कोल्हापूर – महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागात कर्नाटक सरकारकडून अत्याचार सुरूच आहेत. याच्या निषेधार्थ महाराष्ट्र एकीकरण समितीकडून आज कोल्हापुरात धरणे आंदोलनाची हाक दिली होती. त्याला प्रतिसाद देत हजारो सीमाबांधव आज सकळी कोल्हापूरकडे रवाना झाले. बेळगावरून कागलमध्ये आगमन होताच महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. कागलमधून एकीकरण समितीचे कार्यकर्ते रॅलीने कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी त्यांचे कोल्हापुरातील सर्वपक्षीयांनी उत्स्फूर्त स्वागत करत पाठिशी असल्याची ग्वाही दिली.
सीमावासियांनी बेळगावमधील कर्नाटक विधीमंडळाच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने महामेळावा आयोजित केला होता. त्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारुन दडपशाही करुन पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना अटक केली होती. त्याचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्र एकीकरण समितीची २१ डिसेंबर रोजी मराठा मंदिर येथे बैठक पार पडली होती. या बैठकीत सगळ्यांची मते जाणून घेतल्यानंतर धरणे आंदोलनाचा निर्णय घेण्यात आला होता. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार मनोहर किणेकर होते. महाराष्ट्र सरकारने एक दिवस महाराष्ट्र बंद करुन आपण सीमावासियांच्या पाठिशी आहोत असे कर्नाटक सरकार आणि कन्नड संघटनांना दाखवून द्यावं असं मतही बैठकीत व्यक्त करण्यात आले.
कोल्हापुरात धरणे आंदोलनात सहभागी होण्यासाठी दोन ते अडीच हजार कार्यकर्ते आले. एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांचे कोल्हापुरातील शिवाजी चौकात आगमन झाल्यानंतर जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी सर्वपक्षीय नेते, कार्यकर्ते उपस्थित होते. दसरा चौकात राजर्षी शाहूंच्या पुतळ्याला अभिवादन करून दसरा चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय मोर्चाला सुरुवात झाली. सुमारे दीडच्या सुमारास मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पोहोचला. जिल्हाधिकारी कार्यालसमोर धरणे आंदोलनानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्या नावे कोल्हापूरचे प्र. जिल्हाधिकारी संजय शिंदे यांना मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्यायाबाबत निवेदन देण्यात आले.