जुन्नर( पुणे): जुन्नर तालुक्यातील ओतूर येथे असणाऱ्या एका खाजगी रुग्णालयात उपचार घेत असलेल्या रुग्णाचा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू झाल्याचा धककदायक प्रकार समोर आला आहे. यावेळी नातेवाइकांनी डॉक्टरांना मारहाण केल्याचा प्रकार देखील घडला आहे. जोपर्यंत डॉक्टरांना अटक होत नाही तोपर्यंत आम्ही मृतदेह नेणार नाही असा पवित्रा रुग्णाच्या नातेवाईकांनी घेतला आहे. ओतूर येथील श्री समर्थ हॉस्पीटलमध्ये हा सर्व प्रकार घडला आहे. यावेळी रुग्णालयाबाहेर मोठा जमाव जमला होता.
पोलीसांनी डॉक्टरांना चौकशीसाठी पोलीस ठाण्यात घेऊन गेल्यानंतर येथील जमाव पांगला. याप्रकरणी मृताच्या नातेवाइकांनी ओतूर पोलीस ठाण्यात तक्रार केली असल्याची माहिती ओतूर पोलिसांनी दिली. अरविंद उल्हास गाढवे (वय ३१ रा. ओतूर) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर मृत गाढवे यांचे काका सर्जेराव लिंबाजी गाढवे यांनी तक्रार दिली आहे. रात्री उशिरा नातेवाईकानी मृतदेह ताब्यात घेऊन अंत्यविधी केला.
याबाबत अधिक माहिती अशी की, अरविंद उल्हास गाढवे हा (दि.१० ) रोजी जानेवारीला घराच्या बाहेर बेशुध्द अवस्थेत पडला होता. त्यामुळे कुटुंबीयांनी त्याला तात्काळ ओतूर (ता.जुन्नर) येथील श्री समर्थ हॉस्पिटल या डॉ. समीर कुटे यांच्या दवाखान्यात उपचार करिता दाखल केले होते. मात्र डॉ. कुटे यांनी रुग्णाच्या नातेवाइकांना अरविंद यांनी विषारी औषध प्राशन केले असल्याची शक्यता वर्तवली. त्यामुळे त्याची वैद्यकीय चाचण्या करून त्याच्यावर प्राथमिक उपचार करण्यास सुरूवात केली होती. दरम्यान, बुधवारी (दि. ११) रात्री १०. ३० वाजता फोन आला की रुग्ण अरविंद यांचे हृदय बंद झाले असून त्यांना इलेक्ट्रीक शॉक देऊन ते पुन्हा सुरू करून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आलेल्या सांगितले. मात्र दुसऱ्या दिवशी म्हनजे गुरूवारी (दि.१२) सकाळी सात वाजता डॉ. समीर कुटे यांनी नातेवाइकांना पेशंटचे हृदय बंद पडत असल्याचे सांगितले. तसेच व्हेंटिलेटर असलेली रूग्णवाहिका बोलवून त्यामध्ये आपण त्याला दुसरे दवाखान्यात पाठवू असे डॉ. कुटे यांनी नातेवाइकांकडे धरला. त्यावर नातेवाईकांनी आम्ही दुसरीकडे का नेऊ असे विचारले असता डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे सांगितले.
त्यामुळे आमच्या रुग्णाचा मृत्यू डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे झाला असल्याचे नातेवाइकांकडून सांगण्यात आले. डॉक्टरने आमची दिशाभूल करत आम्हाला रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात हलविण्यास सांगितले. त्यामुळे डॉक्टरांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, असे तक्रारीत म्हटले आहे. पुढील तपास ओतूर पोलीस करीत आहेत. मात्र याबाबत समर्थ रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून उपचारादरम्यान पेशंटचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेमुळे एकच तणाव निर्माण झाला होता.