शाब्बासकी

कोरोना साथीच्या काळात कोल्हापूरकरांनी आपला नेहमीचा ” करायला लागतंय भावा” हा बाणा पूरेपूर कोल्हापूरी पध्दतीनं दाखवून दिला. सतत दिड वर्ष तरुण , प्रौढ , युवक , युवती कार्यकर्ते कोविडग्रस्तांसाठी झटत होते.हे सारेच प्रशासनाच्या खांद्याला खांदा लावून मदतकार्य करत होते.यातलंच एक नाव म्हणजे प्रिया प्रकाश पाटील.

१९-२० वर्षांची प्रिया , तुमच्या आमच्या घरातील सर्वसामान्य मुलींसारखीच एक साधी मुलगी. विवेकानंद कॉलेजात एफ्. वाय्. सायन्सच्या वर्गात शिकणारी. कोरोना निर्बंध जारी झाले. कॉलेजला जायचा प्रश्नच नाही. लेक्चर्स ऑनलाईन सुरू झाली होती.हाताशी भरपूर वेळ होता.

तो सत्कामी लावायचा होता.पण काय आणि कसं करावं ते समजत नव्हतं.तिनं वर्तमानपत्रात कोरोना योद्धा हर्षल सुर्वे यांच्याविषयी वाचलं.महानगरपालिका प्रशासनाच्या माध्यमातून तिनं हर्षल सुर्वे यांच्याशी संपर्क साधला.

समाजासाठी अशा भीषण परिस्थितीत काहीतरी करण्याची तिची तळमळ सुर्वे यांना जाणवली. त्यांनाही स्वयंसेवकांची गरज होतीच.

त्यांनी तिला आपल्या टिममध्ये सामावून घेतलं.हर्षल सुर्वे भवानी फाऊंडेशनचे अध्यक्ष.कोरोनामुळे बळी पडलेल्या रुग्णांचे मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवण्याचं काम त्यांनी चैतन्य अष्टेकर , प्रदीप हांडे ( सातार्डे – पन्हाळा ) , राकेश सावंत ( फुलेवाडी) यांच्या सहाय्याने सुरू केलेलं. तो कोरोना काळ आठवला तरी काळजात धडकी भरते अजूनही.कोविड मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवण्यासाठी मृतांचे नातेवाईक , मित्रांचे फोन येत.

कोरोना संसर्गाच्या भीतीनं अंत्ययात्रेलसाठी चार खांदे जमायची सुध्दा पंचाईत होऊन बसलेली. अशावेळी विशीच्या उंबरठ्यावरील प्रियाने शववाहिकेचे स्टेअरिंग हाती घेतलं .एका दिवशी तर ४५ मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवण्यात आले.

कोल्हापुरातील मृतांची संख्या दिवसेंदिवस वाढतच होती.देशातला सर्वाधिक मृत्यूवर अशी चिंताजनक परिस्थिती ओढवली होती.१५- २० मिनिटाला एक मृतदेह हजर असा प्रसंग ओढवला. मृतदेहांची गर्दी एवढी, की तशा परिस्थितीत थक्क व्हावं.

अंत्यसंस्कारांसाठी चक्क वेटींगला थांबावं लागतं होतं. रक्षाविसर्जनासाठी थांबणं काही शक्य नव्हतं. डाग दिल्यानंतर ५ तासात रक्षाविसर्जन करण्याची वेळ कधी नव्हे ती आली होती. शववाहिका आणि स्मशानभूमीतील महानगरपालिका कर्मचारी यांची अक्षरशः ओढाताण होत होती . यमदेवानंच ओव्हरटाईम काम सुरु केलं होतं जणू .

अशा परिस्थितीमध्ये हर्षल सुर्वे व त्यांची टीम या अवघड कामाला भिडली.मनपा प्रशासनाची परवानगी घेऊन मनपाच्या शववाहिकेतून ते मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवू लागले. या सगळ्या धुमश्चक्रीत प्रियासुध्दा सहभागी झाली. सकाळी ८ ते रात्री ९ पर्यंतचा वेळ तिनं या कामासाठी समर्पित केला.


एकीकडे अनेक जण घरी बसून होते , त्याचवेळी प्रिया ही एक कॉलेज विद्यार्थिनी अग्नी देण्यासाठी मृतदेह स्मशान भूमीत पोहोचवत होती .

सकाळी उठली की प्रिया सीपीआर् च्या दिशेनं जायची . मृतदेह उचलून शववाहिकेत ठेवणं , स्मशानभूमीत चिता रचायला कर्मचाऱ्यांना मदत करणं ,या कुठल्याच कामात तिनं हयगय केली नाही. सकाळी ८ ते रात्री ९ वाजेपर्यंत तिचं हेच व्रत होतं .

गाडीचा पेट्रोल खर्च पदरमोड करून ही मंडळी भागवत होती.काही दानशूर मंडळी स्वयंस्फूर्तीने अर्थसहाय्य करत होती.सी. पी.आर.आर्. हॉस्पिटल कडून पी.पी.ई. कीटस् पुरवले जात होते.पहिल्या व दुसऱ्या कोरोना लाटेत या मंडळींनी जीवाची पर्वा न करता काम केलं.

३० दिवसात २३९ मृतदेह स्मशानभूमीत पोहोचवण्याचं काम केलं. एवढ्यावर ते थांबले नाहीत. काही मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुध्दा या चमूनं केले. या काळात कधी भीतीपोटी , कधी नाईलाजाने कुणाकुणाला अंत्यसंस्कार करण्यासाठी वेळेवर पोहोचता आलं नाही , अशा मृतदेहांना भाऊ , बाप , मुलगा बनून यांनी अग्नीही दिला .

जाधववाडीत रहाणाऱ्या प्रियाच्या वडिलांना स्वतःला समाजसेवेची आवड. ते शिरोली एम्. आय. डी. सी. मध्ये काम करतात.आई इन्शुरन्स एजंट आहे. या कामासाठी घरच्यांनी नुसती परवानगी नाही , तर प्रोत्साहनच दिलं प्रियाला. १५ दिवसात ६५ मृतदेह पोहोचलवले पठ्ठीनं.

पहिल्याच दिवशी हर्षल सुर्वे यांनी मृतदेह उचलायला लावून तिची कसोटीच बघितली एकप्रकारे जणू. ड्रायव्हिंग लायसन्स आणि गाडी चालवण्याची
सफाई यापेक्षा मनाची धिटाई महत्वाची होती. प्रिया त्या कसोटीला पुरेपूर उतरली. एका दिवशी तब्बल १६ मृतदेह पोचवले तिनं अखेरच्या प्रवासाला. . तिच्या या कामाबद्दल तिचं सगळीकडे कौतुक झालं , सत्कार झाले , कॉलेजनंही सत्कार केला .

त्यानं ती भारावून गेली. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी “आम्हाला तुझा अभिमान वाटतो” असं म्हणून पाठ थोपटली , तेव्हा मुठभर मांस तिच्या अंगावर चढलं. कितीही अभिमानास्पद म्हटलं, की तरी त्या दिवसातल्या आठवणी नकोशा वाटतात तिला.

एक आठवण तर कायमची स्मरणात राहिलशी.सी.पी.आर्. मधून डॉ. व्यंकटेश पवार यांचा फोन आला, म्हणून ती एका महिलेचा मृतदेह ताब्यात घेण्यासाठी गेली.

सौ.आशा हामरे यांचा मृतदेह घेतला आणि निघणार तोच पुन्हा फोन‌ वाजला. डॉ.तेजस्विनी यांचा फोन होता तो .त्या म्हणाल्या ,” जरा थांबा , हिरे यांची मूकबधीर मुलगी येऊन पोहोचली आहे.” ती मुलगी आपल्या आईच्या पार्थिवाजवळ आली , ही माझी आई आहे असं खाणाखुणा करत सांगू लागली आणि तिनं गायीसारखा हंबरडा फोडला.

एवढे मृतदेह पोहोचवले होते तोवर , अंत्यसंस्कार करण्यात मदत केली , पण पापणी काही ओली होऊ दिली नव्हती कुणी.

मात्र या महिलेचा शोकावेग पाहून सर्वांचेच डोळे ओले झाले. कुठल्या शब्दात त्या आईविना भिकारी झालेल्या लेकीचं सांत्वन करता येणार होतं ? तिला बोलायला येत नव्हतं आणि यांचे शब्द मूके झाले होते. कारण ते तिच्यापर्यंत पोहोचू शकणार नव्हते.तिथल्या एका कुटुंबाकडून साडी मागून घेतली .


अंत्यविधी झाले. पण त्या मुलीचं काय करायचं ? प्रशांत मालंडकर , पद्मा मालंडकर , रणजित देव यांच्या बहुमोल मदतीमुळे त्या मुलीचे वडील अशोक व भाऊ उमेश हामरेंशी संपर्क झाला व ते येऊन या मुलीला घेऊन देवरुखला परतले.म्हणजे केवळ मृतदेहाला स्मशानभूमीत पोचवून हर्षल सुर्वे , प्रिया पाटील थांबले नाहीत, तर तिच्या शोकाकुल मुलीचीही त्या आपत्काळात सोय लावण्यासाठी धडपड केली. ती माय हरपलेली मुलगी अजून प्रियाच्या नजरेसमोर आहे आणि तिचा हंबरडा आजही विसरता येत नाही.

आता कोरोना काळातले निर्बंध शिथिल झाले आहेत. प्रियाचं कॉलेज व अभ्यासाचं रुटीन सुरू झालं आहे. त्याशिवाय ती इन्शुरन्सचं काम करते. योगशिक्षिका म्हणून योगवर्ग घेते , तेसुद्धा नियमित सुरू झाले आहेत. तिचा एकमेव विरंगुळा म्हणजे लाडक्या श्वानाशी खेळणं.ते रोजच चालतं.

रशिया युक्रेनच्या युध्दाच्या निमित्ताने ( आपणा भारतीयांच्या नेहमीच्या स्वभावधर्मानुसार ) नागरिकांची कर्तव्ये , सरकारची जबाबदारी , राष्ट्रीयता इ.चर्चा सगळ्या माध्यमांतून झडायला लागल्या आहेत. पण आपण स्वतः मात्र अंगावर ओरखडा येणार नाही याची खबरदारी घेत सुरक्षितपणे घराच्या चार भिंतींमध्ये बसलो आहोत.

पॅन्डॅमिक , महापूर , बॉम्बहल्ले , जातीय दंगली अशा आणीबाणी सदृश परिस्थितींमध्येच त्या त्या गावांच्या , शहराच्या , प्रदेशाच्या नागरिकांच्या राष्ट्रीयतेची आणि माणुसकीची खरी कसोटी लागत असते , असं मला वाटतं. आपण सारे नाही, तरी हाताच्या बोटावर मोजण्याएवढी आपल्यातलीच काही माणसं तरी या कसोटीला उतरली आहेत.

हेच युवक आणि युवती उद्याच्या भारताचे तारणहार आहेत, “काही थोडी चांगली – प्रामाणिक- सज्जन माणसं अद्याप जगातआहेत , म्हणून जग अजून चाललं आहे,” असं म्हणायची पूर्वीची वडीलधारी माणसं . त्याच धर्तीवर , ही तन – मन-धनाचा, जातीधर्मांचा आणि विचार न करता झोकून देऊन काम करणारी माणसं आहेत, म्हणून आपण निवांत आहोत आपापल्या घरी , असं म्हणावंसं वाटतं.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment