पुणे – पहिली पत्नी असताना सोशल मीडियावरून एका महिलेशी ओळख होऊन त्यांचे प्रेमात रुपांतर झाले. या महिलेशी असलेले वडिलांचे प्रेम संबंध मुलांना पटत नव्हते. त्यामुळे मुलांनी चित्रपटाप्रमाणे वडिलांचा खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावली. या प्रकरणी म्हाळुंगे पोलिसांनी दोन सख्ख्या भावाना अटक केली आहे. सुजित बनसोडे ( वय २१) , अभिजित बनसोडे( वय १८)अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून धनंजय बनसोडे असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. प्रेम संबंध असणारी महिला ही नागपूर येथील राहणारी आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, चाकण परिसरात बनसोडे कुटुंब राहते. धनंजय बनसोडे गायब झाल्याची तक्रार नोंदवण्यात आली. त्यानुसार पोलिसांनी तपास करण्यास सुरुवात केली. सोशल मिडीयाचा वापर करता करता धनजय बनसोडे यांचे सोशल मीडियावरून नागपूर येथील एका महिलेशी ओळख झाली. त्यांच्या ओळखीचे रुपांतर मैत्रीत होऊन प्रेमात झाले. याविषयी मुलांना कुणकुण लागली होती. त्यामुळे बायको आणि मुलांना हे प्रेमसंबंध मान्य नसल्याने त्यांचे नेहमी वाद होत असत. या संदर्भात धनंजय बनसोडे यांनी नागपूर येथील प्रियेसीला आपले संबंध माझ्या घराच्याना मान्य नाहीत. त्यातून मुले माझा घातपात करतील असे सांगितले होते.
पोलिसांनी तपास सुरू केला असताना त्यांना अनेक गोष्टी समोर आल्या. पोलिसांना हा घातपाताचा प्रकार वाटल्याने त्यांनी बनसोडे यांच्या दोन्ही मुलांना चौकशीसाठी ताब्यात घेतले, सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. मात्र पोलिसी खाक्या दाखवताच आपल्या गुन्ह्याची कबुली दिली. आम्हाला आमच्या वडिलांचे बाहेरचे प्रेमसंबंध मान्य नव्हते. त्यामुळे आमच्या घरात नेहमी वाद होत होते. या रागातूनच आम्ही वडिलांना संपवल्याची कबुली मुलांनी दिली आहे. याप्रकरणी पोलिसांनी मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे. एखाद्या चित्रपटात तील कथानकाला शोभेल असे हे प्रकरण पोलिसांनी उजेडात आणले आहे. अधिक तपास म्हाळुंगे पोलिस करत आहेत.