BY : अनुराधा कदम
अभिनेत्रींना नेहमीच वेगवेगळ्या कॉम्प्लिमेंट मिळत असतात. तुझे स्माइल खूप छान आहे…तुझे लूक्स किती गोड आहेत. तुझी पर्सनॅलिटी किती भारी आहे तर तुझे डोळे किती बोलके आहेत.
अभिनेत्री तेजश्रीलाही नेहमी ही कॉम्प्लीमेंट मिळते की तिचे डोळे खूप छान आहेत. आता इतकी छान स्तुती झाल्यावर तेजश्री प्रधानलाही आनंद होणारच ना.
तेजश्रीलाही तिचे डोळे खूप आवडतात. तिच्यानंतर कुणीतरी तिच्या डोळ्यांनी हे जग पहावं असंही तिला वाटतं आणि म्हणूनच तिने नेत्रदान करण्याचा संकल्प सोडला आहे. मी नेत्रदान करणार आहे…
तुम्हीही करा असं सांगणारा एक मेसेज तिने तिच्या इन्स्टा पेजवर दिला असून तेजश्रीच्या या संकल्पाचे खूपच कौतुक होत आहे.
खरंतर मालिकांकडून सिनेमाकडे असा प्रवास अनेक कलाकारांचा होत असतो, पण तेजश्रीच्या बाबतीत ही गाडी उलटी आली आहे. मराठी सिनेमांमधून तेजश्रीने तिचा मोर्चा मालिकांकडे वळवला आहे.
तुझे नि माझे घर श्रीमंताचे, लेक लाडकी या घरची, होणार सून मी त्या घरची, प्रेम हे, अग्गंबाई सासूबाई आणि अाता लवकरच तिची एन्ट्री होणारी फुलाला सुगंध मातीचा या मालिकांमध्ये तेजश्रीच्या अभिनयाने तिच्या चाहत्यांची मनं जिंकली आहेत.
तेजश्रीने आजवर ज्या ज्या भूमिका केल्या आहेत त्या अत्यंत समजूतदार मुलीच्याच केल्या आहेत. तेजश्री फक्त पडदय़ावरच गुड गर्ल आहे असे नाही तर तिने प्रत्यक्ष आयुष्यातही तिची गुडगर्ल ही इमेज जपली आहे ती एका समाजउपयोगी कामातून.
अनेकदा सेलिब्रिटी असण्याचा फायदा कलाकार वेगवेगळे संदेश देण्यासाठी करत असतात. जसं की पोलिओ डोस, रक्तदान, कोरोना लस घेण्यासाठी लोकांनी पुढे यावे यासाठी कलाकारांची मदत घेतली जाते. ऑनस्क्रिन असे संदेश देणारे कलाकार खरया आयुष्यात याबाबतीत किती गंभीर असतील हा प्रश्न आपल्या मनात असतोच. पण तेजश्रीने याचेच उत्तर तिच्या कृतीतून दिले आहे.
तेजश्री ऑनस्क्रीन जितकी समंजस आहे तितकीच ती रीअल लाइफमध्येही समजूतदार आहे. आपल्याकडील सुंदर गोष्ट जर कुणासाठी मौल्यवान ठरणार असेल तर ते आहेत डोळे.
ज्यांना डोळे नाहीत त्यांना हे जग पाहता येत नाही हा विचार तेजश्रीला अस्वस्थ करतो. आपण समाजासाठी काय करू शकतो हा विचार करताना तेजश्रीच्या आयुष्यातील सर्वात आवडती गोष्ट असलेले तिचे डोळेच जर आपण कुणाला दान करावे असे वाटले आणि तेजश्रीने हा निर्णय घेतला आहे.
सक्षम नावाच्या एका सामाजिक संस्थेचे नेत्रदानातील काम मोठे आहे. या संस्थेच्या माध्यमातून तेजश्रीने नेत्रदानाचा संदेश देत असताना केवळ तो सेलिब्रिटीचा जाहिरात करणारा संदेश वाटणार नाही तर मी स्वत:ही नेत्रदान करणार आहे असं सांगत तेजश्रीने नेत्रदानाचा निर्णय घेतला आहे.
या गोजिरवाण्या घरात या मालिकेपासून तेजश्री प्रधान हे नाव टीव्ही इंडस्ट्रीशी जोडलं गेलं. डोंबिवलीकर असलेल्या तेजश्रीचे अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वीचे आयुष्य अगदी सामान्य कुटुंबात गेलं.
लेक लाडकी या घरची. घर श्रीमंताचं या मालिकांनंतर होणार सून मी या घरची या मालिकेतील जान्हवी या भूमिकेने तिला लोकप्रियता मिळवून दिली. अगदी आपल्या आजूबाजूला दिसणारी सर्वसामान्य मुलगी साकारणारी जान्हवी टीव्ही स्टार बनली. याच मालिकेदरम्यान नायक शशांक केतकरसोबत तेजश्रीने लग्न केले मात्र वर्षभरातच त्यांचा घटस्फोट झाला. या घटनेने तेजश्रीचे आयुष्य बदलून गेले.
आयुष्यातील हे पान पलटून तिचा अभिनयातील प्रवास सुरू राहिला. झेंडा, शर्यत, लग्न पहावे करून या सिनेमांमधून दिसलेल्या तेजश्रीला जोरदार ब्रेक मिळाला तो ती सध्या काय करते या सिनेमातून. तिने साकारलेल्या तन्वीमध्ये शाळाकॉलेज संपून २५ वर्षे झालेल्या प्रत्येक तरूणाला त्याच्या मनातील पहिली क्रश दिसली.
शाळाकॉलेजमधल्या मित्रमैत्रीणींचे ग्रुप नव्याने बनवून गेटटुगेदर करण्याचा ट्रेंड आला असतानाच तेजश्रीच्या या सिनेमाने तो फ्लेवर आणला. असं सगळं छान सुरू असतानाच तिला अग्गंबाई सासूबाई या मालिकेची ऑफर आली आणि चार वर्षांनंतर तेजश्री एकदम फ्रेशलूकमध्ये चाहत्यांसमोर आली.
एकीकडे तेजश्रीचा अभिनयातील प्रवास छान गतीने सुरू असताना तिने आयुष्यात अनेक अनुभवही घेतले. त्यातूनच तिने नेत्रदानाचा संकल्प केला. तेजश्रीने नेत्रदानाचा ऑनलाइन फॉर्मही भरला आहे. सध्या तरी तेजश्री सक्षम या संस्थेसाठी नेत्रदान करण्याचा संदेश तिला फॉलो करणाऱ्या सर्वांना देतच आहे. पण तिनेही मी नेत्रदान करणार अशी गाठ बांधली आहे.
व्यक्तीगत आयुष्यातही तेजश्री खूप रोखठोक आहे. स्पष्टवक्ती आहे. जे वाटतं ते करायला तिला खूप आवडतं. अनेकदा लोक काय म्हणतील म्हणून अनेकजण त्यांच्या मनातील गोष्टी करण्यापासून पाऊल मागे घेतात, पण तेजश्री याला अपवाद आहे. ती पडद्यावर नेहमीच समजूतदार मुलीच्या भूमिका करताना दिसते आणि प्रत्यक्षातही ती कोणत्याही परिस्थितीत खंबीरपणे उभी राहणारी मुलगी आहे.
नेत्रदानाच्या संकल्पाबाबतही ती अशीच ठाम राहणार यात शंकाच नाही असं तिच्या चाहत्यांना वाटतय. तेजश्रीचे डोळे घेऊन जी व्यक्ती हे जग पाहील ती नक्कीच नशीबवान असेल अशा शब्दात तिच्या चाहत्यांनी तेजश्रीवर अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.