महाराष्ट्र सावित्री उत्सव २०२२ साहित्य

सावित्रीमाई – पितृसत्ताक मानसिकतेखाली गाडलेल्या भारतीय महिलेची उद्धारकर्ती

विवेक ताम्हणकर, कोंकण 


“शिका शिका रे, विद्या शिका। 

मनूचे काही ऐकू नका, कोणी मागे राहू नका । 

विद्या शिकूया, ज्ञान घेऊया, एक होऊया ।।’


१८ व्या शतकात महाराष्ट्रात मनुवादी विचारसरणीच्या प्रभावाने अखंड समाज व्यवस्था व्यापलेली होती. अशा अवस्थेत महात्मा जोतिबा फुले यांच्या प्रेरणेतून सावित्रीमाई फुले या एका शक्तीशाली महिलेचा उदय झाला. या महिलेने दगड आणि शेणाचा मारा अंगावर झेलत सामाजिक परिवर्तनाचा विचार आंगीकारून स्त्री शिक्षणाची चळवळ हाती घेतली.

खर्‍या अर्थाने पितृसत्ताक अहंकारी मानसिकतेखाली गाडलेल्या महिला-भगिनींच्या उद्धाराचे पर्व सावित्रीमाईंच्या  परिवर्तनवादी विचारातून सुरू झाले. महिला सक्षमीकरणाचे कार्य किंबहुना त्याचे बीज सावित्रीमाईंनी रोवले. आज त्याचा वटवृक्ष झाला. दुर्दैवाने त्या वटवृक्षाखाली आजच्या सावित्रीच्या लेकी पुराण कथेमधल्या सावित्री-सत्यवानाच्या कथेत गुरफटून फेर्‍या घेण्याच्या पलीकडे फारशा जाताना दिसत नाहीत. ग्रामीण भारताची अवस्था साधारणतः अशीच आहे. 


सावित्रीमाईंचा जन्म सातार्‍यामधल्या नायगाव मध्ये ३ जानेवारी ,१८३१ मध्ये झाला. केवळ ९ वर्षाच्या असताना त्यांचा विवाह जोतिबा फुले या १३ वर्षाच्या युवकाशी झाला. खर तर खेळण्या-बागडण्याच्या काळात ही दोन माणसे एकत्र आली. पुढे भारतीय समाजकारणात या जोडप्याने क्रांतिकारक विचारांची पेरणी केली. जोतिबांनी जातीयतेचे चटके फारच कमी वयात सहन केले होते. दीन-दलितांचे हाल पाहून काळीज पिळवटून निघालेला हा माणूस रूढी-परंपरा, कर्मकांड, जातीव्यवस्था, बालविवाह, केशवपन, सती प्रथा या विरोधात बंड करू लागला. या बंडाला खरी प्रेरणा मिळाली ती सावित्रीमाईंच्या साथीने. 


विद्येविना मती गेली।मतिविना नीती गेली।नीतिविना गती गेली।गतिविना वित्त गेले।वित्ताविना शूद्र खचले।इतके अनर्थ एका अविद्येने केले।।


जोतिबांच्या या पंक्ती त्यांना  उमगलेल्या दीन-दलित, शोषितांच्या,माणूसपणाच्या जगण्याचे  मर्म सांगतात. किंबहुना त्यांचा हा विचार सर्वात आधी जर समजला असेल तर तो सावित्रीमाईंना. धर्माच्या ठेकेदारांनी धर्म बुडवी म्हणून त्यांच्यावर आरोप केले. त्यांना हिणवले, अगदी त्यांच्या अब्रूचे धिंडवडे देखील काढले.

परंतु जोतिबांची ही सावित्री कुणाला घाबरली नाही, कशालाही बळी ठरली नाही, कधीही डगमगली नाही तर क्षणोक्षणी नव्या उमेदीने उभी राहिली. पावलोपावली कणखर आणि खंबीर बनत गेली. जोतिबा आणि सावित्रीमाईंनी १ जानेवारी,१८४८ रोजी पुण्यातल्या बुधवार पेठेत मुलींची पहिली शाळा काढून खर्‍या अर्थाने भारतीय समाजव्यवस्थेच्या वैश्विक परिवर्तनाचा पाया रोवला.

 
कोकण हा पुराण कथेच्या अग्रस्थानी असलेला प्रांत आहे. पिढ्यांनपिढ्या इथल्या समाजव्यवस्थेवर झालेले संस्कार आजही रूढी-परांपरांच्या माध्यमातून गेली अनेक शतके अनुभवायला मिळत आहेत.

२५ डिसेंबर,१९२७ रोजी याच कोकणभूमीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मनुस्मृतीचे दहन केले आणि  भारतीय स्त्रियांबरोबर एकूणच समाजव्यवस्थेला मुक्तीचा नवा मार्ग दाखवला. परंतु अठराव्या शतकात बाबासाहेबांच्या क्रांतिकारी विचारांचे बीज रोवत असताना फुलेंनी सुरू केलेल्या शाळेमध्ये खर्‍या अर्थाने मनुस्मृतीतील कायद्यांना सुरुंग लावण्याचे काम करण्यात आले. यासोबतच या दांपत्याने    समाजातील अनिष्ठ रूढी-परंपरांवर आघात केला. 


एका बाजूला मनू स्त्री शिक्षण नाकारत होता. तर दुसर्‍या बाजूला सावित्रीमाई स्त्री शिक्षणातूनच भारतीय समाजव्यवस्थेच्या सक्षमीकरणाचा विचार जनमानसात रुजवत होत्या. समाजातल्या विधवा, कुमारी माता, विधवा गरोदर महिला यांचे प्रश्न सोडविणे त्यांना त्यांच्या समस्येतून मुक्त करणे. त्याचबरोबर त्यांना जगण्याची नवी उमेद,चेतना सावित्रीमाईंनी दिली.

परंतु इथल्या समाजव्यवस्थेतल्या विविध जातसमुहांमध्ये  फिरत असताना लोकांना जोतिबांच्या सावित्री पेक्षा   सत्यवानाची सावित्री अधिक जवळची वाटते. हे आजच्या २१ साव्या शतकातील दुर्दैवच म्हणावे लागेल. वटपौर्णिमेला  वडाच्या भोवती फिरणार्‍या महिला, आता नव्याने चालू झालेली प्रथा म्हणजे बायकोसोबत वडाभोवती फिरणारे पुरुष आणि वडाखाली अकरोड, बदाम यासारख्या खाद्यजन्य वस्तूंचा पडलेला खच, झाडांभोवती गुंडाळलेले मौल्यवान सूत पाहिल्यानंतर सावित्रीमाईंच्या विचारातून आजच्या स्त्रियांनी काय बोध घेतला ? हा प्रश्न साहजिकच पडतो. 


मुलगी शिकली, प्रगती झाली हे सरकारचे अलिकडच्या काळातील घोषवाक्य आहे. परंतु यामागचा विचार १८ व्या शतकात मांडत असतांना सावित्रीमाईंनी मुलगी शिकली, समाजक्रांती झाली.

याच अर्थाने पुढे नेण्याचा प्रयत्न केला. अनेक मुलींना शिकवताना त्यांनी समाजातील अनेक रूढी-परंपरांवर आघात केला. फुले दांपत्याच लग्न म्हणजे तसा बालविवाहच. परंतु बालविवाहाच्या प्रथेविरोधात फुलेंचा आवाज आणि त्याला सावित्रीमाईंची साथ भारताच्या सामाजिक परिवर्तनाची एक नांदी ठरली. सावित्रीमाईनी अनेक विधवा, गरोदर स्त्रियांची बाळंतपणे केली.

खरतर या सर्व स्त्रियांचा शोध घेतला असता, त्यातील बहुतांशी स्त्रिया या मनुवादी व्यवस्थेचे पांडित्य करणार्‍या समाजघटकातीलच प्रतींनिधींच्याच जातवर्गातल्या होत्या ही बाब समोर आल्याशिवाय राहणारं नाहीत. अर्थात सावित्रीमाईंनी आणि ज्योतीबांनी कधीच विशिष्ट जातवर्गासाठी काम केले नाही. त्यांचे कार्य हे मानव जातीच्या परिवर्तनासाठी होते. 

भारतीय समाज व्यवस्थेच्या जात समूहात रूढी-परंपरांचं जाळ अत्यंत घट्ट पद्धतीने विणले गेलेले आहे. ब्राह्मणी विचारधारेने या परंपरांचं वेळोवेळी अवडंबर केले ते केवळ स्वतःच्या उपजीविकेचे माध्यम म्हणून.

प्रत्यक्षात जात समूहांच्या रूढी कशा महत्वाच्या आहेत हे धर्म शस्त्राचा आधार देऊन भारतीय समाज मनावर बिंबवताना ब्राह्मणी व्यवस्थेने या रूढी-परंपरावादी मानसिकतेत इथल्या समाज व्यवस्थेला पूर्णतः बुडविले. बालिका वधूची प्रथा त्याच मानसिकतेतील. म्हातारा नवरा आणि बालिका वधू म्हणजे नवरा साहजिकच लवकर मरणार. त्याच्या सरणावर उडी घेऊन त्या वधूने सती जावे हे समाज व्यवस्थेच्या मनावर या धर्माच्या ठेकेदारांनी असे काही बिंबवले होते कि, त्या आगीत कितीतरी जीव त्या काळातल्या निद्रिस्त समाज व्यवस्थेने जाळून टाकले. यातही सती जाणाऱ्या महिलेला सोन्याने मढवून पाठवण्याची प्रथा धर्माच्या ठेकेदारांनी घालून दिली आणि त्या सरणाची राख मात्र चाळण्याचे अधिकार आपल्याकडे ठेवून घेतले.

म्हणजे राखेतील सोन पुन्हा आपल्या झोळीत कोंबायचं काम यांच्याकडेच. पुन्हा सरणावर जळल्यानंतरच्या विधी आहेतच. समाजाची हि लूट थांबवायची असेल तर सुशिक्षित आणि सुदृढ समाजव्यवस्था निर्माण झाली पाहिजे हा विचार फुले दाम्पत्याला त्या काळात उमजलेले होता. 
फुलेंच्या शाळेने भारतात महिलांच्या शिक्षणाच अधिकार अधोरेखित केला. सावित्रीमाईने सहन केलेल्या विटंबनेतुन महिलांच्या सक्षमीकरणाची चळवळ उभी राहिली. पुणे आज विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. याच पुण्यात आज दगडाच्या देवाला सेंदूर चढवला जात असताना सावित्रीमाईने सुरु केलेल्या पहिल्या शाळेची इमारत जमीनदोस्त होत आहे. खरं तर सरकारने कशाला, आजच्या महिलांनीच एकत्र येऊन समस्त भारतीय स्त्री शिक्षणाच्या परिवर्तनाचे बंड ज्या वास्तूतून पुकारले गेले ती ऐतिहासिक वास्तू जपण्यासाठी पुढे येण्याची गरज होती. दुर्दैवाने ते होताना दिसत नाही. भारतीय स्त्रीयांमध्ये सावित्रीचा आवाज क्षीण झालेला दिसतोय……

स्त्री हि पितृसत्ताक मानसिकतेची मांडलिक होण्याची प्रक्रिया भारतीय समाजव्यवस्थेत पुन्हा सुरु झाली आहे का ? याचा आता गांभीर्याने विचार केला पाहिजे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment