कोंकण

अखेर आशाचा मर्डर करणारा खुनी सापडला

अखेर आशाचा मर्डर करणारा खुनी सापडला, खालापूर पोलिसांच्या जाळ्यात तो अलगद अडकला

विवेक ताम्हणकर, कोंकण


खालापूर तालुक्यातील रानसई च्या बोरीची मळशी या जंगल भागात कुजलेल्या अवस्थेत एक महिलेचा मृतदेह सापडला होता.मृतदेह छिन्नविच्छिन्न व कुजलेल्या अवस्थेत असल्याने खालापूर पोलीसांसमोर मोठे आव्हान होते तरीही बहाद्दर खालापूर पोलिसांनी अवघ्या २४ तासात मृतदेहाची ओळख पटवून त्या महिलेचा खून झाल्याचे निष्पन्न होताच वेळ न दडवता तिला ठार मारणाऱ्या आरोपीला अहमद नगर जिल्ह्यातून जेरबंद केले.


या घटनेबाबत खालापूर पोलिसांकडून मिळालेल्या माहिती नुसार ६ जून म्हणजे शिवराज्याभिषेक दिनी खालापूर तालुक्यातील रानसई गावाच्या बोरीची मळशी या जंगलात एक महिलेचे प्रेत सापडल्याची खबर खालापूर पोलिसांना मिळाली.

शिवराज्याभिषेक असल्यामुळे पोलीस निरीक्षक अनिल विभूते व त्यांची एक टीम रायगड किल्ल्यावर बंदोबस्तासाठी गेली होती, अपुरे मनुष्यबळ असताना सहा.पोलीस निरीक्षक गणेश कराड,सहा.फौजदार विनोद सुर्वे,पोलीस हवालदार नितीन शेडगे,निलेश सोनावणे व हेमंत कोकाटे यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पाहणी केली.

त्याठिकाणी एका महिलेचे छिन्नविच्छिन्न व कुजलेल्या अवस्थेत प्रेत पडले होते. प्रथमदर्शनी ते प्रेत पंधरा ते वीस दिवसांचे असावे असा अंदाज बांधण्यात आला कारण त्या महिलेच्या अंगावर साडी नव्हती व तिची कवटी धडापासून वेगळी झाली होती आणि त्या प्रेताचे मास काही ठिकाणी हिंस्र प्राण्यांनी खाल्लेले दिसत होते.प्रेताच्या पायात पैंजण डाव्या हाताच्या बोटात आंगठी व हातापायाच्या बोटाना नेलपेंट लावलेली होती.

चेहरा दिसत नव्हता प्रेत कुजलेले होते अश्यात या महिलेची ओळख पटवणे पोलिसांसमोर आव्हान होते.
त्या प्रेताची ओळख पटवण्यासाठी पोलिसांनी तात्काळ हालचाली सुरू केल्या. त्या प्रेताचे फोटो आजूबाजूच्या गावात व आदिवासी वाड्यांमध्ये दाखवण्यात आले पण कोणताही सुगावा अथवा धागेदोरे हाती लागत नव्हते. पोलीस उपविभागीय अधिकारी संजय शुक्ला यांनी ही घटनास्थळी भेट देऊन पुढील तपासाच्या सूचना देत मार्गदर्शन केले.

शेवटी खालापूर पोलीस ठाण्यात या घटनेची अकस्मात मृत्यू ची नोंद करण्यात आली. व त्या महिलेच्या प्रेताचे पी एम मुंबईच्या जे. जे. रुग्णालयात करण्यात आले.

वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सदर महिलेचा मृत्यू डोक्याला दुखापत झाल्यांमुळे झाला असल्याचा अभिप्राय दिला तेव्हा त्या महिलेचा कोणी तरी घातपात केला असावा असा ठाम विश्वास पोलिसांना आल्यावर त्या बाजूने तापास सुरु करण्याचे ठरवले पण ती महिला कोठे राहाते, तिचा खून कोणी केला याचा तपास काही केल्या लागत नव्हता.


पोलीस निरीक्षक अनिल विभूते रायगड वरील बंदोबस्त आटोपून खालापूर ला आले तेव्हा त्यांनी या घटनेचा पूर्ण आढावा घेतला व लागलीच पोलीस अधीक्षक अशोक दुधे, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांच्या बरोबर या घटनेबाबत चर्चा केली व त्यांच्या मार्गदर्शना नुसार पथके तयार केली आणि शोध सुरू केला.


हा शोध सर्वत्र सुरू असताना खालापूर तालुक्यातील उंबरे येथे राहणारे काळूराम मारुती वाघमारे आपल्या दोन मुलींसह खालापूर पोलिसाठण्यात आले व त्याची पत्नी आशा वाघमारे ही १५ ते २० दिवसांपूर्वी कोळशाच्या भट्टीवर काम करणारे मजूर शोधण्यासाठी कर्नाटक येथील राठोड मुकादम यांच्या सोबत खालापुरातील वावोशी व रानसई या ठिकाणी अली होती पण तेव्हापासून ती बेपत्ता असल्याचे त्याने पोलिसांना सांगितलं तेव्हा पोलिसांनी त्यास त्या मयत महिलेच्या मृतदेहाचे फोटो व अंगावरील दागिने वैगेरे दाखवले असता काळूराम ने ती मयत महिला त्याची पत्नी आशा असल्याचे सांगितले.

आणि खालापूर पोलीस ऍक्शन मोड मध्ये आले व तपासाची चक्रे जोरात फिरली आणि आशाचा खून का? कोणी? व कशासाठी झाला होता याचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले.


तपासात मिळालेल्या माहिती नुसार आशा वाघमारे ही मयत महिला त्यावेळी हिरामण जाधव यांच्या घरी आली होती.ती सुनिल पवार व कुमार वाघे यांना कोळशाच्या भट्टीवर कामाला नेणार होती व त्यासाठी तिने या दोघांना पैसे ही दिले होते.

आणि लगेच कामावर चला असा तीने तगादा लावला होता.पण सुनील पवार ची बायको लगेच कामावर जाण्यास तयार नव्हती त्यामुळे त्या रात्री त्या दोघांचे कडाक्याचे भांडण झाले. त्यावेळी रागाच्या भरात सुनिल ने रात्री ९:३० च्या दरम्यान आशा वाघमारे ला बोरीची मळशी या जंगलाकडे घेऊन गेला व तिचा तेथे खून करून तिचा मृतदेह झाडी झुडपात फेकून तो दोन तासांनी घरी आला आणि अंघोळ करून परत कुठे तरी निघून गेला व पहाटे पुन्हा घरी येऊन त्याने पत्नी व मुलांना घेऊन तो तेथून निसटला.


पोलिसांनी त्याच्या मोबाईलच्या लोकेशन द्वारे तो अहमदनगर जिल्ह्यात असल्याचे शोधून काढले व एक पथक त्याच्या शोधात नगर ला पोहचले शेवटी माहितीच्या आधारे अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील हरडगाव या ठिकाणी आरोपी सुनील च्या मुसक्या आवळल्या.

अवघ्या २४ तासात हे कठीण ऑपरेशन खालापूर पोलिसांनी यशस्वी केले.त्यासाठी पोलीस निरीक्षक अनिल विभूते व त्यांच्या टीम चे खालापुरात कौतुक होत आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment