मनोरंजन

ठरलं तर… बिग बॉसचं चौथं पर्व येणार जुलैमध्ये

वेगवेगळया स्वभावाचे, निरनिराळ्या क्षेत्रात काम करणारे, कुणी रागीट तर कुणी शांत, कुणी भांडकुदळ तर कुणी मनमिळावू अशा अवलियांना शंभर दिवस एकत्र ठेवायचे आणि त्यातून कोण बाजी मारेल त्याला विजेता करायचे.

सुरूवातीला ऐकायला छान वाटतं पण मोबाइल फोन, टीव्हीसारख्या मनोरंजनापासून लांब राहून शंभर दिवस काढायचे आणि तेही मनाचा तोल ढळू न देता ही सोप्पी गोष्ट नाही.

बिग बॉस या शोमध्ये खिळवून ठेवणारी हीच तर गोष्ट आहे. बिग बॉसच्या पहिल्यी तीन पर्वांना प्रतिसाद दिलेल्या चाहत्यांची उत्सुकता संपवत आता लवकरच बिग बॉसचे चौथे पर्व दाखल होणार आहे.

बिग बॉसच्या तिसऱ्या पर्वाची सांगता होत असतानाच या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी चौथ्या पर्वाची हिंट दिली होती. पण नेमका बिग बॉसचा चौथा सीझन कधी येणार याकडे या शोचे चाहते लक्ष लावून होते.

नुकतीच कलर्स मराठीच्या अधिकृत पेजवर या शोच्या चौथ्या पर्वाची घोषणा झाल्याने चाहते खूश आहेत. हिंदीमध्ये आजपर्यंत बिग बॉस शोचे १५ सीझन झाले.

१५ सीझनच्या विजेतेपदावर तेजस्वी प्रकाश हिने नाव कोरले. हिंदीतील बिग बॉसची लोकप्रियता पाहूनच मराठीमध्येही हा लाँच करण्यात आला.

आपला मराठी बिग बॉस अशी कॅचलाइन घेऊन आलेल्या या शोमध्ये आजपर्यंत अनेक वादग्रस्त व्यक्ती स्पर्धकसदस्य बनून बिग बॉसच्या घरात आल्या.

बिग बॉसच्या घरातील १०० दिवसांच्या वास्तव्यात अनेक जोड्यांची रिलेशनशीप जमली. पुढे ब्रेकअप झाल्यानेही या जोड्या गाजल्या. मतभेदांमुळे भांडणं झाली.

तर प्रत्येक सदस्यांची संघर्षमय वाटचाल पाहून बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताना मैत्रीचे बंधही जुळले.

 बिग बॉसच्या पहिल्या पर्वाची विजेती ठरली होती अभिनेत्री मेघा घाडगे. संपूर्ण शोमध्ये मेघा आणि सई लोकूर यांच्यातील भांडण खूप गाजलं. मेघाने विजेती बनून बक्षीसावर नाव कोरलं.

तर दुसऱ्या पर्वात अभिनेता कोरिओग्राफर शिव ठाकरे विजयी झाला. सर्वसामान्य घरातून आलेल्या शिव ठाकरे आणि सदस्यस्पर्धक वीणा जगताप यांची रिलेशनशीप चर्चेचा विषय बनली होती.

चार महिन्यांपूर्वी झालेल्या तिसऱ्या पर्वाचा विजेता ठरला  अभिनेता विशाल निकम. विशाल आणि स्पर्धकसदस्य विकास पाटील, सोनाली पाटील यांची मैत्री या पर्वाचे वैशिष्ट ठरले होते.

या सगळ्या रंजक गोष्टींनंतर आता बिग बॉसचे चौथे पर्व १० जुलैपासून सुरू होणार आहे. या शोची जितकी चर्चा असते तितकीच चर्चा या शोमध्ये कोणत्या सेलिब्रिटींची निवड होणार याचीही चर्चा असते.

जूनपासून या शोची तयारी केली जाणार आहे. आजपर्यतच्या तीनही पर्वांचे नेतृत्व महेश मांजरेकर यांनी केले. आता चौथ्या पर्वाचा लगाम महेश मांजरेकर यांच्याच हातात असेल की त्यांच्याजागी दुसरा चेहरा असेल हे अजून गुलदस्त्यातच आहे. 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment