कोंकण महाराष्ट्र

साई रिसॉर्टच्या अडचणी वाढण्याची शक्यता

रत्नागिरी – किरीट सोमय्यांनी सातत्याने पाठपुरावा करून अनिल परब यांच्यावर आरोप केलेले साई रिसॉर्टच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. कोकणात दापोली तालुक्यात मुरुड येथील समुद्रकिनारी साई रिसॉर्ट व सी कॉंच रिसॉर्टच्या मालकांविरोधात शासकीय जागेत अनधिकृत वापर केल्याप्रकरणी महसूल विभागाकडुन पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे .

मुरूड येथील वादग्रस्त ठरलेल्या या दोन्ही रिसॉर्ट समोर असलेल्या शासकीय जमिनीवर पेव्हर ब्लॉक व लादी बसवून त्या ठिकाणी रिसाँर्टची पार्किंग सुविधा उपलब्ध करणाऱ्या सदानंद गंगाराम कदम व पुष्कर श्रीकृष्ण मुळे यांच्याविरोधात बुरोंडीचे मंडळ निरीक्षक शरदचंद्र सानप यांनी दापोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. उद्योजक सदानंद कदम हे अनिल परब यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात.

याबाबत दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुरुड येथील गट नंबर ४४६ मध्ये १-२६-४० या जागेत पुष्कर मुळे यांचे सी कौंच या रिसाँर्टचे बांधकाम करण्यात आले होते. हे बांधकाम करत असताना मुळे यांनी गट नंबर ४४६ च्या पश्चिम बाजूस व समुद्राच्या भरतीमुळे तयार झालेल्या गाळाच्या सरकारी जमिनीवर (७२६ चौ.मीटर)  अनधिकृतरित्या पेव्हर ब्लॉक व लादी बसवून रिसाँर्टच्या समोर वाहनांसाठी पार्किग व प्ले ग्राउंड, पोर्च तयार केला होता. त्यासाठी कोणतीही शासकीय परवानगी घेण्यात आलेली नव्हती. तहसीलदार दापोली यांनी १ डिसेंम्बर २०२२ रोजी सदर बांधकाम काढून टाकावे अशी नोटीस पुष्कर मुळे यांना दिल्यावर त्यांनी ते बांधकाम काढूनही टाकले. मुळे यांनी ७२६ चौरस मिटर शासकीय  क्षेत्राचा अनधिकृत वापर करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ मधील तरतूदींचा भंग केल्याची तक्रार मंडळ अधिकारी शरदचंद्र सानप यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली आहे.

अशाच स्वरूपाचे बांधकाम सदानंद कदम यांनी त्यांच्या साई रिसाँर्टच्या समोर ६०० चौरस मीटर शासकीय जागेत वाहनांसाठी पार्किगकरता केले होते. दापोली तहसीलदार वैशाली पाटिल यांनी १ डिसेम्बर २०२२ रोजी सदर बांधकाम काढून टाकावे अशी नोटीस सदानंद कदम यांना बजावली होती. त्यानंतर त्यांनी ते बांधकाम स्वतःहून काढूनही टाकले. आता याप्रकरणी त्यांच्या विरोधातही शासकीय क्षेत्राचा अनधिकृत वापर करून महाराष्ट्र प्रादेशिक व नगररचना अधिनियम १९६६ चे कलम ५२ मधील तरतूदींचा भंग केल्याची तक्रार मंडळ अधिकारी शरदचंद्र सानप यांनी दापोली पोलीस ठाण्यात दिली आहे.

आता या सगळ्या प्रकरणी नेमकी काय कारवाई होते याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिल आहे. साई रिसॉर्टला लागून असलेले शेजारचे सी काँच रिसॉर्ट इमारत यापूर्वीच बांधकाम तोडण्यात आला आहे. आता अनिल परब यांच्याजवळ संबंधित असलेले साई रिसॉर्ट बांधकाम तोडण्यात यावे यासाठी किरीट सोमय्या सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करत आहेत. मात्र साई रिसॉर्ट चा विषय हा न्यायप्रविष्ठ असल्याने प्रशासन सगळ्या कायदेशीर बाजू तपासूनच या बाबतीत निर्णय घेईल.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment