विदर्भ

रतन इंडियाची कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना मदत

अपघातात झाला होता दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू

मंगेश तायडे/नांदगांव पेठ

रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पामध्ये कार्यरत असणाऱ्या दोन कर्मचाऱ्यांचा रस्ता अपघातात मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असणाऱ्या रतन इंडिया कंपनीने  मोठ्या भावाची भूमिका निभावत आज रक्षाबंधनच्या दिवशी मृतकांच्या पत्नीला आणि आईला आर्थिक मदत करून मानवतेचा परिचय दिला. कुटुंबातील कर्ता व्यक्ती आपल्यातून निघून गेल्यावर कुटुंबाची वाताहत होऊ नये यासाठी रतन इंडिया ऊर्जा प्रकल्पाचे सीओओ असीम कुमार डे यांनी पुढाकार घेउन सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने फुल ना फुलांची पाकळी जमा करून मृतकांच्या आई आणि पत्नीला तब्बल तीन लाख रुपयांची आर्थिक मदत केली.

१७ जुलै रोजी डवरगाव येथील माजी ग्रामपंचायत सदस्य तथा रतन इंडिया मध्ये कार्यरत कर्मचारी राहुल नाकाडे आणि आशिष ठाकरे यांचा सिंभोरा येथून परत येत असताना दुचाकी अपघात घडला होता.घटनेत दोघेही घटनास्थळीच ठार झाले होते.दोघेही घरातील कर्ते असल्याने कुटुंबावर मोठा आघात झाला होता. मात्र रतन इंडियाचे सीओओ असीम कुमार डे यांनी रतन इंडिया मधील सर्व कर्मचाऱ्यांना आपापल्या परीने आर्थिक मदत करण्याचे आवाहन केले होते.स्वतः असीम कुमार डे यांनी पाच हजार रुपयांची आर्थिक मदत केली होती. बघता बघता कर्मचार्यांनी तीन लक्ष रुपये जमा केले.

 आज रक्षाबंधनच्या पर्वावर रतन इंडिया कार्यालयात राहुल नाकाडे यांच्या पत्नी व आशिष ठाकरे यांच्या मातोश्री यांना सन्मानाने बोलावून त्यांना मानसिक आधार दिला.राहुल नाकाडे यांच्या पत्नीला एक लाख दहा हजार रुपये रोख आणि ७५ हजार रुपयांचा डीडी तसेच आशिष ठाकरे यांच्या मातोश्रीला रतन इंडिया कडून ५० हजार रुपये आणि प्रीमियर प्लांट सर्विस कंपनी कडून ७० हजार रुपयांची रोख मदत करण्यात आली. शिवाय कंपनीकडून कर्मचारी विम्याच्या परतावा देखील लवकरच करण्यात येणार असल्याचे आश्वासन असीम कुमार डे यांनी भगिनींना दिले. यावेळी स्टेशन हेड गीतेश अंबास्ता,उपाध्यक्ष राकेश रंजन,शिशिर महापात्रा उपस्थित होते.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment