सोलापूर – राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या बद्दल बदनामीकारक वक्तव्य झाल्याने संतापाची लाट उसळली आहे. त्याचे पडसाद संपूर्ण महाराष्ट्रात उमटत आहेत. पिंपरी चिंचवड मध्ये चंद्रकांत पाटील यांच्यावर शाई फेकण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असताना सोलापूर शहर उत्तर मधील भाजपा आमदार विजयकुमार देशमुख यांच्यावर बहुजन समाजातील एका तरुणाने शाई फेकली आहे. सम्राट चौक येथील एका सामुदायिक विवाह सोहळ्यात शाई फेक करण्यात आली. न्यू बुधवार पेठ येथील बुद्धराष्ट्र प्रतिष्ठान यांच्यावतीने सर्वधर्मीय सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. मंगळवार १३ डिसेंबर रोजी सायंकाळी ही घटना घडली आहे.
भीम आर्मीने इशारा दिला होता
सोलापूर भारतीय जनता पार्टी च्या नेत्यांना भीम आर्मीने जाहीर इशारा दिला होता. जो पर्यंत चंद्रकांत पाटील यांवर गुन्हा दाखल होत नाही तो पर्यंत भाजपाच्या एका ही नेत्याला कार्यक्रमास जाऊ देणार नाही फिरू देणार नाही आणि जर गेलेच तर तोंडाला काळ फासल्याशिवय भीम आर्मी शांत बसणार नाही असा इशारा दिला होता.
विवाह सोहळ्याला उपस्थित असलेल्या भाजपा आमदारावर शाई फेक
सोलापूर शहरातील न्यू बुधवार पेठ येथे एका विवाह सोहळ्याला आमदार विजयकुमार देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. ते त्याठिकाणी गेले असता भीम आर्मीच्या अजय मैनदरगीकर या कार्यकर्त्यांने भाजप आमदारावर शाई फेकून त्यांना काळा फासण्याच्या प्रयत्न केला आहे. आमदार देशमुख यांच्या अंगावर शाई फेकण्यात आल्याची माहित होताच उपस्थित पोलिसांनी ताबडतोब भीम आर्मीच्या कार्यकर्त्यांस ताब्यात घेतले. पोलीस निरीक्षक शिवाजी राऊत यांनी भीम आर्मीच्या युवकाला ताब्यात घेऊन जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात घेऊन गेले आहे. आमदार देशमुख हे शर्ट बदलून त्या कार्यक्रमाला तिथेच थांबले आहेत अशी माहिती मिळाली.