सिंधुदुर्ग – मालवण तालुक्यात कर्ली तसेच कालावल खाडी पात्रात अनधिकृत रित्या वाळू उपसा तसेच विनापरवाना वाळू वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू असून गेल्या काही दिवसात मालवणचे प्रभारी तहसीलदार श्रीधर पाटील यांनी या वाळू उत्खनन व वाहतुकीवर कारवाईचा बडगा उगारला आहे. काल मध्यरात्री तहसीलदारांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस कर्मचाऱ्यांच्या पथकाने देवली सडा येथे वाळू साठा केलेल्या ठिकाणी उभे असलेले तब्बल २८ डंपर पकडून मोठी कारवाई केली आहे.
तसेच तोंडवळी येथेही कालावल खाडी पात्रात वाळू उपसा सुरू असलेल्या ठिकाणी २६ दगडी रॅम्प उध्वस्त केले आहे. महसूल विभागाच्या या धडक कारवाई मुळे बेकायदेशीर वाळू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत. दरम्यान, महसूल विभागाच्या या कारवाईने काही वाळू माफियांनी राजकीय व्यक्तीशी संधान बांधून सेटलमेंट साठी हालचाली सुरू केल्याचे वृत्त असून या प्रकाराने महसूल विभागावर काही जणांकडून दबाव टाकला जात असल्याची खुलेआम चर्चा सुरू झाली आहे.
मालवणचे तहसीलदार श्रीधर पाटील यांनी तहसीलदार पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून विना परवाना वाळू वाहतूक करणाऱ्या डंपरवर कारवाईचे सत्र सुरू केले आहे. कर्ली खाडी पात्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृतपणे वाळू उपसा सुरू असून देवली येथून सागरी महामार्गावरून या वाळूची वाहतूक सुरू असते. या पार्श्वभूमीवर तहसीलदार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली नायब तहसीलदार गंगाराम कोकरे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पोलीस निरीक्षक एस. ए. भोसले (ओरोस), मालवण पोलीस निरीक्षक विजय यादव, पीएसआय झांरणे यासह महसूल व पोलीस कर्मचारी यांच्या पथकाने मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास सागरी महामार्ग वरून आतील कच्च्या रस्त्यावर देवली सडा येथे धडक कारवाई करत २८ डंपर पकडले असून व डम्प केलेला वाळू साठा ताब्यात घेतला आहे. या डंपर मधील चालक पळून गेले आहेत. तसेच या मार्गावर अनेक ठिकाणी वाळूचे साठे करून ठेवल्याचे दिसून आले आहे. या सर्वांचे पंचनामे सुरू होते.
ज्या डंपर मध्ये वाळू साठा भरून होता ते डंपर मालवण तहसील कार्यालयात नेण्याची कारवाई सुरू होती. तर उर्वरित डंपर व वाळू साठा यांचा पंचनामा सुरू होता. डंपर मध्ये वाळू भरण्यासाठी असलेला एक जेसीबी पळून गेला असून त्याचीही माहिती घेण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती तहसीलदार पाटील व महसूल पथकाने दिली आहे. मध्यरात्री सुरू झालेली कारवाई सकाळ पर्यत सुरू होती. दरम्यान, कालावल खाडी पात्रात देखील मोठ्या प्रमाणात अनधिकृत रीतीने वाळू उपसा व वाहतूक सुरू आहे. त्यामुळे महसूलच्या पथकाने मध्यरात्री तोंडवळी येथे खाडी किनाऱ्यावर धडक देत वाळू भरण्यासाठी बांधलेले २६ दगडी रॅम्प उध्वस्त केले. या दोन्ही कारवाईत जास्त संख्येने महसूल व पोलीस विभागाचे अधिकारी, कर्मचारी सहभागी झाले होते. महसूल विभागाच्या धडक व आक्रमक कारवाईमुळे वाळू व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.