पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान सीमेवर निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर पुढील घडामोडींचं पक्षपाती ‘चित्रण’ छापील व इलेक्ट्रॉनिक माध्यमांनी केलं, परिणामी आपण वृत्तवाहिन्या पाहणंच बंद केल्याचं काही लोकांनी सांगितलं. या घडामोडींसंबंधी काहीएक चिंतन करू पाहणाऱ्या लोकांच्या मनात वृत्तवाहिन्यांनी किती भय निर्माण केलं, याचा दाखला म्हणून प्रेक्षकांच्या या अभिव्यक्तीकडे पाहता येईल. लोकांची मुस्कटदाबी होईल इतक्या प्रमाणात वातावरण तापवण्यासाठी या वृत्तवाहिन्यांनी विशिष्ट हॅशटॅग वापरले, हे आणखीच चिंताजनक आहे. दूरचित्रवाणीवरील वृत्तवाहिन्यांनी हॅशटॅग वापरण्यासंदर्भात संपादकीय नैतिकतेचा प्रश्न आपल्याला कसा मांडता येईल? हॅशटॅगमुळे प्रेक्षकांना एखाद्या घटनेबद्दल किंवा एखाद्या वृत्तवाहिनीच्या इंटरनेटवरील उपस्थितीबद्दल माहिती मिळते, असा युक्तिवाद केला जाऊ शकतो. परंतु, हॅशटॅगमुळे अशा प्रकारचं विभागणीचं कार्य पार पाडलं जात असेल तरच हा युक्तिवाद समर्थनीय ठरेल. पण या वृत्तवाहिन्यांकडून हॅशटॅगद्वारे तिहेरी स्वरूपाचा प्रोपगॅन्डा घडवला जातो: हॅशटॅगमध्ये राजकीय अर्थ पेरला जातो, आधीच धृवीकरण झालेल्या कथनाकडे प्रेक्षकांना रेटलं जातं, आणि विखारी संभाषितामध्ये सक्रिय सहभाग घेण्यासाठी त्यांना प्रोत्साहन दिलं जातं.
विद्यमान सरकारने वृत्तवाहिन्यांमधील निवेदकांच्या घशाखाली उतरवलेल्या राष्ट्रवादापेक्षा मुळातील राष्ट्रवादाची संकल्पना व्यापक आहे, असं मत मांडणाऱ्या उदारमतवाद्यांचा ही निवेदक मंडळी सातत्याने धिक्कार करत असतात. दोन देशांमधील संघर्षाचं दृश्यात्मक सादरीकरण या वृत्तवाहिन्या करतात, त्यामुळे इतर समस्यांकडून लक्ष केवळ एका प्रश्नावर केंद्रित केलं जातं आणि सीमेवरील संघर्षाव्यतिरिक्त इतर कोणताही मुद्दा लक्ष देण्याजोगा नाही, असं वातावरण निर्माण केलं जातं. राष्ट्राची आणि राष्ट्रातील प्रत्येकाची सुरक्षा राखायची असेल तर मुख्यत्वे दहशतवादाविरोधात युद्ध सुरू करणं हा एकमेव मार्ग आहे, असं हे निवेदक सुचवत असतात. त्यामुळे, बाह्य शत्रूपासून सुरक्षा हे प्राथमिक सामाजिक हित असल्यासारखी मांडणी केली जाते. अशा वृत्तीचा गरिबांवर, बेरोजगारावंर, वंचितांवर आणि तणावग्रस्त शेतकऱ्यांवर प्रचंड नैतिक दबाव येतो. राष्ट्रीय सुरक्षा हा आपल्या प्राथमिक चिंतेचा मुद्दा बनवण्याचा दबाव त्यांना सहन करावा लागतो, याउलट श्रीमंतांना मात्र असा कोणताही दबाव येतनाही, ते आपल्या सुरक्षित व समाधानी संपन्नतेत आणि विशेषाधिकारामध्ये जगत राहातात.
सर्वसामान्य लोकांमध्ये अपेक्षा व उत्तेजना वाढवण्यासाठी हे वृत्तवाहिन्यांवरील निवेदक कारणीभूत ठरतात. भारतीय सैन्याने शत्रूचं अधिक नुकसान करायला हवं होतं, अशी लोकांची अपेक्षा होती. भारतीय हवाई दलाच्या बॉम्बफेकीमध्ये दहशतवादी मरण पावल्याचा दावा झाल्यानंतर या मृत दहशतवाद्यांची संख्या किती आहे, अशांसारख्या गोष्टी जाणून घेण्यातही लोकांनी रस दाखवला. तर, केवळ बाह्य आक्रमणाच्या संदर्भात निष्ठा जोखण्याच्या सरकारी रचनेला धरून वृत्तवाहिन्यांवर चर्चा झडल्या, आणि देशांतर्गत वैध चिकित्साही दडपण्यात आली.
सर्वसामान्य लोकांच्या सूडकेंद्री व आक्रमक प्रवृत्तीला धरून आक्रमकतेची कथानकं पुढे जात राहातात आणि गरिबांनाही या प्रवृत्तीलाच जीवनात मध्यवर्ती स्थान द्यावं लागतं. या सर्व घटकांसाठी आणि वृत्तवाहिन्यांसाठी सरकारचं आक्रमकतेद्वारे सूड घेण्याचं धोरण राष्ट्रवादाच्या निकषावर आत्यंतिक समाधानदायक व उचित ठरतं.
खरं म्हणजे अशा वृत्तवाहिन्या देशाच्या अंतर्गत सामाजिक जीवनामध्ये एक मोठी दरी पाडत असतात. कारण, ‘शांतते’च्या काळातही नागरिकांना आपली आक्रमकता बाहेर काढण्यासाठी एखादं अंतर्गत लक्ष्य हवं असतं. सीमेवर किंवा शेजारी शत्रू असणं, ही एक सततची नैसर्गिक गरज बनते. वृत्तवाहिन्यांवरून युद्धखोरीचं सादरीकरण होत असताना, या वाहिन्या स्वतःचं आकलन कसं करून घेतात, हा प्रश्न उपस्थित होतो. आपण कोणत्याही विकृतीकरणाशिवाय बातम्या देतो आणि केवळ न्यूजरूममध्ये बातम्यांचं उत्पादन करत नाही, अशी सर्वच वाहिन्यांची स्वतःबद्दलची समजूत असावी.
पण, काही वृतवाहिन्यांनी ‘अधिकृत’ सादरीकरण केल्यामुळे त्यांच्या स्व-आकलनामध्ये व स्व-अभिव्यक्तीमध्ये नैतिक विसंगती निर्माण झाली आहे. आपल्या अभिव्यक्तीमध्ये शांतता व सौहार्द यांना प्रोत्साहन देणं, हं वृत्तवाहिन्यांचं स्व-आकलन असेल, तर चिंताकुल आवाजांचा त्यांनी हिंसकरित्या धिक्कार करणं योग्य नाही आणि त्यांनी हिंसा व तिरस्कार यांचा प्रचार करायला नको. या वाहिन्यांचे निवेदक संबंधित चिंताकुल आवाजांचा थेट धिक्कार करत राहिले, तरीही वाहिन्यांनी यासंबंधी त्यांच्या निवेदकांशी संवाद साधण्याची गरज आहे, कारण वाहिन्यांची सार्वजनिक प्रतिमा जोखताना स्व-आकलन व स्व-अभिव्यक्ती यांच्यातील संगतीचा विचार केला जाणार आहे. राष्ट्रवादाचा आदर्शलक्ष्यी आशय वृद्धिंगत करताना जबाबदारीची जाणीव या वाहिन्यांनी ठेवायला हवी. द्वेष व सामाजिक असुरक्षिततेपासून स्वातंत्र्य, नागरी सौहार्दाला प्रोत्साहन, आणि अर्थातच राष्ट्रीय सार्वभौमत्व, हा राष्ट्रवादाचा आदर्शलक्ष्यी आशय आहे. मानवी मूल्यांना धोका निर्माण करणाऱ्या विपरित घटकांविषयी लोकांना सामाजिकदृष्ट्या जागरूक करण्याचं काम दूरचित्रवाणी वाहिन्यांनी करणं अपेक्षित आहे.
परंतु, या वृत्तवाहिन्यांच्या संदर्भात स्व-आकलन व स्व-अभिव्यक्ती यांच्यातील विसंगती लख्खपणे दिसते. ही विसंगती दोन गोष्टींमुळे येते. एक, टीआरपी (टार्गेट रेटिंग पॉइन्ट) व जाहिराती यांच्या दबावाखाली या वाहिन्या कार्यरत आहेत. दोन, काही निवेदकांना अहंकार नसला तरी त्यांचा अवाजवी आत्मविश्वास स्वतःला प्रश्नांकित करण्याची नैतिक क्षमता त्यांच्यापासून हिरावून घेतो. आपण काय करत आहोत, याविषयी ते स्वतःला प्रश्नच विचारू शकत नाहीत. स्वतःलाही प्रश्न विचारायचे असतील तर सरकारपासून आपण वेगळे आहोत व स्वतंत्र आहोत, हे त्यांना समजून घ्यावं लागेल. उलट, काही वृत्तवाहिन्या व सरकार यांच्यातील संबंध परस्परांना लाभांचं आदानप्रदान करण्यावर अवलंबून असल्याचं दिसतं.