दमयंती पाटील, पुणे.
संगीत आणि अभिनय हाच ज्यांचा श्वास होता आणि रंगभूमीची सेवा हेच ज्यांचे जीवनध्येय होते अशा जेष्ठ शास्त्रीय संगीत गायिका, अभिनेत्री कीर्ती शिलेदार यांचा जीवनप्रवास आज थांबला. कलेचा शास्त्र शुध्द अभ्यास, निर्मळ स्वर, मनाचा ठाव घेणारा अभिनय, अखंड परिश्रम याच्या सहाय्याने गेली सहा दशके त्यांनी मराठी रसिकांच्या मनावर गारूड केले होते. त्यांच्या निधनाने मराठी संगीत रंगभूमीवरील एक दीपस्तंभ विझला आहे.
जन्म व बालपण
कीर्ती जयराम शिलेदार यांचा जन्म १६ ऑगस्ट १९५२ ला पुणे येथे जयराम शिलेदार आणि जयमाला शिलेदार यांच्या पोटी झाला. आई वडील दोघेही रंगभूमीवरील प्रथितयश गायक व अभिनेते असल्यामुळे संगीत व अभिनय वारसा यांना घरातूनच मिळाला होता.
संगीत आणि अभिनय साधना
विद्याधर गोखलेंच्या ‘स्वरसम्राज्ञी’ या नाटकाच्या दरम्यान कीर्ती यांना नीळकंठबुवा अभ्यंकर गुरू म्हणून लाभले. अभ्यंकर बुवांच्या तालमीत वाढलेल्या कीर्ती शिलेदार शास्त्रीय संगीताबरोबरच नाट्यसंगीत, ठुमरी अशा विविध संगीत प्रकारांत तयार झाल्या. आकाशवाणीच्या राष्ट्रीय संगीत सभेतूनच दोनदा त्यांचे गायन प्रसारित झाले. देश विदेशात 1900 वर संगीत मैफली रंगवल्या. अनेक जुन्या संगीत नाटकांतून त्यांनी भूमिका केल्या. रुक्मिणी, सुभद्रा, मंथरा, द्रौपदी, वसंतसेना, रेवती अशा अनेक भूमिकांमधून त्यांनी संगीत रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. रंगतदार, ढंगदार गायकीबरोबरच त्यांचे लयीवरील प्रभुत्व रसिकांवर छाप पाडत असे. तबला व पखवाज वाजवण्यातही त्या निपुण होत्या.
कीर्ती शिलेदारांनी २७ नाटकांतून ३४ भूमिका केल्या असून साडेचार हजारांवर संगीत नाटकांचे प्रयोग केले आहेत. दीप्ती भोगले (लता शिलेदार) या त्यांच्या ज्येष्ठ भगिनींच्या ‘संगीत नादलुब्ध मी’ आणि ‘संगीत चंद्रमाधवी’ या दोन्ही नाटकांचे संगीत दिग्दर्शनही कीर्तीताईंनी केले होते. पारंपरिक संगीत नाटकांचा विचार आणि बदलत्या काळानुसार नाविन्याचा अंतर्भाव त्यांच्या संगीत नाटकात त्यांनी मोठ्या खुबीने केला होता. ‘चंद्रमाधवी’ या नाटकाच्या संगीतासाठी त्यांना ‘झी’चा ‘सर्वोत्कृष्ट संगीत’ पुरस्कार मिळाला. विद्याधर गोखल्यांचे ‘स्वरसम्राज्ञी’ हे खास शिलेदारांसाठीचे नाटक होय. यातील तमाशातील मैनेची भूमिका अत्यंत गाजली. तमाशातल्या मैनेपासून शास्त्रीय संगीत गाणाऱ्या घरंदाज गायिकेपर्यंतच्या अनेक छटा दाखविण्यासाठी कीर्ती शिलेदारांनी प्रचंड मेहनत घेतली होती.
संगीतातील योगदान
कीर्ती शिलेदारांनी ‘स्वर-ताल-शब्दसंगती’ हा संगीतातील शब्दार्थाचे आणि काव्यार्थाचे महत्त्व सांगणारा शोधनिबंध लिहिला. ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’तर्फे विविध भाषक विद्यार्थ्यांकडून त्यांनी हिंदी भाषेतून नाट्यगीते गाऊन घेतली. एन.एस.डी.तर्फे झालेल्या ‘एकच प्याला’च्या प्रकल्पामध्येही त्यांचा सहभाग होता. तसेच, ‘संगीत शारदा’ या नाटकाचा हिंदी नाट्यांशही त्यांनी सादर केला. संगीत नाटक अकादमीच्या समितीवरही त्या पाच वर्षे होत्या. केवळ संगीत नाटकच नव्हे तर संपूर्ण रंगभूमी हेच माझे जीवनध्येय आहे असे त्या नेहमी म्हणत.
मानसन्मान
कीर्ती ताई महाराष्ट्र शासन पुरस्कृत ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००९), नाट्यदर्पण रजनीचा ‘नाट्यव्रती’ सन्मान (१९९९), पुणे महापालिकेचा ‘बालगंधर्व’ पुरस्कार (२००६) अशा अनेक पुरस्कारांनी सन्मानित झाल्या होत्या. संगीत रंगभूमीचा अण्णासाहेब किर्लोस्कर जीवन गौरव पुरस्कार (२०१४) ही त्यांना देण्यात आला होता.