कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभेत नऊ जणांची राज्यपालांकडून नियुक्ती करण्यात आली. यामध्ये कोल्हापुरातून प्रा. डॉ. घनश्याम दीक्षित आणि शहनील देसाई – महागावकर यांचा समावेश आहे. सांगली जिल्ह्यातील श्रीनिवास उर्फ विशाल गायकवाड आणि संजय परमणे या माजी अधिसभा सदस्यांची राज्यपालांकडून सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यपाल भवनातून याबाबत पत्र शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ . डी . टी . शिर्के यांना देण्यात आले. शिवाजी विद्यापीठाचे संचालन अधि सभा आणि व्यवस्थापन परिषदेकडून केले जाते. अधिसभेवर काही सदस्य, पदवीधर शिक्षक यातून निवडून जातात तर काही सदस्यांची नियुक्ती कुलपती करतात. शिवाजी विद्यापीठाच्या अधिसभा सदस्यांची निवडणूक गेल्या महिन्यात झाली होती. त्यानंतर राज्यपाल भवनातून नियुक्त सदस्यांची नावे पत्राद्वारे कुलगुरू डॉ. शिर्के यांना पाठवण्यात आली.
राज्यपालांचे मुख्य सचिव संतोष कुमार यांनी याबाबतचे पत्र पाठवले. यामध्ये सांगली सातारा कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील तज्ज्ञ व्यक्तींची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्यातून शहनिल महागावकर, डॉ. घनश्याम दीक्षित आणि काव्यश्री नलावडे यांची निवड करण्यात आली आहे. सांगली जिल्ह्यातून श्रीनिवास उर्फ विशाल गायकवाड, संजय परमणे डॉ. मनोजकुमार पाटील, वनिता तेलंग यांची नियुक्ती करण्यात आली. सातारा जिल्ह्यातून सारंग कोल्हापुरे यांना नियुक्त करण्यात आले. डॉ . घनश्याम दीक्षित हे विद्यापीठातील वनस्पतीशास्त्र विभाग प्रमुख म्हणून निवृत्त झाले आहेत. विद्यापीठातील निवृत्त प्राध्यापकांची अधिसभा सदस्य म्हणून राज्यपालांकडून नियुक्ती होण्याची ही पहिलीच घटना आहे .