विवेक ताम्हणकर, कोंकण
संगमेश्वर तालुक्यातील पांगरी गावपऱ्या येथे बेवारस सापडलेल्या बालक प्रकरणाचा छडा लागला असून दोन आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती देवरूख पोलीस ठाण्यातून देण्यात आली आहे. दोन संशयित आरोपींना देवरुख न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी १ फेब्रुवारी पर्यंत पोलिस कस्टडी सुनावली आहे.
पांगरी येथील गावपऱ्याचे जंगलमय खोलगट भागात २५ जानेवारी रोजी सकाळी १०.१५ वाजण्याच्या सुमारास एक स्त्री जातीचे बालक वय सुमारे एक ते दीड वर्षे हे बेवारस टाकलेल्या स्थितीत मिळून आले होते. त्यावरून देवरूख पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम ३१७ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनास्थळी मिळून आलेल्या एक अनोळखी स्त्री जातीचे बालकाच्या नावा गावाचा व त्याच्या वारसांचा तपास होण्याकरता प्रसिद्धी पत्रक तयार करून त्याची, सोशल मीडिया तसेच वर्तमानपत्रातून प्रसिद्धी करून गोपनीय बातमीदारा कडून माहिती घेण्यात येत होती. गुन्ह्याचे तपासा दरम्यान गुन्ह्यातील अनोळखी स्त्री जातीचे बालक यास तिची आई सांची स्वरूप कांबळे (पूर्वाश्रमीची शितल श्रीपत माईंगडे वय २६, सध्या राहणार कुवारबाव, बाजारपेठ ता. जि रत्नागिरी) व मिथिल उर्फ मिथिलेश मदन डांगे (वय २३, रा. हातखंबा,डांगेवाडी ता. जि. रत्नागिरी) यांनी बेवारस स्थितीत टाकल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती देवरुख पोलीस ठाण्यातून मिळाली आहे. सांची कांबळे व मिथिलेश डांगे आरोपी यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
तपासाअंती कुमारी अनुश्री स्वरूप कांबळे या बाळास २४ जानेवारी रोजी ११.३० वाजण्याच्या दरम्याने पांगरी गाव पऱ्यामधे टाकल्याचे आरोपींनी कबूल केलेले आहे. सांची कांबळे व मिथिलेश डांगे यांना देवरुख न्यायालयात शनिवारी हजर करण्यात आले असता न्यायाधीशांनी १ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कस्टडी सुनावल्याची माहिती देवरुख पोलीसानी दिली आहे.
गुन्ह्याचा तपास रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक मोहित कुमार गर्ग, जयश्री देसाई अप्पर पोलीस अधीक्षक, निवास साळोखे उपविभागीय पोलिस अधिकारी, लांजा, पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव व पोलिस निरीक्षक उदय झावरे यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस उपनिरीक्षक विद्या पाटील, व्ही. डी. मावळंकर, सचिन भुजबळराव, संतोष सडकर, जावेद तडवी,किशोर जोयशी, एस. डी. जाधव, आर. आर. कांबळे, डी. एम. मांढरे या पथकाने आरोपी यांचा शोध घेऊन चांगली कामगिरी पार पाडली आहे