पश्चिम महाराष्ट्र

पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम ९७.५० टक्के पूर्ण

सातारा – पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे काम ९७.५० टक्के पूर्ण झाले असून, उर्वरित काम लवकरच पूर्ण होईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात आमदारांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना दिली. पुणे-सातारा महामार्गाचे काम करारानुसार ३० मार्च २०१३ रोजी पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, जमीन हस्तांतरित करण्यास विलंब, अतिरिक्त सुविधांसाठी जनतेची वारंवार मागणी, महामार्गाच्या हद्दीतील अतिक्रमणे काढणे, कोरोनाचा काळ आदी कारणांमुळे महामार्गाचे काम पूर्ण होण्यास विलंब झाल्याची माहिती चव्हाण यांनी दिली.

सद्य:स्थितीत महामार्ग सुस्थितीत असून, वेळोवेळी देखभाल दुरुस्ती केली जात आहे. पुणे-सातारा महामार्गाचे बहुतांश काम ३० एप्रिल २०२२ पर्यंत पूर्ण झाले. ९७.५० टक्के काम पूर्ण झाले असून, किकवी (ता. भोर), शिवरे व खेड शिवापूर येथे स्थानिकांनी कामास विरोध केला व त्यांनी पूर्ण नियोजित पादचारी भुयारी मार्ग, पादचारी उड्डाणपुलाऐवजी तेथे वाहन भुयारी मार्गाची मागणी केली. त्यानुसार सुधारित अहवाल मान्यतेसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे पाठविण्यात आला आहे. या कामास मंजुरी मिळाल्यानंतर प्रलंबित कामे सुरू करण्यात येणार असल्याचे चव्हाण यांनी सांगितले.

करारातील तरतुदींनुसार कामाच्या गुणवत्तेचे परीक्षण स्वतंत्र अभियंत्यांद्वारे प्रमाणित केले जाते. रस्त्यावरील सर्व खड्डे भरण्यात आले असून, प्रगतीतील उड्डाणपुलाची कामे पूर्ण झालेली आहेत. मागील सहा महिन्यांत झालेले अपघात हे वाहनांचा वेग जास्त, वाहनांच्या तांत्रिक बिघाडामुळे व चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे झाल्याचे चव्हाण यांनी म्हटले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment