पुणे – पुण्यातल्या नाना पेठ परिसरातल्या वर्चस्ववादातून गाजलेल्या अक्षय वल्लाळ हत्याचे बदला घेण्यासाठी, दि. २७ रोजी मंडई येथे शेखर शिंदेचा खुनाचा प्रयत्न करण्यात आला. अक्षय वल्लाळचा खून करणारा आरोपी किशोर शिंदेचा लहान भाऊ शेखर शिंदे हा मंडई परिसरातून जात असताना ७ मुलांच्या टोळक्याने त्याच्यावर वार करत गोळी मारून जीव घेण्याचा प्रयत्न केला.
याप्रकरणी फरासखाना पोलिसांनी शिंदे याने दिलेल्या फिर्यादीनुसार, रुपेश जाधव, गणेश येमुल, कृष्णा बिटलिंग, कृष्णा गाजुल, निरज कटकम आणि इतर दोन, अशा सात जणांच्या विरुद्ध आर्म अॅक्टनुसार खूनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला असून ४ आरोपीना ताब्यात घेण्यात आलं आहे.
नानापेठेतील नवा वाडा भागात पूर्ववैमनस्य आणि वर्चस्ववादातून २६ जुलै रोजी रात्री एक वाजताच्या सुमारास वल्लाळ याचा महेश बुरा आणि किशोर शिंदे या दोघांनी धारधार शस्त्राने वार करून डोक्यात सिमेंट काँक्रिटचा दगड घालून खून केला होता. याबाबत अतुल गायकवाड यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दोघांवर समर्थ पोलिसांनी खूनाचा गुन्हा दाखल केला होता. वल्लाळ खून प्रकरणातील आरोपी किशोर शिंदे हा शेखर शिंदे याचा मोठा भाऊ असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर आता हा प्रकार समोर आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी शेखर शिंदे हा दुचाकीवरून फोनवर बोलत मंडईतील गजबजलेल्या रामेश्वर चौकातून निघाला होता. त्यावेळी आरोपी रुपेश जाधव, गणेश येमुल, कृष्णा बिटलिंग, कृष्णा गाजुल, निरज कटकम आणि इतर दोघे तेथे आले. त्यातील एकाने शिंदे याच्या डोक्याला पिस्तूल लावून गोळी झाडली. मात्र ती चुकली. तर इतर आरोपीनी कोयत्याने शिंदे याच्या डोक्यात आणि हातावर वार करून गंभीर जखमी केले. दरम्यान शिंदे हा जीव वाचवून तेथून पळून जात असताना, आरोपींनी त्याचा पाठलाग करून पकडले. तुझ्या भावाने आमचा मित्र अक्षय वल्लाळ याचा खून केला. त्याचा बदला म्हणून आज तुझा खून करणार आहे. तुला जीवंत सोडणार नाही असे बोलून त्याला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. शिंदे याच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला होता. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत शिंदे याला ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार संशयीत आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. अद्याप आरोपी फरार असून, गुन्हे शाखा व स्थानिक पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत.