पुणे – पुणे जिल्हा म्हटलं की राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. त्यात शिरूर, बारामती आणि मावळ हे महत्वाचे मतदार संघ येतात. ते नेहमी कुठल्या ना कुठल्या राजकीय कारणाने चर्चेत असतात. त्यातच शिरूर विधानसभेची तयारी आता सुरू होऊ लागली आहे. कारण भाजपचे दिवंगत माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर राष्ट्रवादी आमदार अशोक पवार यांना तुल्यबळ असा विरोधक राहिला नाही, अशा चर्चा सुरू असताना भाजप नवीन खेळी करण्याच्या तयारी असल्याची माहिती आता समोर येऊ लागली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे म्हणून त्यांची चर्चा होऊ लागली आहे.
काळानुसार निवडणुकांमध्ये देखील बदल होताना आपल्याला पहायला मिळत आहे. ज्याप्रमाणे लोकसभेची तयारी सुरू आहे त्याच प्रमाणे विधान सभेचे देखील तयारी जोरात सुरु आहे. शिरूर तालुका म्हटल की राष्ट्रवादीचा बालेकिल्ला. राष्ट्रवादीने प्रत्येक तालुक्यात आपले आमदार दिलेले आहेत. जुन्नर, आंबेगाव, शिरूर, इंदापूर, बारामती, मावळ या सर्व तालुक्यावर राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र शिरूर तालुक्यातील चित्र यंदाच्या निवडणुकीत वेगळे पहायला मिळेल यात शंका नाही. कारण भाजपचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांच्या निधनानंतर अशोक पवार यांना टक्कर देणारा एकही नेता शिरूर तालुक्यात भाजपकडे नाही. मात्र, त्यातही भाजप डाव टाकण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर येऊ लागली आहे. कारण राष्ट्रवादीमध्ये असताना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहीलेले प्रदीप कंद यांचे नाव भाजपकडून घेतले जात आहे. प्रदीप कंद हे पेरणे – वाडे बोल्हाई जिल्हा परिषद गटाचे नेतृत्व करतात. त्यांच्या बालेकिल्ल्यात मोठ्या लीडने ते निवडून येतात.
त्यामुळे जर भाजपकडून प्रदीप कंद यांनी जर उमेदवारी दिली तर भाजपकडून शिरूर साठी पूर्ण ताकत लावण्याची शक्यता आहे. कारण बाबुराव पाचर्णे यांच्यानंतर मंगलदास बांदल हे देखील ताकतिचे नेते शिरूर तालुक्यात होते. मात्र एका जमीन गैर व्यवहार प्रकरणात ते अडकले आणि त्यांना आत जावे लागले. त्यामुळे भाजप समोर प्रदीप कंद नावाचा हा एक पर्याय आहे. प्रदीप कंद यांनी नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत त्यांच्या गटात असणारी लोणीकंद ग्रामपंचायतीत सर्व जागा निवडून पक्ष नेतृत्वाला आपली चुणूक दाखवून दिली होती. त्यामुळे भाजपकडून सद्या.तरी त्यांच्या नावाचाच विचार सुरू असल्याची चर्चा आहे.
प्रदीप कंद हे राष्ट्रवादीच्या वातावरण वाढलेले आणि अजित पवार यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जायचे. अजितदादांमुळे त्यांना पुणे जिल्हा परिषदेत २०१४ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी सुरूवातीला उपाध्यक्ष आणि त्यानंतर अध्यक्षपदाची संधी मिळाली होती. जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचा कार्यकाल संपल्यानंतर कंदांना २०१४ मध्ये विधानसभा उमेदवारीची अपेक्षा होती. त्यावेळी मला अजित दादांनी विधान सभेसाठी शब्द दिल्याचे ते सांगतात. मात्र, अशोक पवार यांच्यासाठी थांबा असे पक्ष नेतृत्वाकडून सांगण्यात आले होते. मात्र २०१९ मध्ये त्यांना शिरूर लोकसभेची ऑफर होती. मात्र त्यासाठी कंद यांनी नकार दिला होता. २०१९ ला विधानसभेलाही अशोक पवार यांना पुन्हा संधी दिल्याने कंद हे नाराज होते. त्यांनी निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादाला धक्का देत भाजपमध्ये प्रवेश केला. मात्र भाजपकडून बाबुराव पाचर्णे यांना उमेदवारी देण्याचे ठरवले होते. त्यामुळे कंद यांना उमेदवारी मिळू शकली नाही. तेव्हा प्रदीप कंद पुन्हा घर वापसी करणार अशा चर्चा सुरू झाल्या होत्या. मात्र त्यावेळी ते अजित पवार नाही तर देवेंद्र फडणवीस यांच्या संपर्कात राहिले.
एवढंच नाही तर जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादीच्या उमेदवाराला धक्का देत प्रदीप कंद यांनी जिल्हा बँकेची निवडणूक जिंकली होती. त्यामुळे राष्ट्रवादाला धक्का बसला होता. प्रदीप कंद सध्या जिल्हा बँकेच्या संचालक पदावर कार्यरत असून अन्य कुठलेही पद त्यांच्याकडे सद्या नाही. एवढं जरी असले तरी येणाऱ्या विधान सभेसाठी शिरूर मधून भाजपकडून प्रदीप कंद यांना उतरवण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. आमदार अशोक पवार यांच्या सारख्या दिग्गज खेळाडू समोर प्रदीप कंद कितपत यशस्वी ठरतात हे येणारा काळच ठरवेल.