मनोरंजन

मराठमोळ्या लावणीचा आवाज हरपला

आई मला नेसव शालू नवा, खेळताना रंग बाई होळीचा, कळीदार कपुरी पान, फड सांभाळ तुऱ्याला गं आला, पाडाला पिकलाय आंबा अशा अनेक लावण्यांनी रसिक मनावर आजही भुरळ पाडलेल्या लावणीसम्राज्ञी यांनी लहानपणी अभिनय क्षेत्रापासून आपल्या कारकीर्दीला प्रारंभ केला. त्यांचा जन्म गिरगावातील. सुलोचना कदम असे त्यांचे माहेरचे नाव. त्यांचे शालेय शिक्षण चौथीपर्यंत झाले. त्यांनी लहानपणी मेळ्यांपासून श्रीकृष्णाची भूमिका करायला सुरुवात केली. त्यानंतर त्या उर्दू नाटकांमध्ये मजनूचीही भूमिका करायच्या. वयाच्या दहाव्या वर्षापासून त्यांनी गायला सुरुवात केली. लग्नाआधी त्यांनी सुमारे ७० चित्रपटांमध्ये पार्श्वगायन केले होते. त्यावेळी के. सुलोचना म्हणूनही त्या पार्श्वगायन क्षेत्रात होत्या. त्यांनी आचार्य अत्रे यांच्या हीच माझी लक्ष्मी या चित्रपटासाठी पार्श्वगायन केले. हा मराठीतील त्यांचा पहिला चित्रपट. त्यानंतर सन १९५२ मध्ये त्यांनी शाम चव्हाण यांच्या कलगीतुरा या चित्रपटासाठी लावणी गायन केले. चव्हाण यांनीच सुलोचना कदम यांना लावणी गायन शिकवले. शब्दफेक, स्वरातील चढ उतार याची त्यांना जाणीव करून दिली. त्यानंतर सन १९५३ मध्ये सुलोचना कदम यांचा शाम चव्हाण यांच्याशी विवाह झाला आणि त्या सुलोचना चव्हाण झाल्या.

गीतकार जगदीश खेबुडकर यांची पहिली लावणी मला हो म्हणतात लवंगी मिरची होती. ती संगीतकार वसंत पवार यांनी स्वरबद्ध केली होती. या लावणीपासून सुलोचना चव्हाण यांचा यशस्वी प्रवास सुरू झाला. या प्रवासामध्ये सन १९६५ मध्ये त्यांना लावणीसम्राज्ञी पुरस्कार मिळाला. सुलोचना चव्हाण यांनी ६० वर्षे विदर्भ, खानदेश, मराठवाडा येथे शाळा, महाविद्यालय, देऊळ, अनाथाश्रम, यांच्या मदतीसाठी कार्यक्रम केले. त्या स्वतःच्या लहान मुलांना इतर कुणाकडे ठेवूनही दहा-दहा दिवस इतरांना मदत मिळावी म्हणून दौऱ्यावर जायच्या. त्यावेळी त्यांनी स्वतःच्या आजारपणाचीही पर्वा केली नव्हती. लावणीसम्राज्ञीच्या प्रवासाला लाभलेला हा आणखी एक वेगळा पैलू होता. त्यांनी नांदेड येथे डॉ. भुसारी यांच्या कुष्ठधाम रुग्णायलासाठी लागणाऱ्या प्लास्टिक सर्जरीच्या यंत्रणेसाठी दहा कार्यक्रम करून नऊ लाख रुपये मिळवून दिले. त्यांच्या आईचे सन १९६० मध्ये निधन झाले. मात्र तरीही दिलेला शब्द पाळून त्यांनी लगेच दुसऱ्या दिवसापासून शाळेसाठी मदतीचे कार्यक्रम हाती घेतले. पुण्याच्या पानशेत धरणफुटीच्या वेळीही त्यांनी कार्यक्रम केले. नियोजित रक्कम पूर्ण करण्यासाठी त्यांनी रस्त्यावर उभे राहून मदत मागितली आणि हे कमी म्हणून स्वतःचे दागिनेही विकून त्यांनी ही रक्कम पूर्ण केली. नागालँड येथे झालेल्या अंतर्गत युद्धाच्या वेळीही त्यांनी भारतीय लष्कराच्या मदतीसाठी त्यांनी कार्यक्रम केले. या सगळ्या प्रवासात त्यांना त्यांच्या पतीची खंबीर साथ होती.

सिलोन रेडिओवर सुलोचना चव्हाण यांची गाणी लावून १३ मार्च रोजी त्यांचा वाढदिवस साजरा व्हायचा. आजही भारतातीलच नाही तर त्यांचे जगभरात आणि अगदी पाकिस्तानातील चाहतेही त्यांच्याशी संपर्क साधतात, असे त्यांचे कुटुंबीय सांगतात. सुलोचना चव्हाण यांना गंगा-जमना पुरस्कार, महाराष्ट्र सरकारचे दोन जीवनगौरव पुरस्कार, पुणे महापालिकेतर्फे सन २००९ चा राम कदम पुरस्कार, सन २०११ चा महाराष्ट्र सरकारचा लता मंगेशकर पुरस्कार अशा पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment