पुणे – मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी कर्नल पुरोहितांवर आधारीत पुस्तक ‘लेफ्टनंट कर्नल पुरोहित द मॅन बेट्रेड’ १८ डिसेंबरला प्रकाशित होत आहे. मात्र आता या पुस्तकाच्या प्रकाशनाआधीच नवा वाद ओढवला आहे. १८ डिसेंबर २०२२ रोजी सायंकाळी ४ वाजता पुण्यातील एसपी महाविद्यालयात या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम होणार आहे. याला आता मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणातील पीडित वकील शाहिद नदीम यांनी विरोध केला असून या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी केली आहे. सोशल मीडियावर या पुस्तकाचे पोस्टर व्हायरल झाल्यानंतर या वादाला सुरवात झाली आहे.
जयंत उमरानीकर, सत्यपाल सिंह आणि संजय बर्वे यांच्या हस्ते हे प्रकाशन होणार आहे. तर, कार्यक्रमाचं संचालन मेजर गौरव आर्य करणार आहेत. स्मिता मिश्रा लिखित ‘लेफ्टिनेंट कर्नल पुरोहित: द मैन बेट्रेयड?’ या पुस्तकाचं प्रकाशन वितस्ता पब्लिशिंग रेणू कौल वर्मा यांनी केलं आहे. मात्र आता पुण्यातील पुरोगामी संघटनांनी या पुस्तकाच्या प्रकाशनाला विरोध करत एसपी महाविद्यालयाच्या प्राचार्यांना एक पत्र लिहून आपल्या कॉलेजमध्ये हा प्रकाशन सोहळा होऊ देऊ नका अशी विनंती केली आहे.
भीमआर्मी बहुजन एकता मिशनचे अध्यक्ष दत्ता पोळ आणि मुस्लिम मूलनिवासी मंचचे अध्यक्ष अंजुम इनामदार यांनी हे पत्र लिहले आहे. ‘हे प्रकरण मुंबईतील NIA न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि एसपी कॉलेजमध्ये पुस्तक लाँच करणे अजिबात उचित नाही. ज्याचा शैक्षणिक उपक्रमांशी काहीही संबंध नाही अशा उपक्रमांसाठी कोणालाही महाविद्यालयाच्या परिसराचा वापर करू देऊ नका. अशा परिस्थितीत, महाविद्यालयाच्या व्यापक हितासाठी पुस्तक प्रकाशनाची परवानगी त्वरित मागे घ्यावी. तरी दिलेली परवानगी त्वरित रद्द करावी आपणास विनंती करण्यात येत आहे’ असं या पत्रात म्हंटले आहे.