रायगड – रायगड जिल्ह्यात पोलीस भरती करण्यासाठी आलेल्या दोन उमेदवारांकडे तो उत्तेजक द्रव्य आढळून आल्याने मोठी खळबळ उडाली आहे. अन्य एकजण या योगेश्वरासोबत आला होता अशी माहिती मिळत आहे. पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी वेळी हा सगळा धक्कादाय प्रकार समोर आला आहे. दरम्यान या उमेदवारांचे रक्ताचे नमुने घेऊन मुंबई व नवी मुंबई येथील लॅबमध्ये वैद्यकिय तपासणीकरिता पाठविण्यात आले आहेत. त्याचे अहवाल प्राप्त झाल्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.
७ जानेवारी रोजी शनिवारी एका उमेदवाराची मैदानी चाचणी झाली होती तर दुसऱ्या उमेदवाराची चाचणी रविवारी होणार होती. मात्र त्यांची मैदानी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. हे तीनजण पुणे आणि अहमदनगर येथून रायगडमध्ये पोलीस भरतीसाठी आले होते. वरसोली इथल्या कॉटेजमध्ये त्यांचं वास्तव्य होतं.
अलिबाग पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचाऱ्यांना नाईक आळी येथील एका कॉटेजमध्ये पोलीस भरती मैदानी चाचणीकरीता आलेल्या काही उमेदवारांकडे औषधीद्रव्ये असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार त्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता त्या कॉटेजमध्ये तिघेजण राहत होते. त्यामधील दोघेजण भरती प्रक्रीयेसाठी आले होते.
तर त्यातील एक त्यांच्यासोबत आला होता. पोलिसांनी घटनास्थळाची झडती घेतली असता एक ग्रे रंगाचे चैनचे पाउच मिळून आले. त्यामध्ये दोन न्युरोकाइन्ड गोल्ड इंजेक्शन असे नाव असलेल्या औषधी द्रव्यांनी भरलेल्या काचेच्या तीन बंद बॉटल, पाच ओमेगा व्हीआयटी सीई टॅबलेटस, तीन निप्रो कंपनीच्या सिरींज सुईसह, एक डिस्पोव्हॅन कंपनीची हायपोडर्मिक सिरींज, डिस्पोव्हॅन कंपनीच्या सहा पॅक बंद असलेल्या ४४ डीच्या नीडल्स, एक लाल रंगाची कॅप्सुल, डिस्पोव्हॅन कंपनीच्या दोन ३२ एनच्या नीडल्स, एक बीडी यू ४० इन्सुलिन असे द्रव्य असलेली सिरींज नीडलसह त्यामध्ये औषधी द्रव्य भरलेले अशा प्रकारचे साहित्य सापडले आहे.
याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली असता मैदानी चाचणीच्या अगोदर या गोळया, औषधे घेतल्यास त्याचा फायदा मैदानी चाचणीसाठी होत असल्याचे त्यांनी सांगीतले. या घटनेची चौकशी अलिबाग पोलीस करीत असुन चौकशीमध्ये पुरावे आढळून आल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.
औषधीद्रव्य व गोळयांचा वापर मैदानी चाचणीच्यापूर्वी केला जात असल्याने सापडलेले साहित्य जप्त करण्यात आले आहे. या तिन्ही व्यक्तींचे जिल्हा सामान्य रूग्णालय, अलिबाग येथील वैद्यकीय अधिकाऱ्यांच्याकडून रक्ताचे नमुने घेण्यात आले आहेत. रक्ताचे नमुने तपासणीसाठी मुंबई व नवी मुंबई येथे पाठविण्यात येत आहेत.तुर्तास तिन्ही व्यक्तींना सोडून देण्यात आलेले असून त्यांच्या रक्ताच्या नमुन्यांचा तपासणी अहवाल प्राप्त झाल्यानंतर पुढील कारवाई केली जाणार आहे.
उमेदवारांनी शासनाने प्रतिबंधित केलेले कोणतीही वस्तु वा पदार्थ किंवा उत्तेजक द्रव्य सेवन करून भरती प्रक्रियेला सामोरे न जाता प्रामाणिकपणे प्रयत्न करावेत. जे उमेदवार असे गैरप्रकार करताना आढळुन येतील त्यांचेवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे.