पश्चिम महाराष्ट्र

ख्यातनाम अर्थतज्ञ डॉ. जे. एफ. पाटील यांचे निधन

कोल्हापूर – ख्यातनाम अर्थतज्ज्ञ आणि समाजावादी प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ.जे.एफ.तथा जयकुमार फाजगोंडा पाटील यांचे बुधवारी (सात डिसेंबर) निधन झाले. गेले काही दिवस पाटील यांचे प्रकृती ठीक नव्हती. त्यांच्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते.  उपचारादरम्यान  सायंकाळी सातच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. मृत्यूसमयी ते ८२  वर्षाचे होते. त्यांच्या निधनाने संशोधक,  लेखक, अर्थतज्ञ हरपला अशा भावना समाजमनातून उमटत आहेत. डॉ. पाटील यांची अर्थशास्त्र या विषयासंबंधी अनेक पुस्तके प्रकाशित आहेत. शिवाजी विद्यापीठात अनेक वर्ष त्यांनी अर्थशास्त्राचे प्राध्यापक म्हणून काम केले. विद्यापीठाच्या विविध मंडळावर काम करत. त्यांची अर्थशास्त्र या विषयावर मराठी व इंग्रजी  पुस्तके प्रकाशित आहेत. सेवानिवृत्तीनंतरही त्यांनी लेखन, व्याख्यान या माध्यमातून अर्थशास्त्र विषयक अभ्यासक्रम मांडणी केली. अर्थसंकल्पावरील त्यांचे मते, विश्लेषण मोलाचे मानले जाई.

डॉ. पाटील हे मूळचे  सांगली जिल्ह्यातील नांद्रे येथील. पाटील हे प्राध्यापक म्हणून नोकरी करत असताना वेगवेगळ्या ‌‌सामाजिक, शैक्षणिक संस्थेशी निगडित होते. मराठी अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष तसेच शिवाजी विद्यापीठ अर्थशास्त्र परिषदेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खुबीने जबाबदारी पार पडली होती. समाजवादी प्रबोधिनीत खजिनदार, अध्यक्ष या पदावर काम करत योगदान दिले.

दक्षिण भारत जैन सभेने त्यांना कर्मवीर भाऊराव पाटील समाजसेवा पुरस्कार, डॉ.डी. वाय.पाटील विद्यापीठाने जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित केले होते. राज्यातील वेगवेगळ्या संस्थांनी त्यांचा पुरस्काराने सन्मान केला होता. गुरुवारी सकाळी आठ वाजता त्यांच्या निवासस्थानापासून (अक्षय, तारा टेरेसेस,राम मंगल कार्यालय जवळ ) येथून अंत्ययात्रा निघणार आहे. त्यांची पत्नी कमला, मुलगा अभिनंदन, मुलगी राजलक्ष्मी असा परिवार आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment