कोंकण महाराष्ट्र

पुरुष वेशातील नवरदेव ..लग्न वरात ओव्या, लोकगिते आणि फुगड्या

सिंधुदुर्ग – जिल्ह्यात लोककलांची परंपरा आहे त्याच परंपरेतील एक धालोत्सव. हा उत्सव अत्यंत वेगळा असून त्याची एक आगळी परंपरा आहे.

“रुकवात करतले गे सुंदरी,
धेडे बैसले बरोबरी…
अशे धेडे उतावळी,
लाडू उचलले वरचेवरी … “
जत्रोत्सवानंतर ज्या उत्सवाची महिलावर्ग आवर्जून वाट पाहत असतो तो म्हणजे धालोत्सव. पौष महिन्यात साजरा होणारा धालोत्सव हा तर स्त्रीमनाला आनंदाचे उधाण आणणारा उत्सव. समूहाने एकमेकांची काढत आनंद उपभोगण्याचा. विरंगुळ्याचा उत्सव. मोठ्या श्रद्धेने वनदेवतेपरी आदर भावना व्यक्त करण्यासाठी त्या एकत्र जमून धालोत्सव साजरा करतात.

माजगाव म्हालटकरवाडा महादेव देवघर येथील सात दिवस गजबजलेल्या धालोत्सवाची शेवटची रात्र संपन्न झाली. लोककला टिकवल्याबरोबरच त्यांच्या प्रसाराचेही कार्य नकळत करणाऱ्या या उत्सवाची गोडी महिलांच्या प्रचंड सहभागाने व्दिगुणीत होते. माजगाव म्हालटकरवाड्यातील महादेवाचे देवस्थान हे उत्सवाचे केंद्रस्थान असते. यावर्षी माजगाव म्हालटकरवाड्याचा धालोत्सव मंगळवार ३ जानेवारी रोजी सुरु झाला होता.

सात दिवस चालणाऱ्या धालोत्सवात महिलांना सात रात्री ओव्या, लोकगिते, फुगड्या असे पारंपारिक कार्यक्रम करुन नंतर सर्व महिला मांडावर एकत्र चहा-पाण्याचा कार्यक्रमात मनसोक्त एकमेकांशी संवाद साधतात. सहाव्या रात्रीचे वैशिष्ट्य म्हणजे वाड्यातील पुरुष कासाराची भुमिका करुन मांडवर जमलेल्या सर्व स्त्रियांना आंब्याच्या पानाच्या बांगड्या भरतो.

सातवी रात्र सहाही रात्रींपेक्षा वेगळी व वैशिष्ट्यपूर्ण असते. तसेच ही रात्र पूर्ण जागवली जाते. रात्री दहा वाजता कार्यक्रमाला सुरुवात होते. स्त्रियांतील दोघी पती-पत्नी वैशभूषा करतात. त्यांची वाजत गाजत वरात काढली जाते. नवरा देवघरातून सुटून लग्नासाठी वाड्यातून वरातीसह येतो व तुळशीकडे येऊन दानोशाला बसतो. तिथून तो मांडावर येतो. यावेळी फुगड्या, गाणी आदी कार्यक्रम होतात. हा सगळा कार्यक्रम सकाळी सहा वाजेपर्यंत चालू असतो. पहाटे त्यातीलच एक स्त्री पिंगुळीची भूमिका करते व सर्व घरे फिरते. त्यावेळी तिला घराघरातून पैसे दिले जातात. कार्यक्रम येथे संपतो. आठव्या दिवशी मंगळवारी सकाळी नऊ वाजता परत पांगलेली माणसे व स्त्रिया मांडावर जमतात. या दिवशी कार्यक्रमाची सांगता असल्याने गावातीलसर्व लोक या कार्यक्रमाला जमतात.

त्यावेळी नवस बोलण्याचा कार्यक्रम होतो. प्रथम नाचणाऱ्या स्त्रियांवर शिवकळा उभ्या राहतात व ज्या स्त्रिला मुल नसते ती विहीरीवर स्नान करुन पांढरी साडी नेसून ओलत्यानेच मांडावर येते. मांडावरील शेणाच्या तुळशीत शिवकळांच्या मदतीने सोबत आणलेले हळद व दुधाचे मिश्रण ओतते. त्यावेळी ओव्या म्हणतात,

“शेण कालयता… शेण कालयता…
शेणात पडले किडे गे ते,
शेणात पडले किडे गे… “
तिला आधार देणाऱ्या स्त्रिया आशिर्वाद देतात. त्यांचा आशिर्वाद घेऊन ती घरी जाते व साडी बदलून येते. आशिर्वाद देणाऱ्या स्त्रिया तिच्या ओटीत नारळ घालतात. त्याचे खोबरे फक्त त्या पती-पत्नीनेच खावे अशी अट असते, पुन्हा त्या स्त्रीला अंधार आशिर्वाद देतात. त्यानंतर अंधार उभे राहणाऱ्या स्त्रियांच्या ओट्या भरण्याचा कार्यक्रम होतो व दुपारी बारा वाजता या सर्व स्त्रियांच्या जागरणाची समाप्ती होऊन कार्यक्रम संपतो. स्त्रियांना हुरहुर लावत सात दिवसांच्या गजबजलेल्या रात्रीची सांगता होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment