पश्चिम महाराष्ट्र

सातारा जिल्हा पर्यटकांसाठी तीन दिवस बंद

सातारा – साताऱ्यातील वासोटा किल्ल्यावर ३० डिसेंबर ते १ जानेवारी दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. वन विभागाने हा निर्णय घेतला आहे. पर्यटक तसंच गर्दीतील हुल्लडबाजांचा जंगली प्राण्यांना त्रास होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. नववर्ष स्वागत व सरत्या वर्षाला निरोप यासाठी पर्यटक गर्दी मोठ्या प्रमाणात करत असतात. काही उत्साही पर्यटकांकडून होणारा उपद्रव लक्षात घेता दरवर्षी तीन दिवस किल्ल्यावर जाण्यासाठी बंदी घातली जाते. निसर्ग व वन्य जीवांना कोणताही धोका पोहचू नये, यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्यावर्षीसुध्दा तीन दिवस वासोटा किल्ला बंद ठेवण्यात आला होता.

साताऱ्यातील बामणोली परिसरात असलेला वासोटा किल्ला हा नेहमीच पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. तेव्हा पर्यटकांनी पुढील तीन दिवस किल्ल्यावर प्रवेश करू नये, अन्यथा कायदेशीर कारवाईस सामोरे जावे लागेल असे वनविभागाने कळविले आहे. वन विभागाने कोयना जलाशयातून पर्यटक वाहतूक करणाऱ्या बामणोली, तापोळा विभागातील बोट चालकांना याबाबत सूचना दिली आहे. या काळात वासोटा किल्ला परिसरासह अभयारण्याच्या गाभा क्षेत्रात कोणी व्यक्ती बेकायदेशीररित्या आढळल्यास त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी माहिती बामणोली वन्यजीव वनक्षेत्रपाल बाळकृष्ण हसबनीस यांनी दिली.

दरम्यान कोल्हापूर जिल्ह्यातील दाजीपूर अभयारण्य हे पर्यटन स्थळ देखील ३१ डिसेंबर व एक जानेवारी या दोन दिवसाकरिता पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आले आहे. पर्यटन स्थळावर येऊन मद्यपान करून पार्टी करण्याचे प्रमाण गेल्या काही वर्षात वाढल्याने वन प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यामार्फत हा निर्णय घेण्यात आला आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment