विवेक ताम्हणकर, कोंकण
पावसाळा सुरू होताच आणि एरव्ही समुद्रावर आपला हक्क गाजवणा-या बोटींनी माडाच्या झावळांपासून बनवलेल्या छपरांखाली शांत विसावा घेतला आहे. इथल्या समुद्रकिनारी भागातले हे चित्र लक्ष वेधून घेणारे आहे. डौलात मिरवणारी डोलकाठीही आता उतरविण्यात आली आहे.
बंदरात तरंगणारी लहान-मोठी हजारो घरे आता समुद्राबाहेर विसावली आहेत.कोकणच्या किनारपट्टीवर हजारो नौका विसावल्या आहेत. यात काही फायबर बोटी आहेत. तर काही पारंपरिक बोटींची अजस्त्र धूड आहेत.
बोटी विसावल्या असल्या तरी सागरपुत्र मात्र आपल्या कामात व्यस्त आहे. एरव्ही मासेमारीसाठी सागराच्या लाटांचा वेध घेणारा मच्छीमार बांधव आता आपल्या बोटीच्या देखभाल-दुरुस्तीच्या कामात गुंतला आहे. तर काही ठिकाणी बोटी नव्याने बांधण्याचे आणि डागडुजी करण्याचे कामही जोरात सुरू झाले आहे.
किनारपट्टीवर सध्या या कामांसाठी कारवार येथील आणि स्थानिक मिळून १ हजार ५०० हूनही अधिक कामगार जोडले गेले आहेत. एकंदरीत बोटींच्या पावसाळी कामाला जोरदार सुरुवात झाली आहे.

कोकणची समुद्र किनारपट्टी प्रामुख्याने मासेमारी व्यवसायातच गुंतलेली आहे. कितीही मत्स दुष्काळ असला तरी मत्स्यव्यवसाय हा इथल्या अर्थव्यवस्थेचा प्रमुख भाग आहे.
मुलखातल्या माणसाला आठवडयात जर थाळीत मासेच आले नाहीत तर कासावीस होतो. (अपवाद असतील काही मंडळी, पण हे खरे आहे.)
पावसाळी हंगामात हा व्यवसाय बंद असला तरी खवय्यांच्या थाळीतील मासा कमी झालेला नसतो. भले प्रकार बदलतो. एखाद्या वेळी ओला मासा मिळालाच नाही तर तो खारवलेला सुका मासा असाच आगीत भाजून तरी खाईल नाहीतर सुक्या माशाचे कालवण तरी असेलच ..असो!
नौका किना-यावर लावण्यापासून पुन्हा बाहेर काढण्यापर्यंत सोपस्कार मोठे असतात. अलीकडे यांत्रिक युगात कामे बदलली आहेत हे मात्र निश्चित.
दर्यावरचा माणूस शांत कसा बसेल? एक ट्रॉलर किना-यावर काढायला साधारणत: १२ हजार रुपये मजुरी घेतली जाते. तर ती व्यवस्थितपणे किनारी लावल्यानंतर तिच्यावर माडाच्या झावळांपासून बनवलेल्या कडणाचे व कागदाचे छप्पर घालण्यासाठी १० हजार रुपये खर्च येतो.
एका बोटीचे छप्पर शाकारण्यासाठी साधारणत: ३०० नग कडणं लागतात. म्हणजे बोट किनारी काढून ती व्यवस्थितपणे ठेवायला २० ते २२ हजार रुपये खर्च येतो.
बोटीला फायबर कोटिंगही करण्याची कामे सध्या जोरदार सुरू आहेत. सध्या या कामासाठी कारवारहून २०० लोक सिंधुदुर्गात आल्याचे समजते. एका बोटीला बाहेरून पूर्णपणे फायबर कोटिंग करून देण्यासाठी मजुरी व सामानासहित १ लाख रुपये घेतले जातात.
बोटीची फळी खराब होऊ नये म्हणून आतल्या बाजूने तेल मारले जाते. या तेलात चंद्रुस मिक्स केला जातो. एका बोटीला साधारणत: ८ डबे तेल आणि २४ किलो चंद्रुस लागतो. आ
ठ डबे तेलाची किंमत सुमारे ७ हजार २०० रुपये आहे. तर २४ किलो चंद्रुसची किंमत १ हजार २०० रुपये आहे, असा ८ हजार ४०० रुपये खर्च या कामासाठी येतो.
बोटीच्या इंजिनाला ग्रीसिंग व ऑईलिंग करण्यासाठी ६ ते ७ हजार रुपये घेतले जातात. सध्या वेंगुर्ले-मालवण, रत्नागिरीतील अनेक हर्णे समुद्रकिनारी बोटींना फायबर कोटिंग करण्याचे काम मोठया प्रमाणावर सुरू आहे. फायबर कोटिंगमुळे बोटीत पाणी येत नाही, तर तिची आयुष्यमर्यादाही वाढते.
नव्याने बोट बांधायची असेल तर सध्याच्या बाजारभावानुसार सर्वाचे बजेट २५ लाखांपर्यंत जाते. एनसीडीसीकडूनच एवढी रक्कम मच्छीमारांच्या ग्रुपला मंजूर करण्यात येते.
शासनाच्या या योजनेबाबतीत मालवण दांडी येथील मत्स्य सोसायटीचे सेक्रेटरी धुरी यांनी सविस्तर माहिती दिली. या बोटीसाठी प्रस्ताव करणा-या ग्रुपमधील एक तरुण प्रशिक्षित असावा.
एका ग्रुपमध्ये सात जण असतात. प्रशिक्षित तरुण हा मच्छीमार संस्थेचा सदस्य असावा. त्याला समुद्रातील किमान ज्ञान असावे. तसेच त्याने मत्स्यव्यवसाय खात्यामार्फत सुरू केलेल्या प्रशिक्षण केंद्राचा सहा महिन्यांचा कोर्स पूर्ण केलेला असावा.
देवगड, मालवण, वेंगुर्लेसाठी हा कोर्स सध्या मालवण दांडी येथे सुरू करण्यात आला आहे. येथे ४२ तरुणांना एकावेळी प्रवेश दिला जातो. या कोर्ससाठी प्रवेश घेताना मच्छीमार संस्थेची शिफारस लागते.
हा कोर्स पूर्ण झाल्यानंतर हा प्रशिक्षित तरुण आणि इतर सहा जण यांच्या ग्रुपला एनसीडीसी २५ लाख रुपये अनुदान मंजूर करते. सध्या मालवणमध्ये भद्रकाली मच्छीमार सोसायटी यांचे ६ प्रस्ताव आणि राजकोट मच्छीमार सोसायटीचे ३ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत.
संस्थेमार्फत बोटींसाठी केले गेलेले प्रस्ताव मंजूर होण्याकरिता त्या संस्थेची वसुली ७५ टक्के असावी लागते.
या २५ लाखांत संपूर्ण बोट बांधून होते. सहा सिलिंडर, लेलँड कंपनीचे इंजिन, वायरलेस, जीपीएस, फोश पायंडर, विंच आदी बाबींचा यात समावेश असतो. सध्या बाजारात इंजिनची किंमत ६ लाखांपर्यंत आहे. बोट बांधण्याचे काम प्रामुख्याने कारवारचे लोक करतात.
त्यांना सर्व सामान उपलब्ध करून दिले तर ते एक बोट आठ महिन्यांत बांधून पूर्ण करतात. तर स्थानिक कामगार दीड र्वष काम करतात. यात ख-या अर्थाने स्थानिकांचे काम दर्जेदार असते, असा अनुभव इथल्या मच्छीमारांचा आहे.
गेली ५० ते ५५ र्वष आपल्या वडिलोपार्जित मत्स्यव्यवसायातून रोजगार मिळविणारे आणि सुमारे १० वर्षापूर्वी स्वत:ची बोट बांधणारे मालवण मेढा येथील विनायक कांदळगावकर यांची भेट घेतली.
त्यांनीही एनसीडीसीकडून अनुदान घेऊन आपली बोट बांधली. ते म्हणतात, तेव्हा मला ११ लाख रुपये मिळाले. त्यावेळी इंजिनची किंमत १ लाख ८० हजापर्यंत होती. आता या बोटीची किंमत अडीच पटीने वाढली आहे.
बोटीच्या इतर पार्टची किंमत खूप वाढली आहे. तेव्हा बोटी कमी होत्या. त्यामुळे मासळी मोठया प्रमाणावर सापडत असे. आता बोटी वाढल्या आणि मत्स्यउत्पादनावर याचा परिणाम झाला आहे.
सध्या बोटींचे वाढते प्रमाण रोखले पाहिजे. नाही तर समुद्रातील मासळी कुणाच्याच वाटयाला येणार नाही, असे मतही विनायक कांदळगावकर यांनी व्यक्त केले. मालवणमध्ये आता तब्बल ३५०हून अधिक सहा सिलिंडरच्या बोटी आहेत.
यामुळे स्पर्धा वाढली आहे. इतर छोटया छोटया बोटी आहेतच. बोटबांधणी, फायबर कोटिंग, फायबरच्या बोटी बनविणे, देखभाल-दुरुस्ती करणे या कामांबरोबरच सिंधुदुर्गच्या किना-यावर मासळीच्या जाळयाची दुरुस्ती करण्यातही बरेच लोक गुंतले आहेत.
तुटलेली जाळी पुन्हा दुरुस्त करून ती वापरण्यायोग्य करणे. याचबरोबर नव्याने जाळी विणण्याचे कामही घराघरात सुरू झाले आहे. या कामात महिला वर्ग गुंतलेला असतो. यामुळे मत्स्यव्यवसायातून सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवर सर्वानाच रोजगार मिळत असतो.
पावसाळा सुरू झाला आणि बोटी किना-यावर लागल्या. बोटींची इवलीशी घरे लक्ष वेधून घेतात. दूरवरून तेव्हा या घरांच्या छपराखाली किती हात विविध प्रकारची कामे करत असतात. ही छपरे न्याहाळताच या बोटींपर्यंत पोहोचलो आणि हे वेगळेच चित्र अनुभवता आले.
एकंदरीत समुद्रावर राज करणारा मच्छीमार राजा सध्या पावसाळी सुट्टीवर असताना पावसाळा संपताच त्याच ताकदीने पुन्हा समुद्रात जाता यावे, मत्स्यधन लुटता यावे, म्हणून आतापासूनच तयारीला लागला आहे.
समिंदराच्या राजाचे उत्सव याच दिवसात रंगतात. भजनात आणि हरिनाम सप्ताहात तो तल्लीन होतो. नारळी पौर्णिमेपर्यंत त्याची ही वार्षिके सुरू असतात.
थोडीशी उसंत मिळाल्याने दोनाचे चार हात करण्याची त्याची लगबग याच दिवसात सुरू असते. आषाढी एकादशीला विठ्ठलाच्या गजरात तो अखंड बुडून जातो.
पावसाळी हंगामात बंदी कालावधीबरोबरच समुद्र खवळलेला असल्याने खोल समुद्रातील मासेमारी पूर्णत: बंद असली तरी परिस्थितीत उदरनिर्वाहासाठी पारंपरिक मच्छीमारांकडून नदी आणि खाडीपात्रातील मासेमारीवर जोर दिला जातो. यामध्ये प्रामुख्याने पाग, तियानी या पद्धतीच्या मासेमारीचा समावेश होतो.
त्याचप्रमाणे खाडीपात्रातील कालवं काढणे, खेकडे, घुले, भांडोळी अशा प्रकारची मासेमारी केली जाते.
मात्र या मासेमारीवर कुटुंबाचा उदरनिर्वाह अशक्य असतो. पण आहे त्या परिस्थितीत एकरूप होऊन काम करण्यात तो धन्यता मानतो. कारण महिन्याभराने समुद्रात त्याला जायचेच असते. पण अलीकडे बंदीच्या कालावधीतही यांत्रिक नौका समुद्रात घरघरू लागतात. मग त्याचा जीव वरखाली होतो.