क्रीडा

T20 WC IND vs PAK : पाकिस्तानचा दमदार विजयारंभ; वर्ल्डकपमध्ये पहिल्यांदाच भारताला हरवत रचला नवा इतिहास!

टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेतील उत्कंठावर्धक सामन्यात भारताने पाकिस्तानला १५२ धावांचे आव्हान दिले आहे. दुबईच्या मैदानावर रंगणाऱ्या या सामन्यात पाकिस्तानचा कप्तान बाबर आझमने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदीने सुरुवातीला धडकी भरवणारा स्पेल टाकल भारताचे टेन्शन वाढवले. त्यानंतर कप्तान विराट कोहलीने ऋषभ पंतला सोबत घेत किल्ला लढवला. विराटने जबरदस्त अर्धशतकी खेळी करत पंतसोबत अर्धशतकी भागीदारी केली. आफ्रिदीने भारताच्या रोहित शर्मा आणि केएल राहुल यांना स्वस्तात तर डावाच्या शेवटी विराट कोहलीला तंबूत धाडले.

केएल राहुल आणि रोहित शर्मा यांनी भारतासाठी सलामी दिली. पाकिस्तानचा जलदगती गोलंदाज शाहीन आफ्रिदीने हिटमॅन रोहित शर्माला शून्यावर पायचीत पकडले. तर तिसऱ्या षटकात त्याने राहुलला क्लीन बोल्ड केले. पाकिस्तानचा वेगवान गोलंदाज हसन अलीने पॉवरप्लेचे शेवटचे षटक टाकले. या षटकात त्याने सूर्यकुमारला यष्टीपाठी झेलबाद केले. पाकिस्तानचा यष्टीरक्षक मोहम्मद रिझवानने सुंदर झेल घेतला. ६ षटकात भारताने ३ बाद ३६ धावा केल्या.

या पडझडीनंतर विराट कोहली आणि ऋषभ पंतने भारतासाठी किल्ला लढवला. १२व्या षटकात पंतने हसन अलीला लागोपाठ २ षटकार खेचले. या षटकात विराट कोहली-ऋषभ पंतने अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पुढच्याच षटकात पंतने आक्रमक अंदाजात शादाब खानला मोठा फटका खेळला, पण तो झेलबाद झाला. पंतने २ चौकार आणि २ षटकारांसह ३९ धावा केल्या. १५व्या षटकात भारताने शतक पूर्ण केले, तर १८व्या षटकात विराटने आपले अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात आफ्रिदीने विराटला बाद केले. विराटने ५ चौकार आणि एका षटकारासह ५७ धावा केल्या. २० षटकात भारताने ७ बाद १५१ धावा केल्या. हरीस रौफने पाकिस्तानसाठी टाकलेल्या शेवटच्या षटकात ७ धावा दिल्या. आफ्रिदीने ३१ धावांत ३, तर हसन अलीने ४४ धावांत २ बळी घेतले.

पाकिस्तानचा दमदार विजयारंभ

१८व्या षटकात पाकिस्ताने विजयावर शिक्कामोर्तब केले. बाबर आणि रिझवान यांनी १५२ धावांची अभेद्य भागीदारी रचत भारताला १० गड्यांनी मात देण्यात सिंहाचा वाटा उचलला.

About the author

वृत्त विभाग दिल्ली

Leave a Reply

Leave a Comment