कोंकण

भिवंडी गोळीबाराचे नवे सत्य आले समोर

ठाणे – काल भिवंडीतील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कशेळी पुलाजवळ गोळीबार करून हत्या केल्याची घटना घडली होती. या गोळीबारात गणेश कोकाटे हा माथाडी ठेकेदार गंभीर जखमी झाला होता. त्याला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान गणेश कोकाटे याचा मृत्यू झाला. विशेष म्हणजे गणेश कोकाटे याच्यासोबत घडलेली हि गोळीबाराची दुसरी घटना आहे. या आधी देखील ठाण्यातील चितळसर मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश कोकाटे याच्यावर गोळीबार झाला होता. त्यामध्ये कोकाटे बचावला होता.

एकीकडे ठाण्याचा विकास झपाट्याने होत आहे पण त्याच बरोबरीने ठाण्यात गुन्हेगारी आणि गोळीबार सारख्या घटना देखील वाढत चालल्या आहेत. ठाण्यात झपाट्याने होत असलेल्या विकासामुळे माथाडीच्या संघटनांमध्ये देखील वाढ होऊ लागली आहे. इमारतींच्या कामाचा ठेका घेण्यासाठी वाढत्या माथाडीच्या संख्येने ही स्पर्धा जीवघेणी ठरू लागल्याची चित्र सध्या ठाण्यात पाहायला मिळत आहे. काल बुधवारी ७ डिसेंबर रोजी भिवंडी येथील नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कशेळी पुलाजवळ गोळीबार करत माथाडी संघटनेच्या ठेकेदाराची हत्या केल्याची घटना घडली होती. या गोळीबाराच्या घटनेत गणेश कोकाटे हा गंभीर जखमी झाला होता. गोळीबार होऊन जखमी झाल्यानंतर गणेश कोकाटे याला ठाण्यातील ज्युपिटर रुग्णालयात उपचारासाठी भरती करण्यात आले होते. मात्र गणेश कोकाटे यांच्यावर झालेल्या गोळीबारात त्यांच्या मानेला गोळी लागली आणि रक्तस्त्राव झाल्याने त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी भिवंडी मधील नारपोली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास नारपोली पोलीस करत आहेत.

काय घडला नेमका प्रकार..

बुधवारी ७ डिसेंबर रोजी गणेश कोकाटे हा ठाण्याहून भिवंडीच्या दिशेने आपल्या कशेळीतील पवनपुत्र सोसायटीच्या राहत्या घरी चारचाकी मधून जात होता. मात्र त्याचवेळी नारपोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कशेळी पुलाजवळ म्हणजेच टोळ नाक्याच्या अलीकडे काही अज्ञात इसम गणेश कोकाटे याच्या येण्याची वाट बघत डबा धरून बसले होते. गणेश कोकाटे हा नजदिक येताच या अज्ञात गुंडांनी त्याच्या गाडीचा दुचाकी वरून पाठलाग करत निशाणा साधला. आणि त्याच्यावर अंधाधुंद गोळीबार केला. या गोळीबारात गणेश कोकाटे याच्या मानेला गंभीर दुखापत झाली. गणेश कोकाटे याच्या मानेत गोळी लागल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊ लागला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या गणेश कोकाटे याला रुग्णालयात उपचारासाठी भरती केले असता त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

गणेश कोकाटे याच्यावर याआधी देखील झाला होता गोळीबार

१७ सप्टेंबर रोजी पहाटे गणेश कोकाटे हा आपल्या कारमधून ठाण्याहून भिवंडीच्या दिशेने घरी निघाला होता. त्याचवेळी पाच जणांनी चितळसर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोल्डन डाईज नाक्यावर दुचाकी ने पाठलाग करून त्याच्यावर एक राउंड गोळीबार केला होता. त्यावेळी देखील आरोपींनी गणेश कोकाटे याच्यावर गोळीबार करून पोबारा केला होता. या प्रकरणी गणेश कोकाटे याने ठाण्यातील चितळसर पोलीस ठाण्यात पाच अज्ञात जणांच्या विरोधात गोळीबार केल्याचा गुन्हा नोंदवला होता. सदर प्रकरणी चितळसर मानपाडा पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध घेत होते. मात्र त्यानंतर बुधवारी ७ डिसेंबर रोजी रात्री गुन्हेगारांनी अचूक वेध घेत निशाणा साधला आणि कोकाटेचा शेवट केला.

या हत्येमुळे आता पुन्हा एकदा जीवघेणी स्पर्धा सुरु झाल्याची चर्चा सुरु झाली आहे. तर दोन महिन्यात तब्बल गोळीबाराच्या चार घटना घडल्या आहेत. यापूर्वी गणेश जाधव उर्फ काळ्या गण्या आणि आता गणेश कोकाटे यांची हत्या झाली आहे. ठाण्यात सुरु असलेल्या या गोळीबाराच्या घटना आणि वाढती गुन्हेगारी यावर ठाणे पोलीस अंकुश लावतील का? असा प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे. तसेच या जीवघेणी स्पर्धा आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचा शिरकावामुळे ठाणे मात्र अस्वस्थ झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे..

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment