सांगली – एसटी बसमधील महिला प्रवाशांच्या बॅगेतील सोन्या-चांदीचे दागिने चोरणाऱ्या दोन सराईत महिला चोरट्यांची आंतरराज्य टोळी जेरबंद करत सुमारे साडेनऊ लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. विटा पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
याबाबत विटा पोलिसांच्याकडून मिळालेली माहिती,याप्रमाणे दि.२६ नोव्हेंबर २०२२ रोजी सकाळी सव्वाअकरा वाजण्याच्या दरम्यान विटा बसस्थानकातून गुहागर ते तुळजापुर जाणाऱ्या एसटी बसमधील महिला प्रवासी निता सोमनाथ निकम (वय ३४ वर्षे रा. किणी वाठार ता. हातकणंगले जि. कोल्हापुर) यांच्या बॅगेतील सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्याने लंपास केल्याबाबत विटा पोलीस ठाणेस गुन्हा दाखल झाला होता. काही संशयित महिला विटा बसस्थानक परिसरात संशयितरित्या वावरत आहेत, अशी माहिती विटा पोलीस ठाणेकडील गुन्हे प्रकटीकरण पथकाला मिळाली ,त्यानुसार संशयित महिलांना ताब्यात घेवून कसून चौकशी केली असता त्यांनी विटा पोलीस ठाण्याकडील दोन दाखल गुन्हयांची कबुली दिली. त्यांच्याकडे त्यांच्या नावाबाबत चौकशी केली असता त्यांनी प्रथमदर्शी पल्लवी शिवाजी टेके व गिता शिवाजी टेके (रा. औरंगाबाद) अशी खोटी नावे सांगितली होती. त्यामुळे त्यांचा कौशल्याने व तांत्रिकदृष्ट्या तपास करुन त्यांची खरी नावे आर. ईश्वरी (वय २८) व एम. दिपा (वय २२, दोघी रा.तुमकुर राज्य कर्नाटक, सध्याचा पत्ता रा. तासवडे ता. कराड) असा असल्याचे निष्पन्न झाले.
त्यानंतर या दोन्ही चोरट्या महिलांना अटक करून या दोन्ही गुन्हयातील चोरलेले सोन्याचे दागिने हे त्यांचा सध्याचा पत्ता रा. तासवडे टोलनाका ता. कराड येथील भाडयाचे घरात ठेवलेले एकुण ९ लाख ५१ हजार ३५० रुपये किंमतीचे १७९.५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. या जप्त केलेल्या दागिन्यांमध्ये २ लाख ९१ हजार ५०० रुपये किंमतीचे ५ तोळे ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, २ लाख ६५ हजार रुपये किंमतीचे ५ तोळे वजनाचा सोन्याचा हार, ५३ हजार रुपये किंमतीचे १ तोळे वजनाचे झुमके व टॉप्स, ३७ हजार १००/- हजार रुपये किंमतीच्या ७ ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या छोटया लहान मुलीच्या दोन बांगडया, ३१ हजार ८०० रुपये किंमतीची ६ ग्रॅम वजनाची सोन्याची चैन व गणपतीचे पेंडन्ट, २६ हजार ५०० रुपये किंमतीचे ५ ग्रॅम वजनाची लेडीजची ऑरेंज रंगाचा खडा असलेली सोन्याची अंगठी, २१ हजार २०० रुपये किंमतीची ४ ग्रॅम वजनाची लेडीजची फुलाची डिझाईन व त्यामध्ये बारीक पांढरे रंगाचे खडे असलेली सोन्याची अंगठी, २३ हजार ८५० रुपये किंमतीची ४.५ ग्रॅम वजनाची सोन्याची ठुशी, १ लाख ३२ हजार ५०० रुपये किंमतीची १ दोन पदरी सोन्याची मोहनमाळ २.५ तोळे वजनाची, ५३ हजार रुपये किंमतीची १ सोन्याची अंगठी १० ग्रॅम वजनाची, ५ हजार ३०० रुपये किंमतीची १ सोन्याची अंगठी १ ग्रॅम वजनाची, १० हजार ६०० रुपये किंमतीची १ सोन्याची अंगठी २ ग्रॅम वजनाची असे एकूण १७९.५ ग्रॅम वजनाचे सुमारे ९ लाख ५१ हजार ३५० रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत.