पश्चिम महाराष्ट्र

स्क्रिनशॉट पाठवून महिलेला तब्बल साडे सात लाखांना गंडवले

पुणे – पुण्यात भाईगिरी, गुन्हेगारी, दहशत माजवण्याचा प्रयत्न अशा गुन्ह्यांत मोठ्या प्रमाणात वाढ होत असताना आता पुणेकरांना सायबर हल्ल्याचे देखील प्रमाण वाढले आहे. यामध्ये आर्थिक फसवणुकीचे प्रमाण लक्षणीय आहे. अशाच प्रकारे सायबर चोरट्यांनी हडपसर भागात राहणाऱ्या एका महिलेला बनावट स्क्रिनशॉट पाठवून तब्बल साडे सात लाखांना गंडा घातला आहे.

याप्रकरणी, हडपसर भागातील अमेनोरा टाऊनशिप येथे राहणाऱ्या एका ३७ वर्षीय महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार महिलेच्या फिर्यादीवरून आदील फारुखभाई शेख याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,तक्रारदार महिलेला आपल्या घरातील जुने कपाट विकायचे असल्याने तिने तशी जाहिरात खरेदी-विक्री करणाऱ्या एका वेबसाईटवर दिली. त्यानंतर ही जाहिरात पाहून सायबर भामटा असलेल्या आदिलने महिलेच्या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधला. आणि आपल्याला तुमचे कपाट खरेदी करायचे असल्याची बतावणी करत महिलेकडून बँक खात्याची माहिती घेतली.

सायबर चोरटा असलेल्या अदिलाला एव्हाना हे सावज आपल्याला गळाला लागेल याची खात्री झाली होती. त्यानंतर त्याने पुन्हा महिलेला फोन करून माझ्याकडून तुमच्या खात्यावर चुकून आठ लाख रुपये पाठवण्यात आले आहेत अशी बतावणी केली आणि तसा बनावट स्क्रिनशॉट देखील आदिलने तक्रारदार महिलेला पाठवला.

महिलेने देखील कोणतीही शहानिशा न करता कपाट विक्रीतील रक्कम वजा करुन आरोपी आदिलच्या बँक खात्यावर सात लाख ६५ हजार रुपये ऑनलाइन पद्धतीने पाठविले. त्यानंतर महिलेने आदिलने पाठविलेल्या पैशांबाबत बँकेकडे विचारणा केली. तेव्हा महिलेच्या बँक खात्यात रक्कम जमा झाली नसल्याचे समजले. महिलेने आरोपीच्या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्याने प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दिली.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment