ठाणे – ठाण्याच्या पातलीपाडा येथे राहणाऱ्या चौथी तील विद्यार्थ्याचा संशयास्पद मृत्यू झाला होता. मात्र या प्रकरणी हा मृत्यू अकस्मात नसून घातपात असल्याचा आरोप मयत विद्यार्थी कुणाल चंदनशिव याच्या घरच्यांनी केला आहे. कुनालच्या या संशयास्पद मृत्यूची सखोल चौकशी करण्याच्या मागणी त्याच्या नातेवाईकांकडून करण्यात आलेली होती. यावर ठाणे महापालिका शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली आहे. दरम्यान प्रकरण संवेदनशील असून अफवा पसरवू नये असे आवाहन कापूरबावडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक उत्तम सोनावणे यांनी केले आहे.
ठाण्यातील महापालिका शाळेतील मुलाच्या अकस्मात मृत्यूचे प्रकरण चांगलेच तापले आहे. मुलाच्या नातेवाईकांनी संशयासपद मृत्यूच्या सखोल चौकशीची मागणी करीत शाळेत जाऊन आक्रमक भूमिका घेतली. या संपूर्ण प्रकरणाने शाळेत शिकणाऱ्या इतर मुलांच्या पालकांनीही झाल्या प्रकाराबाबत चिंता व्यक्त करीत शाळेत धाव घेतली. त्यामुळे गुरुवारी या शाळेत काहीकाळ तणाव निर्माण झाला होता. दरम्यान या प्रकरणी ठाणे महापालिका शिक्षण अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती गठीत करण्यात आली असून समितिने चौकशी करण्यास सुरुवात केलीय.
तर दुसरीकडे पोलिसांना शव विच्छेदन अहवाल अद्याप प्राप्त झाला नसून पोलीस शाळेतील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे व इतर तांत्रिक यंत्रणांच्या आधारे तपासला सुरुवात केली आहे. शवविच्छेदन अहवाल पोलिसांनी प्राप्त झाल्यानंतर त्या दिशेने तपासला सुरुवात करणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच हा अत्यंत संवेदनशील मुद्दा असल्याने कृपया कुठल्याही अफवा अथवा बातम्या पूर्ण निष्कर्ष आल्याशिवाय न पसरवण्याचे आवाहन पोलिसांनी केलं आहे..
मृतक चिमुरडा कुणाल चंदनशिव याचा बुधवारी दुपारी अचानक शाळेच्या मैदानावर मृत्यू झाल्याचे समोर आले. या घटनेने खळबळ उडाली असतानाच गुरुवारी पालकांनी ठाणे पालिकेच्या मानपाडा येथील शाळा क्र ६४ येथे धाव घेतली. यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण होते. मात्र मृत्यूच्या चौकशीसाठी समिती गठीत करीत तपास सुरु झाला.