Uncategorized

‘श्रमिक सहयोग’ संचलित प्रयोगभूमी उत्सवात संदीपच्या गोष्टींचे प्रकाशन

‘श्रमिक सहयोग’ संचलित प्रयोगभूमीचा वार्षिक मेळावा, ‘प्रयोगभूमी उत्सव’ दिनांक १२, १३ मार्च रोजी चिपळूण तालुक्यातील कोळकेवाडी येथील कॅम्पसमध्ये उत्साहात साजरा झाला. प्रयोगभूमीत शिकणाऱ्या संदीप निकम, वय वर्षे १० याने कथन केलेल्या गोष्टींचे ‘संदीपच्या गोष्टी’ या पुस्तकाचे प्रकाशन हे या कार्यक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य होते. दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर संपन्न झालेल्या या मेळाव्यात अनेक प्रयोगभूमी साथी सहभागी झाले होते.

 माध्यमतज्ञ युवराज मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली या प्रयोगभूमी उत्सवाचे उदघाटन करण्यात आले. यावेळी मंचावर श्रीमती नीला पेंडसे, श्रमिक सहयोगचे अध्यक्ष प्रमोद जाधव, उपाध्यक्ष भार्गव पवार, विश्वस्त दादासाहेब रोंगे, कोषाध्यक्ष प्रकाश सरस्वती गणपत इ. उपस्थित होते.

यावेळी प्रयोगभूमी आणि ‘वाडी शिक्षण केंद्रा’च्या कामाचा आढावा घेऊन, सहभागी असलेले कार्यकर्ते, विद्यार्थी यांनी आपले अनुभव मांडले. 
दुपारी ‘संदीपच्या गप्पा’ या पुस्तकाचे प्रकाशन जैष्ठ लेखक, अभ्यासक, निवृत्त प्राचार्य राजाराम आबा कुंभार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी साहित्यातील अभ्यासक, लेखक अरुण काकडे,  विचारवंत आणि कार्यकर्त्या डॉ. लता प्रतिभा मधुकर, माध्यमतज्ञ युवराज मोहिते इ. मान्यवर मंचावर उपस्थित होते.

सुरुवातीस पुस्तकाचे भाषांतरकार राजन इंदुलकर यांनी प्रास्ताविक केले. १० वर्षाचा संदीप इथे आला तेव्हा तो पाच वर्षांचा होता. त्यानंतर वर्षभराने तो स्वतःच्या भाषेत बोलू लागला, गोष्टी सांगू लागला. त्यांने रचलेल्या १३ गोष्टी या पुस्तकात समाविष्ट करण्यात आल्या असून स्वतःला आलेले अनुभव आणि त्या अनुभवांच्या भोवती मनात तत्काळ सुचलेल्या असंख्य कल्पना यांची अत्यंत खुबीने सांगड घालून त्याने या गोष्टी रचलेल्या आहेत.

त्याला अशा रीतीने बोलते करणाऱ्या शिक्षिका रेखा मोहिते यांचे देखील या निर्मितीत मोठे योगदान आहे असे त्यांनी यावेळी मांडले.  पुस्तकाविषयी आपले मत मांडताना युवराज मोहिते यांनी संदीपची तुलना ‘हैरी पॉटर’शी केली. “संदीपच्या या गोष्टी म्हणजे बालवयातील कल्पनाविष्काराची जबरदस्त भरारी आहे. म्हणूनच संदीप हा आपला हैरी पॉटर आहे” असे त्यांनी यावेळी मांडले. हे पुस्तक सर्व दूर पोहोचणे गरजेचे असून त्याचे प्रकाशन मुंबई-पुण्यात देखील व्हावे अशी अत्यंत महत्वाची सूचना त्यांनी यावेळी केली.

  त्यानंतर या गोष्टींचे शब्दांकन करणाऱ्या शिक्षिका रेखा मोहिते यांनी उपस्थितांसमोर संदीपला बोलते केले. संदीपने त्यांना प्रतिसाद देत, त्याची रिमोटची गाडी ही कथा नव्याने गुंफून अत्यंत सहजपणाने सादर केली. 
संध्याकाळी मुलांच्या खो-खो, कबड्डी, नेमबाजी, लांब उडी  या मैदानी खेळांचे अंतिम सामने पार पडले. मैदानी खेळानंतर सामुहिक नृत्ये झाली.

कलरी, बांडगी, गजा, जाखडी, गोंडी इ. विविध पारंपारिक नृत्यांमध्ये सर्व लहान-थोर व्यक्तींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. रात्री शास्त्रीय व पारंपारिक गीतांचा मेळ घालणारी ‘संगीत रजनी’ संपन्न झाली. भूप, भीमपलास या रागांसह, अभंग, लोकगीते,  कोळीगीते, प्रार्थनागीते, भावगीते ई. संगीताची विविध रूपे बाल आणि जेष्ठ  कलाकारांनी सादर केली. हा कार्यक्रम रात्री उशीर पर्यंत चालू होता.

 दुसऱ्या दिवशी सकाळी जंगल फेरी आयोजित करण्यात आली होती. प्रयोगभूमी लगतच सह्याद्री पर्वताच्या उंच रांगेवर ही फेरी नेण्यात आली. या फेरीत प्रा. राम साळवी यांनी तसेच मुलांनीही  सभोवतालच्या नैसर्गिक घटकांचा परिचय करून दिला. यानंतरच्या सत्रात मुलांच्या तीन गटांनी पथनाट्याद्वारे आपल्या समाजात जाणवणाऱ्या समस्यांची मांडणी केली. मोबाईल वेड, व्यसनाधीनता, आत्महत्या या विषयांचा या सादरीकरणात समावेश होता.

मुलांच्या या पथनाट्य सादरीकरणावर सुहास शिगम आणि डॉ. लता प्र. म. यांनी आपली निरीक्षणे  मांडली. त्यांच्या नाट्य आणि खेळातील गुणवत्ताविषयी बोलताना डॉ. लता प्र. म. यांनी, यातूनच भविष्यातील कलावंत आणि खेळाडू घडणार आहेत. मात्र त्यासाठी त्यांना योग्य मार्गदर्शन मिळणे गरजेचे आहे असे म्हटले.

  शेवटी सुप्रसिद्ध चित्रकार प्रकाश राजेशिर्के, डॉ. जी. बी. राजे, सुषमा इंदुलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रयोगभूमी उत्सवाची सांगता झाली. या कार्यक्रमाच्या तयारी व आयोजनात युवा कार्यकर्त्यांचा विशेष समावेश होता. त्यात मंगेश मोहिते, अमोल काजवे, महेश जाधव, शिल्पा रेडीज, स्नेहा बोलाडे, विठ्ठल निकम, नितेश निकम, अभिषेक तटकरी, अनिष महाडिक, चंद्रकांत जाधव, रामा निकम, सायली कदम, सुप्रिया शिगम यांचा विशेष पुढाकार होता.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment