क्रीडा

T20 WC IND vs SCO : रोहित-राहुलकडून स्कॉटलंडची धुलाई; भारताचा सहज विजय!

आयसीसी टी-२० विश्वचषक २०२१ स्पर्धेत आज भारताने अजून एका मोठ्या विजयाची नोंद केली आहे. भारताने दुबईच्या मैदानावर दुबळ्या स्कॉटलंडवर ८ गड्यांनी सहज विजय मिळवत उपांत्या फेरीचे आव्हान शाबुत ठेवले. आज आपला ३३वा वाढदिवस साजरा करणारा भारताचा कप्तान विराट कोहलीने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.

भारताकडून रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ३ बळी घेत स्कॉटलंडच्या एकाही फलंदाजाला मैदानावर जास्त काळ टिकू दिले नाही. प्रत्युत्तरात भारतीय सलामीवीर रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी दे-दणादण फटकेबाजी केली. राहुलने १८ चेंडूत अर्धशतक ठोकल्यामुळे भारताने हे आव्हान ६.३ षटकातंच ओलांडले. या विजयामुळे भारताने नेट रनरेटमध्ये मोठी कमाई केली. त्यांनी ग्रुप बी मध्ये सर्वात चांगला रनरेट मिळवला. रवींद्र जडेजाला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. आता सर्वांचे लक्ष न्यूझीलंड-अफगाणिस्तान सामन्याकडे लागले आहे. अफगाणिस्तानने न्यूझीलंडचा पाडाव केला, तर भारताचा मार्ग सुकर होणार आहे.

भारताचा डाव

रोहित शर्मा आणि केएल राहुल या भारताच्या सलामीवीरांनी पहिल्या षटकापासून हाणामारीला सुरुवात केली. या दोघांनी स्कॉटलंडच्या प्रत्येक गोलंदाजाला १० पेक्षा जास्त धावा कुटल्या. चौथ्या षटकात भारताने अर्धशतक पूर्ण केले. पुढच्या षटकात वेगवान गोलंदाज व्हीलने रोहितला अप्रतिम यॉर्करवर पायचीत पकडले. रोहितने १६ चेंडूत ५ चौकार आणि एक षटकारासह ३० धावा केल्या. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात राहुलने अर्धशतक पूर्ण केले.

१८ चेंडूत राहुलने ५० धावा ठोकल्या. या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर राहुल झेलबाद झाला. त्याने ६ चौकार आणि ३ षटकार ठोकले. सातव्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर सूर्यकुमार यादवने ग्रीव्ह्सला षटकार ठोकत भारताच्या नावे ८ गड्यांनी मोठा विजय नोंदवला. या विजयासह भारताने नेट रनरेटमध्ये मोठी झेप घेतली आहे. भारताचे ४ गुण झाले असून ते आता तिसऱ्या क्रमांवर आहेत.

स्कॉटलंडचा डाव

स्कॉटलंडचे सलामीवीर काइल कोएत्झर आणि जॉर्ज मुन्सी यांनी डावाची सुरुवात केली. भारताचा जलदगती गोलंदाज जसप्रीत बुमराहने तिसऱ्या षटकात स्कॉटलंडचा कप्तान काइल कोएत्झरचा (१) त्रिफळा उडवला. पॉवरप्लेच्या शेवटचे षटकात जलदगती गोलंदाज मोहम्मद शमीने धोकादायक मुन्सीला झेलबाद करत स्कॉटलंडला दुसरा धक्का दिला. मुन्सीने ४ चौकार आणि एका षटकारासह २४ धावा केल्या. सहा षटकात स्कॉटलंडने २ बाद २७ धावा केल्या. मुन्सीनंतर स्कॉटलंडचे फलंदाज बिथरले. फिरकीपटू रवींद्र जडेजाने सातव्या षटकात दोन धक्के दिले.

जडेजाने बेरिंग्टनला आणि क्रॉसलाही तंबूत धाडले. शमीने टाकलेल्या १७व्या षटकात स्कॉटलंडने तीन फलंदाज गमावले. त्याने पहिल्या चेंडूवर मॅकलिओडची (१६) दांडी गुल केली. पुढच्या चेंडूवर शरीफ धावबाद झाला. तिसऱ्या चेंडूवर शमीने अप्रतिम यॉर्कर टाकत अलास्डेअर इव्हान्सला बोल्ड केले. १८व्या षटकात स्कॉटलंडने आपला दहावा फलंदाजही गमावला. बुमराहने मार्क वॉटचा त्रिफळा उडवला. भारताने स्कॉटलंडला १० षटकांपेक्षा जास्त चेंडू निर्धाव खेळवले. स्कॉटलंडने १७.४ षटकात ८५ धावा केल्या. भारताकडून रवींद्र जडेजा आणि मोहम्मद शमी यांनी प्रत्येकी ३ बळी घेतले. तर बुमराहला २ बळी घेता आले.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment