महाराष्ट्र

कोल्हापूर जिल्ह्यातील ४ हजार शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत ऑनलाईनच!

कोल्हापुरात महापालिकेच्या २९५ शाळांमध्ये १ लाख ९ हजार ६०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत तर सर्व माध्यमाच्या तीन हजार प्राथमिक शाळा असून या ठिकाणी चार लाख ५० हजार विद्यार्थी संख्या आहे. जिल्ह्यात माध्यमिक शाळा १ हजार ६८ असून या शाळेतील विद्यार्थी संख्या ३ लाख ५० हजार इतकी आहे

अनुराधा कदम, कोल्हापूर

करोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी राज्य सरकारने नवे निर्बंध लागू केले आहेत. या निर्बंधाची अंमलबजावणी रविवारी मध्यरात्रीपासून सुरू झाली. याअंतर्गत जिल्ह्यातील ४ हजार ३६३ शाळा आजपासून पुन्हा ऑनलाईन भरणार आहेत. १५ फेब्रुवारी पर्यंत ऑफलाईन वर्ग बंद ठेवण्याचे निर्देश सरकारने दिल्यामुळे शाळांमधील किलबिलाट पुन्हा थांबणार आहे.


करोना आणि ओमायक्रोनचा प्रादुर्भाव जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून वाढत आहे. सध्या जिल्ह्यातील सक्रीय रुग्णांची संख्या ७९१ झाली असून रविवारी एका दिवसात तब्बल २२३ रुग्ण नवीन आढळून आले त्यामध्ये शहरातील १४२ रुग्णांचा समावेश आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर दक्षता घेण्यासाठी राज्य सरकारने नवीन नियमावली जाहीर केली. यामध्ये प्रामुख्याने शाळा कॉलेज व विद्यापीठ १५ फेब्रुवारी पर्यंत बंद राहणार असल्याच्या सूचना देण्यात आल्या. यानुसारच जिल्ह्यातील शाळा व्यवस्थापनाने ऑफलाइन वर्ग बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे .


गेल्या वर्षी जुलैपासून करोनाचा प्रादुर्भाव कमी होऊ लागल्याने टप्प्याटप्प्याने शाळा ऑफलाईन स्वरूपात सुरू झाल्या होत्या. यामध्ये सुरुवातीला नववी व दहावीच्या दहावीचे वर्ग भरवण्यात आले तर नोव्हेंबर पासून पहिली ते आठवी चे वर्ग ऑफलाईन भरवण्याची कार्यवाही शाळा प्रशासनाने केली होती. अर्थातच करोनाचे सर्व नियम पाळून जिल्ह्यातील शाळा दिवाळीनंतर सुरळीत सुरू झाल्या होत्या. मात्र आता पुन्हा करोनाचा नवी व्हेरिएंट म्हणजेच ओमायक्रोन डोकं वर काढत आहे यामुळे करोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वाढत आहे.


 एक जानेवारीपासून १५ ते १८ वयोगटातील विद्यार्थ्यांना लसीकरण करण्याची मोहीम राज्यभरात गतिमान झाली आहे. यासाठी शाळा व कॉलेज मध्ये लसीकरण कॅम्प आयोजित करून विद्यार्थ्यांचे मोठ्या प्रमाणात लसीकरण केले जात आहे. त्यामुळेच करोनाचा संसर्ग वाढला तरी  विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण झाल्यास करोना चा सामना करणे सोपे होईल हा दिलासा पालक शिक्षक तसेच विद्यार्थ्यांना वाटत होता. मात्र एकीकडे लसीकरण मोहीम सुरू असतानाच सर्वत्र करोनाचे रुग्ण पुन्हा वाढत असल्याने खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. याबाबतचे मेसेज शाळा प्रशासनाने पालकांना रविवारी पाठवले त्यानुसार सोमवारपासूनच जिल्ह्यातील ४ हजार ३६३ शाळा १५ फेब्रुवारी पर्यंत ऑनलाईन स्वरूपात सुरू राहणार आहेत.


शनिवारी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोरोना बाबत नियमावली जाहीर करण्यासाठी घेतलेल्या बैठकीनंतर शाळा कॉलेज १५ फेब्रुवारीपर्यंत बंद राहणार ही बातमी पसरली. त्यानंतर विद्यार्थी आणि पालकांकडून शाळा व्यवस्थापनाकडे सोमवारपासून शाळा भरणार की नाही याबाबत विचारणा सुरू झाली मात्र जोपर्यंत शासनाकडून जिल्हा प्रशासनाला अध्यादेश मिळत नाही तोपर्यंत शाळांबाबत निर्णय घेणे शक्य नसल्याचे शाळा व्यवस्थापनाकडून पालकांना सांगण्यात आले , अखेर रविवारी रात्री जिल्हा प्रशासनाकडून शाळा व्यवस्थापनाला आदेशाचे पत्र मिळाल्यानंतर शाळा प्रशासनाने पालकांना मेसेज करून १५ फेब्रुवारी पर्यंत शाळा ऑनलाईन सुरू राहतील असे कळवल्यानंतर पालक आणि पालकांनी विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर झाला.

गेल्या दोन वर्षापासून करोना संसर्गाचे सावट प्रामुख्याने दहावी आणि बारावी परीक्षांवर कायमच राहिले आहे. . त्यामुळे यंदा दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार याबाबतही पालकांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आहे .परंतु दहावी व बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी बोर्डाकडून राबविण्यात येणारे उपक्रम सुरू राहतील . प्रशासकीय आणि शिक्षकांचे अध्यापन व्यतिरिक्त कामकाज सुरू राहणार आहे. त्याला शासनाच्या निर्बंधांतून वगळण्यात आले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment