महाराष्ट्र सखी

हरवला माई चा हात, लेकरे झाली आज अनाथ

अनाथांची माय : सिंधूताई सपकाळ

” माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेल्या तान्ह्या सम तोंड पसरी शिवार” गदिमांच्या त्या ओळींनी काळजात घर केले.’ माझ्या लेकरांसाठी मी तुमच्याकडे आली आहे. तुमच्यापुढे पदर पसरते आहे. तुम्ही मदत केली तर त्यांच्या पोटाला दोन घास मिळतील. माझ्या लेकरांना मदत करा रे! अशी ह्रदयाला हात घालणारी विनवणी त्या समोरच्या समुदायाला करत.

BY: दमयंती पाटील

    ‘ वाणसामान बांधून आणलेला कागद मी लपवून ठेवत असे. म्हशी चरायला घेऊन जाताना घरातील कुणाच्याही न कळत ते  सोबत घेई. आणि रानात गेल्यावर त्यावरची अक्षरे वाचत असे. माझी वाचनाची भूक मी अशी भागवत असे. एकदा असाच एक कागद हातात आला. त्यावरच्या ओळी होत्या,  ” माऊलीच्या दुग्धापरी आले मृगाचे तुषार, भुकेल्या तान्ह्या सम तोंड पसरी शिवार” गदिमांच्या त्या ओळींनी काळजात घर केले.’ माझ्या लेकरांसाठी मी तुमच्याकडे आली आहे. तुमच्यापुढे पदर पसरते आहे.

तुम्ही मदत केली तर त्यांच्या पोटाला दोन घास मिळतील. माझ्या लेकरांना मदत करा रे! अशी ह्रदयाला हात घालणारी विनवणी त्या समोरच्या समुदायाला करत. अनाथ, बेवारस, रस्त्यावरच्या मुलांना त्या उचलून आणत. त्याला न्हाऊमाखू घालत. त्याला आपलं नाव देत. आईच्या मायेनं त्याचा सांभाळ करत. जोजवत, शिकवत, स्वावलंबी बनवत. आणि त्यांचे लग्न ही लावून देत. त्यांचा गोडीने चाललेला संसार डोळे भरून पहात. अभिमानाने सर्वांना कौतुक सांगात. अशा एक दोन नव्हे हजारो मुलांच्या त्या आई झाल्या. होय. त्याच या सिंधूताई सपकाळ ज्यांना जन्मदात्या आईवडिलांनी नाकारले. कुटुंबाने नाकारले. नवऱ्याने नाकारले. समाजाने नाकारले. त्यांनीच पुढे हजारो अनाथांचे आईपण स्वीकारले.

चिखदऱ्याच्या जंगलात आडवळणी असलेल्या नवरगाव येथे १४नोव्हेंबर १९४७ रोजी गुराख्याच्या घरी सिंधूताईंचा जन्म झाला. मुलगी झाली म्हणून नाकडोळे मुरडत आईवडिलांनी तिचं नाव ठेवलं चिंधी. सहा सात वर्षांची चिंधी म्हशी वळता वळता आपल्या आईला कळू नये म्हणून चोरून शाळेत जाऊन बसायची. अक्षर ओळख करून घेवू लागली. तीला शाळेची गोडी वाटू लागली. पण आईला ते मान्य नव्हते.

चोरून शाळेत जातेय हे कळताच आईने नऊ वर्षाच्या चिंधीचे तिच्यापेक्षा वयाने २४ वर्षांनी मोठ्या असणाऱ्या श्रीहरी सपकाळ यांच्याशी लग्न लावून दिले. सिंधूताईंची अवस्था आगीतून उठून फुफाट्यात पडल्यासारखी झाली. खेळण्याबागडण्याचे वय होते. पण सिंधूताईंना घरकाम, धुणीभांडी, गायीगुरांचे शेणघाण, चारा पाणी सगळं करावं लागे. नवरा म्हणजे काय? संसार म्हणजे काय ? हे कळाचे वय नव्हते. पण तोपर्यंत त्या तीन मुलांच्या आई झाल्या. अंगाला अंगभर धडुत नाही. पोटाला पोटभर भाकरी नाही. घरातील शिळंपाकं सिंधुताईच्या वाट्याला असे.

अशात त्या चौथ्यांदा गरोदर राहील्या. विचारी सिंधूने गावातल्या मातब्बराचा शेणखत लिलावातील घोटाळा उघडकीस आणला. तिथेच तिच्या जन्माचे दशावतार सुरू झाले. बिथरलेल्या मातब्बराने नवऱ्याचे कान भरले. सिंधूला नववा महिना सुरू होता. दिवसात पडलेल्या तिला नवऱ्याने मारहाण करून घराबाहेर हकलले. माराने अर्धमेल्या झालेल्या तिला जनावरांच्या लाखांनी मरून जाईल म्हणून गोठ्यात आणून टाकले.

पण दैव बलवत्तर. कडाक्याच्या थंडीत, गोठ्यातील गाईचा आडोसा घेऊन तीने मुलीला जन्म दिला. नवऱ्याने घरात घेतले नाहीच पण गावातून ही हाकलले. माहेरी आईनेही आसरा दिला नाही. चार दिवसांच्या बाळाला घेऊन चार दिवसांची उपाशी सिंधूताई रेल्वेच्या रूळावर आत्महत्या करण्यासाठी गेली. पण तान्ह्या मुलीने फोडलेला  टाहो ऐकून मातृत्वाचा पान्हा फुटला. ती परत फिरली. तिच्यातील मातृत्व जागे झाले. आणि मुलीसाठी जगण्याचा निर्धार झाला.

वेगवेगळ्या रेल्वेस्थानकांवर भीक मागून सिंधूताई पोटभरू लागली. आजुबाजूला तीने तिच्यासारखे असाहय्य लहान मुले, म्हातारी माणसे, अपंग जीव पाहीले. आणि या सगळ्यासाठी जगण्याचा तिचा निर्धार पक्का झाला. या अनाथांचा सांभाळ करण्यासाठी सिंधूताईंनी १९९४ मध्ये पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यात कुंभारवळण येथे ममता बाल सदन संस्था सुरू केली. या कामात अडथळा नको म्हणून त्यांनी आपली मुलगी ममता हिला दगडूशेठ हलवाई ट्रस्टच्या मदतीने सेवासदन येथे दाखल केले.

आणि अनाथ  मुलांच्या संगोपनाच्या कार्याला त्यांनी वाहून घेतले. आपल्या प्रवाही वक्तृत्वच्या जोरावर त्या समोरच्या समुहाच्या दातृत्वाला साद घालत. आपला पदर पसरत. जे काही जमा होईल त्यावर या अनाथ मुलांचा सांभाळ करण्यासाठी खर्च करत. बोलणारे तोंड एक होते. पण खाणारी तोंडे हजार होती. त्यामुळे मदतीसाठी पायाला भिंगरी लावून महराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरल्या. शाळा, विविध संस्था यांना मदतीचे आवाहन केले. आणि गरजुंसाठी संस्था उभ्या केल्या. हडपसर येथे बाल निकेतन संस्था, चिखलदऱ्यात सावित्रीबाई फुले मुलींचे वसतिगृह, वर्धा येथे अभिमान बाल भवन, सासवड येथे ममता बाल सदन अशा संस्थांमध्ये हजारो अनाथांचे अश्रू पुसले गेले.

मायेचे घास भरवले गेले. कोलमडून पडलेल्या अनेक जीवांचा त्या आधार बनल्या. त्यांच्या या सेवाभावी समर्पित वृत्तीने केवळ अनाथांचीच नव्हे तर उभ्या महाराष्ट्राची माई बनल्या. आपल्या जीवनाची चित्तरकथा त्यांनी ‘मी वनवासी ‘ या आत्मवृत्तात शब्दबध्द केली आहे. त्यांच्या संघर्षाचे चित्रण मी सिंधूताई सपकाळ या चित्रपटाद्वारे मराठी जनांपुढे आले.

संकटांच्या, मानहानीच्या, अनिश्चिततेच्या ज्वाळांनी वेढलेल्या त्यांच्या आयुष्यात उतारवयात सन्मानाचे अनेक क्षण आले. राष्ट्रीय, अंतरराष्ट्रीय पातळीवरील सुमारे ७५०पुरस्कारांनी त्या सन्मानित झाल्या. महाराष्ट्र शासनाने डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार व अहिल्याबाई होळकर पुरस्कार देऊन त्यांना सन्मानित केले होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना मिळाला होता. भारत सरकारने २०२१मध्ये पद्मश्री पुरस्काराने त्यांना गौरविले होते.

नोव्हेंबर २०२१ मध्ये पुण्यातील गॅलेक्सी हाॅस्पीटलमध्ये त्यांच्यावर शस्त्रक्रिया झाली होती. तेव्हा पासून त्यांच्या तब्येतीत चढ उतार सुरू होते. या हाॅस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना काल (ता.४) त्यांना ह्रदयविकाराचा झटका आला. त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली. स्वत:च्या आयुष्यातील जखमा लपवून दुसऱ्यांच्या वेदनांवर फुंकर घालणाऱ्या, आपल्या आयुष्यातील काळोखाकडेपाठ फिरवून दुसऱ्यांच्या जीवनात आनंद फुलवणाऱ्या या माईस विनम्र अभिवादन!

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment