साहित्य

हे तिसरी नापास पण पद्मश्री, पाच विद्यापिठीय़ प्रबंधाचे (पीएचडी) मानकरी

By संदीप पाटील, दुधगाव,

जन्माला आलेला प्रत्येक व्यक्ती प्रतिभासंपन्न असतो. पण त्या प्रतिभेचा, आपल्यातल्या बेस्टचा जोपर्यंत त्याला शोध लागत नाही. तोपर्यंत तो यशवंत होत नाही. आजच्या भागात अशाच एका व्यक्तीचा जीवन प्रवास आपणासमोर मांडणार आहे की, ज्याला आपल्या प्रतिभेचा शोध वयाच्या ४०व्या वर्षी लागला आणि तो अल्पावधीतच यशाच्या अत्युच्च शिखरावर पोहोचला.

या संघर्षाचे नाव आहे हलधर नाग.

३१ मार्च १९५० रोजी ओरिसातील बारगढ येथे, एका गरीब कुटुंबात त्यांचा जन्म झाला. तो दहा वर्षाचा असतानाच त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला. त्यावेळी तो तिसऱ्या इयत्तेत शिकत होता. इतर भावंडांची लग्न झालेली होती. ती आपल्या संसारात मग्न होती. त्यामुळे त्याचा सांभाळ करायला कोणीही पुढाकार घेतला नाही. त्यामुळेच स्वतःला जगवण्यासाठी, संघर्ष करण्याशिवाय त्याच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता.

आपल्या उपजीविकेचेसाठी तिसरीतूनच शाळा सोडली. गावातील एका मिठाईच्या दुकानात भांडी घासण्याचे काम सुरू केले. तब्बल दोन वर्ष त्याने मिठाईच्या दुकानात काम केले. त्याच्या संघर्षाकडे बघूनच, गावच्या सरपंचांनी त्याला हायस्कूलच्या हॉस्टेलमध्ये नेले.

शिकण्यासाठी नव्हे, तर विद्यार्थ्यांसाठी जेवण बनवणाऱ्या आचाऱ्याचे काम करण्यासाठी. तब्बल सोळा वर्ष आचाऱ्याचे काम केल्यानंतर, स्वतःचे स्टेशनरी दुकान सुरू करण्याचा त्याने निर्णय घेतला. एका शाळेसमोर त्याने स्टेशनरीचे दुकान सुरू केले.

(फोटो गुगल वरुन साभार)

लहानपणापासून तो देशी लोकगीतं खूप आवडीने ऐकायचा. लोकगीतांचे शब्द त्याच्या मनावर परिणाम करायचे. तो विचारी झाला. वयाच्या ४० व्या वर्षी त्याच्या मनातील वेगवेगळे विचार कागदावर उतरू लागले. कागदावरील विचारांनी रूप घेतले कवितांचे, कवितांनी काव्यसंग्रहाचे आणि काव्यसंग्रहांनी महाकाव्यांचे. १९९७ साली त्याला लोककवीरत्न म्हणून सन्मानित केले गेले. आणि २०१६ साली भारत सरकारने पद्मश्री पुरस्कार देऊन गौरविले. हा कौशली भाषेचे संवर्धन करून काव्यरचना करणारा कवी म्हणजेच हलधर नाग होय.

केवळ तिसरी शिकलेल्या नाग यांनी शंभरावर काव्यसंग्रह आणि २० महाकाव्ये त्यांनी लिहिली आहेत. संबलपुरी-कोशली भाषेला नवसंजीवनी देणाऱ्या नाग यांचे लिखाण ग्रामीण जीवनाचा अस्सल बाज आहे. त्यांच्या साहित्याचा समावेश संबलपूर विद्यापीठात केला जाणार आहे. तिसरीतून शाळा सोडावी लागलेल्या हलधर यांच्या साहित्यावर आत्तापर्यंत पाच जणांनी पीएचडी प्रबंध सादर केले आहेत. ते आजही धोतरी आणि बंडीशिवाय दुसरा कोणताही पोशाख घालत नाहीत. इतकंच काय ते कधीही चपला घालत नाहीत.

‘प्रत्येकजण कवी असतो, मात्र थोड्याच लोकांमध्ये त्या कवितेला आकार देण्याची कला असते’ असं हलधर यांचं म्हणणं आहे. आपल्या प्रत्येकामध्ये काहीनाकाही बेस्ट असतेच, त्याचा शोध आपण घेतला पाहिजे. तो जितका लवकर लागेल, तितक्या लवकर आपल्याला यशाचा मार्ग सापडतो. वयाच्या ४० व्या वर्षी हलधर यांना आपल्यातील प्रतिभेचा शोध लागला.

त्यांनी पहिली कविता स्थानिक वर्तमानपत्रात प्रसिद्धीस दिली. त्यावेळी त्यांच्यावर टीका झाली. हे आपले काम नाही. म्हणून मागे खेचण्याचे अनेक प्रयत्न झाले. त्यांचा आत्मविश्वास, मनोधैर्य डळमळीत करण्याचे, प्रयत्न केले गेले. आपल्या बाबतीत बऱ्याचदा असेच घडते. आपण लक्ष देतो. परंतु या सर्वांकडे हलधर यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळेच एका कवितेपासून सुरू झालेला प्रवास १०० काव्यसंग्रह आणि २० महाकाव्यांपर्यंत आलेला आहे. म्हणूनच ते एक यशवंत आहेत.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment