कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या झोंबिवली या मराठीतील पहिल्या झोंबीपटाच्या निमित्ताने चर्चेत आलेल्या वैदेही परशुरामीची अभिनयक्षेत्रात एन्ट्री कशी झाली याची स्टोरी भलतीच रंजक आहे. तिला खरंतर सिनेमात काम करायचच नव्हतं. मग ती सिनेमात आली तरी कशी.
मराठीच नव्हे तर तिने अभिेनयाच्या जोरावर बॉलिवूडमधील दोन सुपरहिट सिनेमातही डंका वाजवला. शिक्षणाने वकील असलेली वैदेही परशुरामी एक छंद म्हणून कथ्थक शिकायला गेली आणि त्यातूनच अभिनयाची संधी मिळवून अभिनेत्री झाली. कथ्थकच्या मंचावर तिचा डान्स पाहून तिला सिनेमाची ऑफर मिळाली. सगळच कसं अनप्लॅन्ड…पण हा तिच्या आयुष्याचा प्रवास तीही खूप एन्जॉय करते.
अनेकांच्या आयुष्यात त्यांना करायचं असतं एक पण नशीब वेगळीच संधी घेऊन उभं असतं. अशीच संधी अभिनेत्री वैदेहीपरशुरामी या अभिनेत्रीच्या आयुष्यात आली आणि फक्त कथ्थक नृत्यातच करिअर करायचे असं ठरवणाऱ्या वैदेहीच्या करिअरची गाडी अभिनयात वेगाने धावू लागली.
कथ्थकनृत्य केंद्राच्या वार्षिक कार्यक्रमात दिग्दर्शक महेश कोठारे यांनी तिचा डान्स तर पाहिलाच पण तिच्या देहबोली आणि हावभाव या मुद्रा त्यांनी अचूक टिपल्या. त्यातूनच तिला वेड लावी जीवा या सिनेमाची ऑफर आली आणि आज वैदेही रूपेरी जगातील एक नायिका बनली आहे.
महेश कोठारे तेव्हा आदिनाथ कोठारे याच्यासाठी ‘वेड लावी जिवा’ हा सिनेमा बनवत होते. आता मुलाच्या पदार्पणाचा सिनेमा म्हटल्यावर नायिकेचाही चेहरा फ्रेश हवा अशी त्यांची अपेक्षा होती. वैदेही वकीली शिक्षणाबरोबरच आशा जोगळेकर यांच्याकडे कथ्थक नृत्याचे धडे गिरवत होती.
त्या क्लासला अभिनेत्री ऊर्मिला कानेटकरही येत होती. त्यावेळी ऊर्मिला आणि आदिनाथ यांचे लग्न ठरले होते. त्यामुळे जोगळेकर यांच्या कथ्थक नृत्य केंद्राच्या कार्यक्रमाला कोठोर फॅमिली उपस्थित होती. याच कार्यक्रमात वैदेहीचे नृत्य पाहून तिने आदिनाथची नायिका व्हावे यासाठी कोठारे यांनी वैदेहीच्या घरी संपर्क साधला.
अर्थात वैदेहीला सिनेमात कामच करायचे नसल्याने तिनेही नकार कळवला. वैदेहीच्या आईलाही तिने सिनेमात काम करू नये असे वाटत होते. पण वैदेहीचे वडील कॉलेजमध्ये असताना नाटकात काम करायचे. त्यांना अभिनयाची आवड होती.
वैदेही सांगते, मला अभिनयाच्या वाटेला जायचे नाही हे पक्कं होतं, पण बाबा म्हणाले की एकदा प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. ऑडीशन देण्याचा अनुभव घे. बाबांचं ऐकून मी तयार झाले आणि ऑडिशनमध्येही मी जो संवाद बोलले तो महेश कोठारे यांना आवडला.
बाबांनी म्हटल्याप्रमाणे, काय हरकत आहे असा विचार करून मी हा सिनेमा स्वीकारला आणि माझे या क्षेत्रात पहिले पाऊल पडले. सुरूवातीला नकार देणाऱ्या वैदेहीलाही अभिनयात रस वाटू लागला आणि त्यानंतर सिम्बा या हिंदी सिनेमाची तिला ऑफर आली.
शिवाय महेश मांजरेकर यांच्या एफ यू फ्रेंडशिप अनलिमिटेड या सिनेमातही ती दिसली. हा सिनेमा फारसा चालला नसला तरी वैदेहीच्या अभिनयाचे कौतुक झाले. रंगमंचावरील एक हुकमी एक्का म्हणजे डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या बायोपिकमध्ये कांचन घाणेकर ही भूमिका साकारून सुबोध भावे, सोनाली कुलकर्णी यासारख्या तगडय़ा कलाकारांसमोर तिने आपले अभिनय कौशल्य सिद्ध केले. या क्षेत्रात आपल्याला यायचेच नाही असं म्हणणारी पण जेव्हा तिच्यासमोर संधी आली तेव्हा त्या संधीला स्वीकारत आपले बेस्ट देणारी वैदेही हिने डॉ. घाणेकर या सिनेमातील अनुभवावर याच क्षेत्रात करिअर करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले.
एफयू फ्रेंडशीप अनलिमिटेड या सिनेमासाठी पॉप्युलर फेस ऑफ दि इअर हा पुरस्कार वैदेहीने पटकावला आहे. तर आणि डॉ. काशिनाथ घाणेकर या सिनेमासाठी तिला मोस्ट नॅचरल परफॉर्मन्स व युथफुल फेस पुरस्कार मिळाला आहे.
शास्त्रीय नृत्याची प्रचंड आवड असलेली वैदेही प्राण्यावरही खूप प्रेम करते. कोणतीही गोष्ट आतातायीपणे घ्यायची नाही. विचार करून निर्णय घ्यायचा हा वैदेहीचा लाइफ फंडा आहे. म्हणूनच वजीर या हिंदी सिनेमातील छोटी पण लक्षात राहणारी भूमिका तिने निवडली.
वृंदावन, कोकणस्थ या सिनेमातील तिचा अभिनय पाहता तिची सिनेमाची निवड किती चोखंदळ आहे हे लक्षात येते. सिनेमा निवडण्याच्या बाबतीत विचारी असलेली वैदेही खऱ्या आयुष्यात मात्र खूपच चुलबुली आहे. खरंतर अभिनेत्री गॉसिपपासून लांब राहतात, पण वैदेहीला मैत्रीणींना जमवून गॉसिप करायला प्रचंड आवडतं. सध्या तरी ती झोंबिवली या सिनेमामुळे प्रसिध्दीच्या झोतात आली आहे.
अनुराधा कदम