महाराष्ट्र सावित्री उत्सव २०२२

#Savitribaiphule बालिकादिनाला न्याय देणारे सावित्रीबाईंचे स्मरण

आज महिला स्वतंत्रपणे वावरतात, हव्या त्या क्षेत्रात करिअर करतात पण शंभर वर्षांपूर्वीचा काळ यासाठी नक्कीच पोषक नव्हता. त्यामुळे एका स्त्रीने ठरवले तर ती समाजाशी कसा लढा देऊ शकते, आपल्या ध्येयावर किती ठाम राहू शकते हेदेखील सावित्रीबाईंचे कार्य आपल्याला शिकवतो. बालिकादिनी स्त्रीशिक्षण, सुरक्षा, सक्षमता, निर्भरता या स्त्रीगुणांचे कौतुक करत असताना हा धागा थेट सावित्रीबाईंनी सोसलेल्या कष्टांशी जोडला जातो हे नाकारून चालणार नाही.

By: अनुराधा कदम

शिष्यवृत्ती परीक्षेतील मुलींच्या यशाचा आलेख असो…

प्रज्ञाशोध परीक्षेपासून ते विज्ञानप्रयोग स्पर्धांमधील मुलींचा सहभाग असो… दहावीच्या परीक्षेत गुणवत्ता यादीत मुलींचा वाढलेला टक्का असो…

कॉलेज कँपसमधून मोठमोठ्या कंपन्यांमध्ये निवडीमधील मुलींची संख्या असो, क्रीडाक्षेत्रातील पदकांवर कोरलेली मुलींची नावे असोत इतकेच नव्हे तर प्रशासकीय सेवांसाठी दिल्या जाणा-या स्पर्धा परीक्षांच्या निकालपत्रातील मुलींची नावे असो…

आज मुलगी प्रत्येक क्षेत्रात यशाची कमान उंचावत आहे त्याचा पाया रोवला तो पुण्यातील बुधवार पेठेतील भिडे वाड्यात क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी.

सरकारने बालिका दिन साजरा करण्यासाठी ३ जानेवारी हा दिवस निवडला आणि हा दिवस अत्यंत समर्पक आहे तो याच कारणासाठी की ज्या सावित्रीबाई फुले यांनी स्त्रीशिक्षणाचा विडा उचलला, ज्यांनी स्त्रीशिक्षण चळवळीला जन्म दिला त्या सावित्रीबाई यांच्या जन्मदिवसाइतका दुसरा कोणताही दिवस बालिकादिनाच्या संकल्पनेला न्याय देणारा ठरला नसता.

स्त्रीशिक्षणाच्या मेरूमणी म्हणून आपण दरवर्षी ३ जानेवारीला सावित्रीबाई फुले यांचे स्मरण करतो, त्यांनी स्त्रीशिक्षणासाठी केलेल्या कार्याला सलाम करतो. बालिकादिनाच्या निमित्ताने सावित्रीबाईंनी रुजवलेल्या स्त्रीशिक्षणाच्या रोपाचा वटवृक्ष करण्याचे काम समाजातील मुली नेटाने करत आहेत. महिला शिक्षण दिनाच्या संकल्पनेतून मुलींचे शिक्षण आणि त्यातून त्यांची स्वयंनिर्भरता हा संदेश देण्यासाठी बालिकादिन साजरा केला जातो.

राष्ट्रीय बालिकादिवस २४ जानेवारी रोजी साजरा होत असला तरी महाराष्ट्रात सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी साजरा केला जाणारा बालिका दिन विविध उपक्रमांनी साजरा केला जात असताना सावित्रीबाई फुले यांनी बहुजन समाजातील मुलींना शिक्षणाचा हक्क मिळावा यासाठी सोसलेल्या कष्टांची समाजाला जाणीव व्हावी व त्यातून अजूनही मुलींच्या शिक्षणाला विरोध करणा-या समाजाला याचे भान यावे हा उद्देशही आहे. महाराष्ट्र शासनाने १९५५ पासून बालिका दिन हा सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी साजरा करण्यास सुरुवात केली. मान्य आहे, की आता मुलींच्या शिक्षणात खो घालणारी कुटुंबव्यवस्था खूपअंशी कमी झाली आहे. शहरांमधील मध्यम व उच्चमध्यम कुटुंबव्यवस्थेत मुलींच्या शिक्षणाला खूप वाव दिला जातो.

अनेक क्षेत्रात मुलींना करीअर करण्याचे प्रोत्साहन दिले जाते. पण दुर्दैवाने अजूनही खेड्यापाड्यांमध्ये, वाड्यावस्त्यांमध्ये मुलींचे शिक्षण हे दुय्यम स्थानावर आहे. नुकताच सरकारने मुलींच्या विवाहाचे वय १८ वरून २१ वर्षे करण्याचे विधेयक मांडण्यात आले आहे आणि त्याला समाजाकडून पाठिंबाही मिळत आहे. हा कायदा मांडत असताना स्त्रीस्वातंत्र्याला पोषक असलेल्या काळातही मुलींच्या विवाहाचे वय वाढवण्यामागे त्यांचे शिक्षण अर्धवट राहू नये, मुलींच्या हातात किमान पदवीपर्यंतचे शिक्षण असावे हाच हेतू आहे. अनेकदा १८ व्या वर्षी मुलींच्या लग्नाची घाई काही पालक करतात ज्यामुळे त्यांना शिक्षण पूर्ण करता येत नाही.

भविष्यात दुर्दैवाने काही प्रसंग उभा राहिल्यास शिक्षणच नसल्याने त्यांना नोकरी मिळण्यात अडचणी येतात. अर्थार्जनाचा प्रश्न निर्माण होतो. आजही आपण आपल्या आजूबाजूला अशा अनेक मुली व पालक पाहतो की १८ वर्षे पूर्ण होताच शिक्षण घेत असलेल्या मुलीवर बोहल्यावर चढवण्यासाठी दबाव टाकला जातो. परिणामी तिचे शिक्षण पूर्ण होत नाही. शंभर वर्षापूर्वी मुलींच्या शिक्षणाचा आग्रह धरणा-या, मुलगी शाळेत यावी म्हणून समाजाकडून शेणगोळे, चिखल झेलणा-या सावित्रीबाई फुले यांच्या संघर्षाने मुलींच्या शिक्षणाची वाट तर सुकर झाली पण आजही काही मुली शिकण्याची इच्छा असूनही शिकू शकत नाहीत.

मुलीचे लग्न हा अजूनही समाजमनातील ऐरणीवरचा प्रश्न आहे. बालिकादिनाची संकल्पना मांडत असताना सरकारनेही मुलीचे शिक्षण, सुरक्षितता आणि निर्भरता ही त्रिसूत्री गुंफली ती याच कारणाने. त्यामुळेच बालिका दिन आणि सावित्रीबाई फुले जयंती हा धागा आजच्या काळात जोडत असताना शिक्षण हा स्त्रीच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असला पाहिजे ही गोष्ट अधोरेखित होते.

स्त्री शिक्षणाच्या मेरूमणी सावित्रीबाई फुले या भारतीय स्त्री शिक्षणाच्या जन्मदात्रीच म्हणाव्या लागतील. संपूर्ण महाराष्ट्र त्यांचे ऋण कधीच विसरू शकत नाही इतके मोलाचे योगदान त्यांनी स्त्रीशिक्षणासाठी दिले आहे. जो काळ स्त्रियांना घराचा उंबरठा ओलांडण्याचीही परवानगी देत नव्हता त्या काळात सावित्रीबाई यांनी समाजाच्या प्रवाहाविरोधात जाऊन महिलांच्या शिक्षणासाठी कंबर कसली.

आज महिला स्वतंत्रपणे वावरतात, हव्या त्या क्षेत्रात करिअर करतात पण शंभरवर्षापूर्वीचा काळ यासाठी नक्कीच पोषक नव्हता. त्यामुळे एका स्त्रीने ठरवले तर ती समाजाशी कसा लढा देऊ शकते, आपल्या ध्येयावर किती ठाम राहू शकते हेदेखील सावित्रीबाई यांचे कार्य आपल्याला शिकवतो. बालिकादिनी स्त्रीशिक्षण, सुरक्षा, सक्षमता, निर्भरता या स्त्रीगुणांचे कौतुक करत असताना हा धागा थेट सावित्रीबाईंनी सोसलेल्या कष्टांशी जोडला जातो हे नाकारून चालणार नाही.

खरंतर सावित्रीबाई शिकलेल्या नव्हत्या. परंतु मुलींच्या शिक्षणाची त्या काळातील दशा आणि दिशा पाहिल्यानंतर त्या स्वतः शिक्षण घेऊन मुलींना शिकवू लागल्या. समाजविचाराने, मानसिकतेने सुदृढ व्हायचा असेल तर कुटुंबातील स्त्री शिकली पाहिजे, तिलाही पुरुषांप्रमाणे हक्क व अधिकार मिळाले पाहिजेत, मुळात हक्क आहेतच पण त्याची जाणीव तिला शिक्षणामुळेच येईल आणि तेव्हाच समाजात तिला समान स्थान मिळेल हे सावित्रीबाई यांनी ओळखले होते. म्हणूनच समाजासाठी, प्रामुख्याने स्त्रियांसाठी महान कार्य करणा-या नावांमध्ये सावित्रीबाई फुले यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांचा सन्मान करणे हे कर्तव्यच आहे.

समाजातील स्त्रियांवरील अन्यायाविरोधात लढा देऊन, स्वतःच्या जीवाची तमा न करता स्त्रियांना त्यांचे अधिकार मिळवून देण्यासाठी व समाजात स्त्री-पुरुष समानतेचे मूल्य रुजविण्यासाठी सावित्रीबाईंनी मोलाचे योगदान दिले आहे. तत्कालीन समाजाने मुलींना शिक्षणाचा अधिकार नाकारला असतांना मुलींसाठी शिक्षणाची मुहूर्तमेढ करून त्यांनी स्त्रियांना शिक्षणाची दालने खुली केली त्यामुळे स्त्रियांना शिक्षणाची संधी मिळाली. म्हणूनच त्या स्त्री-शिक्षणाच्या अग्रदूत ठरतात. त्यांनी स्त्रियांच्या उद्धारासाठी दिलेल्या अभूतपूर्व योगदानाबद्दल त्यांचा जन्मदिन महिला शिक्षण दिन म्हणून साजरा केला जातो.

सावित्रीबाई फुले व जोतीराव फुले यांच्या कार्यामुळेच आज स्त्रियांना सर्व क्षेत्रात संधी मिळत आहे. परंतु समाजाची वाटचाल आधुनिकीकरणाच्या दिशेने मोठ्या प्रमाणात होत असतांना काही ठिकाणी अजूनही जुन्या चालीरीती पाळल्या जातात. समाजाच्या सर्व क्षेत्रात अजूनही स्त्री-पुरुष समानता दिसून येत नाही.

तसेच स्त्रियांवरील अन्याय, अत्याचार थांबलेले नाही. आजही मोठ्या प्रमाणात बालविवाह होतांना दिसतात. या बालविवाहांमुळे मुलींच्या शिक्षणात अडथळे, मुलींचे आरोग्य, जन्म घेणाऱ्या बालकांचे आरोग्य, कुपोषण बालविधवा, स्त्री-भ्रूणहत्या अशा समस्या वाढतांना दिसतात. स्त्रियांवरील अत्याचाराच्या घटना तर मन हेलावून टाकतात. म्हणूनच सावित्रीबाईंनी स्त्री-पुरुष समानता आणि सामाजिक स्वातंत्र्यासाठी व स्त्रियांच्या निर्भयतेसाठी केलेल्या कार्याला पुन्हा समाजात रुजविण्याची मोठी गरज जाणवते.  

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment