पुणे – पुण्यामध्ये ‘धडाकेबाज लोकनेते देवेंद्र फडणवीस’ या पुस्तकाचे प्रकाशन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते करण्यात आले आहे. पुणे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या देशभर गाजलेल्या भाषणांचा संग्रह करण्यात आला असून ही भाषणे पुस्तक रूपी उपलब्ध झाली आहेत.
या कार्यक्रमात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना नाव न घेता जोरदार टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस एक अभ्यासू व्यक्तिमत्त्व आहेत. त्यामुळेच या महाराष्ट्रामध्ये एका माणसाला खूपच भीती वाटत आहे. असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. चंद्रकांत पाटलांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी आणि भाजपमध्ये संघर्ष आणखी पेटण्याची शक्यता आहे.