पश्चिम महाराष्ट्र

यावर्षीचा पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार शांतीब्रम्ह मारुती बाबा कुऱ्हेकर यांना जाहीर

पद्मभूषण डॉ .बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार यापूर्वी निष्काम कर्मयोगी हभप पंढरीनाथ महाराज तावरे ( जालना),हभप बाळकृष्ण महाराज भोंदे (अहमदनगर), हभप नामदेव महाराज शामगावकर (सातारा), स्वामी सागरानंदजी सरस्वती ( नाशिक ) यांना देण्यात आलेला आहे. गेल्यावर्षी करोना महामारीमुळे पुरस्कार जाहीर करण्यात आला नव्हता.

२१ मार्च रोजी लोणीत होणार प्रदान

लोणी दि.२४ प्रतिनिधी

वारकरी संप्रदाय आणि संत सेवेतील अतुलनीय योगदानाबद्दल दिला जाणारा राज्यस्तरीय ‘ पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार २०२२’ आळंदी जि. पुणे येथील शांतीब्रम्ह हभप मारुती बाबा कुऱ्हेकर यांना जाहीर झाला आहे.

    अहमदनगर जिल्ह्यातील जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थ लोणी बुद्रुक यांच्या वतीने संत तुकाराम बिजोत्सव सोहळ्यात सन २०१७ पासून हा पुरस्कार दिला जातो. पुरस्कार निवड समितीचे महंत उद्धव महाराज मंडलिक,नेवासेकर अध्यक्ष असून भाषा प्रभू ह.भ.प जगन्नाथ महाराज पाटील (ठाणे), संत साहित्याचे गाढे अभ्यासक प्राचार्य डॉ.गोरक्षनाथ कल्हापुरे, नेवासा हे सदस्य आहेत.

या त्रिसदस्यीय समितीने ही निवड केली आहे. पुरस्काराची घोषणा करताना महंत उद्धव महाराज म्हणाले की, वारकरी संप्रदायात निस्वार्थ सेवेद्वारे भरीव योगदान देणारे अनेक आहेत.निवड समितीने सर्वांच्या नावाचा विचार केला.आगामी काळात त्यांनाही सन्मान होईल.

यावर्षी मात्र गुरुवर्य शांतीब्रम्ह हभप मारुती बाबा कुऱ्हेकर यांचे नाव निश्चित केले असून त्यांना यावर्षीचा पद्मभूषण डॉ.बाळासाहेब विखे पाटील स्मृती संत सेवा पुरस्कार जाहीर करीत आहोत. मानपत्र,सन्मान चिन्ह व २५ हजार रुपये असे पुरस्काराचे स्वरूप असून येत्या २१ मार्च २०२२ रोजी सकाळी ११ वाजता लोणी बुद्रुक येथील संत तुकाराम महाराज मंदिर प्रांगणात भव्य समारंभात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.

या समारंभाला माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील,खा.डॉ.सुजय विखे पाटील, कुलपती डॉ.राजेंद्र विखे पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, भागवताचार्या रुक्मिनिताई हावरे,हभप भारत महाराज धावणे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

  डॉ.बाळासाहेब विखे पाटील यांनी केंद्रात अर्थमंत्री असताना संत तुकाराम महाराज यांची मुद्रा असलेली नाणी व टपाल तिकीट प्रकाशित केले. देहू,आळंदी,पंढरपूर आदी तीर्थक्षेत्रांच्या विकासासाठी योगदान दिले. संत तुकाराम महाराज जन्म चतु:शताब्दी समितीचे अध्यक्ष म्हणून काम पाहिले.

लोणी या त्यांच्या गावी त्यांनी संत तुकाराम महाराजांचे मंदिर उभे केले.त्यांच्या या अध्यात्मिक कार्याची दखल घेऊन संत तुकाराम महाराज सेवा ट्रस्ट व ग्रामस्थांनी त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ संत सेवा पुरस्कार देण्याचा निर्णय घेतला.

  शांतीब्रम्ह मारुती बाबा कुऱ्हेकर यांचे वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्मातील कार्य आणि सेवा अतुलनीय आहे. वयाच्या १५ व्या वर्षी ते नागपूरहून आळंदी येथे आले. त्यांचे वडील कीर्तनकार होते व घराण्यात विठ्ठल भक्तीची परंपरा होती.

आळंदीत गुरुवर्य मामासाहेब दांडेकर व इतर अध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली त्यांची अध्यात्मिक जडणघडण झाली.कीर्तन,प्रवचन आणि जोग महाराज संस्थेच्या कामात ते एकरूप होऊन गेले.

शांत आणि प्रेमळ स्वभावामुळे त्यांचे अध्यापन अधिक प्रभावी झाले. जसजसा काळ लोटत गेला तसतसे त्यांच्या ज्ञान प्राप्त करून विद्यार्थी घडत गेले. त्यांचे हजारो  विद्यार्थी आज देशाच्या अनेक राज्यात प्रबोधन,व्यसनमुक्ती आणि संत सेवेचे कार्य करीत आहेत.

गेल्या अनेक वर्षांपासून बाबा जोग महाराज वारकरी शिक्षण संस्थेचे मुख्य अध्यापक म्हणून संस्थेची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळत आहेत.

ज्ञान,वैराग्य,भक्ती असा त्रिवेणी संगम असलेले या व्यक्तित्वचा महाराष्ट्र शासनाने ‘ज्ञानोबा-तुकोबा’ पुरस्काराने सन्मान केलेला आहे. वयाची ९० वर्षे पार करूनही त्यांच्यातील उत्साह कमी झालेला नाही.

वारकरी संप्रदाय आणि भागवत धर्मातील त्यांचे योगदान मांडण्यास शब्द अपुरे आहेत. त्यांना हा पुरस्कार जाहीर करताना आम्हाला मनस्वी समाधान वाटत आहे असे उद्धव महाराज शेवटी म्हणाले. यावेळी लोणीच्या सरपंच कल्पनाताई मैड,उपसरपंच गणेश विखे, ट्रस्टचे अध्यक्ष देविदास म्हस्के व ग्रामस्थ उपस्थित होते.

प्रशांत कांबळे–

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment