पश्चिम महाराष्ट्र

शिवाजी विद्यापीठात फ्रीस्टाईल कुस्ती स्पर्धांना जल्लोषी सुरवात

कोल्हापूर – शिवाजी विद्यापीठात आजपासून २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील अखिल भारतीय आंतरविद्यापीठ फ्रीस्टाईल कुस्ती (पुरूष) स्पर्धांना मोठ्या जल्लोषात सुरवात झाली. स्पर्धेच्या पहिल्या दिवशी ५७ किलो, ६५ किलो, ७४ किलो आणि ८६ किलो अशा चार वजनी गटांमधील ४८० सामने रंगले.

विद्यापीठाच्या राजमाता जिजाऊसाहेब सभागृहात आज सकाळी भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा निरीक्षक सुरेश मलिक, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे उपाध्यक्ष संभाजी वरूटे, शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडा अधिविभागाचे संचालक डॉ. शरद बनसोडे, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक तथा माजी क्रीडा विभागप्रमुख डॉ. प्रकाश गायकवाड यांच्या उपस्थितीत ध्वजवंदन होऊन स्पर्धांना सुरवात झाली. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील आणि प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांनी सकाळच्या सत्रात स्पर्धास्थळास भेट देऊन पाहणी केली. क्रीडा संचालकांसह स्पर्धा निरीक्षकांची भेट घेऊन स्पर्धा सुरळीत होण्याच्या अनुषंगाने सूचना केल्या.

आज सकाळी सहा वाजल्यापासूनच दाखल झालेल्या कुस्तीपटूंची वजने घेण्यात आली. त्यानंतर सकाळी नऊच्या सुमारास स्पर्धांना प्रत्यक्ष सुरवात झाली. दिवसभरात चार मॅटवर ५७ किलो वजनी गटात १२२,  ६५ किलोमध्ये १२७, ७४ किलो गटात ११५ आणि ८६ किलो वजनी गटात ११६ असे एकूण ४८० सामने झाले. सामने रात्री उशीरापर्यंत सुरू राहिले. सध्या सुरू असलेल्या फ्री स्टाईल कुस्ती प्रकारात शिवाजी विद्यापीठाच्या दहा खेळाडूंचा सहभाग आहे. सकाळच्या सत्रात शिवाजी विद्यापीठाअंतर्गत गगनबावडा येथील पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव महाविद्यालयाचा पैलवान अमोल बाबुराव बोंगार्डे याने गुजरात विद्यापीठाच्या शाहेबाज खानला पराभूत करून पुढील फेरीत प्रवेश केला.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment