पश्चिम महाराष्ट्र

बारामतीच्या वैभवात मानाचा तुरा….

बारामती – बारामती ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टने गेल्या पाच दशकात शेती आणि शेतकरी विकासात दिलेले योगदान आणि काळानुरूप त्यात बदल करीत शेती व शेतकरी विकासाला अधुनिकतेच्या मार्गाने नेण्यासाठी संशोधन, विस्तार व शेतकऱ्याला उद्योजक बनवण्याचा प्रयत्न केला आहे, त्याचे दृश्य परिणाम आता मोठ्या प्रमाणावर दिसू लागले आहेत.

देशातील कृषी क्षेत्रातील उद्योजकांसाठी महत्वाची मानली जाणाऱ्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ॲग्रीकल्चरल एक्स्टेंशन मॅनेजमेंट अर्थात मॅनेज ही हैदराबादची सरकारी संस्था राष्ट्रीय स्तरावरील युवा कृषी उद्योजक जाहीर करते. त्यासाठी ही संस्था देशभऱात त्यांनी जे उद्योजक घडवण्यासाठी सेंटर मंजूर केलेले आहेत, त्यामधील प्रशिक्षणाचा दर्जा व त्यानुसार घडलेले उद्योजक यांचे मुल्यांकन करते. बारामतीचे कृषी विज्ञान केंद्र हे त्यापैकी एक महत्वाचे नोडल सेंटर आहे.

सन २०१८ ते २०२२ या दरम्यान ॲग्री-क्लिनिक्स आणि ॲग्री-बिझनेस सेंटर म्हणून ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट, बारामतीच्या कृषी विज्ञान केंद्रातून यशस्वीरित्या प्रशिक्षण घेतलेल्या मनिषा संजय खामकर यांना महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट कृषी उद्योजक म्हणून पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार मिळालेल्या त्या एकमेव आहेत. त्या श्रीगोंदा तालुक्यातील घारगाव येथील आहेत.

सन २०१९ चा हा पुरस्कार असून या पुरस्काराचे वितरण १२ जानेवारी २०२३ रोजी राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून होणार आहे. दिल्लीतील आयसीएआर च्या कृषि विज्ञान भवनमध्ये (नॅशनल ॲग्रीकल्चरल सायन्स कॉम्प्लेक्स इंदरपुरी) हा कार्यक्रम होणार आहे. या पुरस्काराचे वितरण मा. केंद्रीय कृषीमंत्र्यांच्या हस्ते होणार आहे.

ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रात सन २००६ पासून शेतकऱ्यांना उद्योजक घडविण्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. आजवर अशा ४० बॅचेस झाल्या. त्यामधून आजपर्यंत १२९६ प्रशिक्षणार्थी शेतकऱ्यांना उद्योजकतेचे प्रशिक्षण देण्यात आले. आजमितीस त्यापैकी ६०० हून अधिक उत्तम व यशस्वी व्यावसायिक, उद्योजक बनले आहेत. यामध्येच सन २०१९ मध्ये प्रशिक्षण घेतलेल्या खामकर यांना हा राष्ट्रीय युवा उद्योजक पुरस्कार जाहीर झालेला आहे. त्यांना बारामतीत उद्योजकता विकास, व्यक्तिमत्व विकास, उद्योगासाठी शासकीय योजना, यशस्वी उद्योजकांच्या उद्योगांना भेटी, त्यांचे मार्गदर्शन व संवादकौशल्य अशा प्रकारचे प्रशिक्षण येथे मिळाले होते.

त्या श्रीगोंदा तालुक्यातील घारगावच्या रहिवासी असून त्या स्वतः शेतीपूरक औषधांचे व बी-बियाण्यांचे दुकान चालवतात. त्यांची वार्षिक उलाढाल एक कोटींहून अधिक आहे. महिलेने स्वबळावर चालवलेले व ते यशस्वी केलेले हे एक केंद्र आहे, त्या फक्त बियाण्यांची, खतांची विक्री करीत नाहीत, तर शेतकऱ्यांना सल्लाही देतात.

शेतकऱ्यांनी आधुनिक काळाबरोबर चालायला हवे, हाच उद्देश घेऊन संस्थेने सातत्याने नवनवीन प्रयोगांचा, नवनवीन निर्णयांचा स्विकार केला व अधुनिक मंत्र शेतकऱ्यांना देऊन त्यांनी एकमेकांना प्रशिक्षित करावे हा उद्देश ठेवला. शेतकऱ्यांनी हातात हात घेऊन शेती व शेतकऱ्यांचा विकास साधावा हा ठेवलेला उद्देश आता साध्य होताना दिसू लागला आहे. याचे समाधान असल्याचे ॲग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टचे चेअरमन राजेंद्र पवार यांनी सांगितले..

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment