मुंबई

धावती लोकल पकडताना पाय घसरून शिक्षिकेचा मृत्यू

मुंबई – मुंबईतील बोरिवली स्थानकावर नुकतीच सुरू झालेली लोकल ट्रेन पकडण्याचा प्रयत्न करताना पडल्यानं एका शिक्षिकेचा मृत्यू झाला आहे. प्रगती घरत (४३) असं या शिक्षिकेचं नाव आहे.

प्रगती घरत या मालाड येथील एका शाळेत शिक्षिका होत्या. त्या वसई इथं राहत होत्या. त्या दर दिवशी बोरिवली इथं ट्रेन बदलायच्या. मंगळवारी सकाळी नेहमीप्रमाणे त्या बोरिवली स्थानकावर उतरल्या. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्लॅटफॉर्म क्रमांक २ वरून सुटणाऱ्या चर्चगेट ट्रेनच्या सेकंड क्लासच्या डब्यात चढण्याचा प्रयत्न त्या करत होत्या. मात्र, ट्रेन नुकतीच सुरू झाली होती. ती पकडण्याच्या नादात त्यांचा पाय घसरला आणि त्या प्लॅटफॉम व ट्रेनच्या मधील मोकळ्या जागेत अडकल्या. यात त्यांना गंभीर दुखापत झाली.

पोलिसांनी तातडीनं त्यांना रुग्णालयात दाखल करून त्यांच्या नातेवाईकांना ही माहिती दिली. त्यानंतर प्रगती घरत यांना अंधेरीतील कोकिलाबेन अंबानी रुग्णालयात हलवण्यात आलं. मात्र, तिथं उपचारादरम्यान दुपारी पावणे दोनच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. बोरिवली रेल्वे पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment