पश्चिम महाराष्ट्र

आजही उद्धव ठाकरेंच्या मागे प्रचंड मोठा जनाधार, राष्ट्रवादीच्या नेत्याने उधळली स्तुतीसुमने

पुणे – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत उभी फूट पडली आहे. आमदार खासदार यांच्यानंतर राज्यभरातील कार्यकर्ते उद्धव ठाकरे यांची साथ सोडताना दिसत आहेत. मात्र अशात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि खासदार सुनील तटकरे उद्धव ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने उधळली आहेत. पुण्यातील खडकवासला विधानसभा मतदार संघात एकदिवसीय ‘वेध भविष्याचा, विचार राष्ट्रवादीचा’ या शिबिरात सुनील तटकरे आले असता उद्धव ठाकरे यांना मानणारा जनाधार राज्यामध्ये प्रचंड मोठा असल्याचं म्हंटल आहे.

शिवसेनेमध्ये होत असलेल्या फेरबदलाबद्दल मी काही जास्त भाष्य करू इच्छित नाही. कारण मी एका राजकीय पक्षाचा प्रमुख कार्यकर्ता आहे. पण राज्यामध्ये महाविकास आघाडीला खूप मोठा जनाधार आहे, हे निर्विवादपणे पाहायला मिळत आहे. काही कार्यकर्ते, काही नेते इकडे-तिकडे जातात पण जनता कुठेही जात नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे यांना मानणारा जनाधार राज्यामध्ये प्रचंड मोठा आहे. असं तटकरे म्हणाले आहेत.

दुसरीकडे नारायण राणे आणि संजय राऊत यांच्यात सुरु असलेल्या शाब्दिक युद्धावर देखील सुनील तटकरे यांनी भाष्य केलं आहे. राज्यामध्ये सत्तांतर झाल्यानंतर महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणापासून महाराष्ट्र दूर जातोय की काय अशी भीती वाटायला लागली आहे. संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल करत असलेले वक्तव्य, महात्मा ज्योतिबा फुले क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बद्दल केलेली वक्तव्य, सुप्रिया सुळे आणि इतर राजकीय महिलांबद्दल मंत्रिपदाची शपथ घेतलेल्या व्यक्तींनी केलेली वक्तव्य. ही अत्यंत निंदनीय असून महाराष्ट्राच्या सुसंस्कृत राजकारणाला छेद देणारी आहेत. त्यामुळे आजची टीकाटिप्पणी पाहता यापूर्वी असं कधीही पाहायला मिळालं नव्हतं. नारायण राणे एकेकाळी शिवसेनेमध्ये होते आज संजय राऊत शिवसेनेचे प्रमुख नेते आहेत. नारायण राणे यांचं हे वक्तव्य अत्यंत चूक आहे की राष्ट्रवादी काँग्रेसची सुपारी घेऊन संजय राऊत वक्तव्य करत आहेत. परस्परांबद्दल तुम्हाला जे बोलायचं असेल ते जरूर बोला पण राष्ट्रवादी काँग्रेसला त्यामध्ये आणण्याचं कारण नाही. असं तटकरे म्हणाले आहेत.

अजित पवार हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेले नेते
काल पुण्यातील एका कार्यक्रमात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याकडून सावित्रीबाई फुले यांचा उल्लेख सावित्रीबाई होळकर असा झाला आहे. यावरून आता भाजपने अजित पवार यांच्याविरोधात आक्रमक होत अजित पवारांना मग्रूर नेता असं म्हंटल आहे. यावर देखील तटकरे यांनी प्रतिक्रिया देत भाजपला फैलावर घेतलं आहे. ‘अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री असताना केलेला काम आणि आता विरोधी पक्षनेते असताना केलेले काम याची भीती भाजपच्या मनात आहे. भाजपला सर्वाधिक धाक किंवा भीती जर कोणाची वाटत असेल तर ती अजित पवार यांची वाटत आहे. म्हणून अजित पवार यांना लक्ष करणे हा एकमेव अजेंडा भाजपचा दिसत आहे. पण अजित पवारांना लक्ष करण्याचा काही फायदा होणार नाही अजित पवार हे महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये खोलवर रुजलेले नेते आहेत.’ असं सुनील तटकरे म्हणाले आहेत.

‘राज्यात निवडणूका होऊद्या मग कळेल कोणाची ताकद किती’
राज्यात स्थनिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूका होत नसल्याने सुनील तटकरे यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘हे सरकार निवडणुकांपासून का दूर जातंय हे कळत नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक ही पाच वर्षात झाली पाहिजे अपवादात्मक परिस्थितीमध्ये त्याला सहा महिनेच मुदतवाढ देता येते. आज अनेक महापालिकांमध्ये दोन ते अडीच वर्ष प्रशासक नेमलेला आहे. राज्यात प्रशासकांच्या मार्फत हे सरकार काम करण्याचा प्रयत्न करत आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानापासून पळ काढत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका पासून दूर जाणाऱ्या सरकारने तातडीने स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्याव्यात. म्हणजे राज्यात कोणाची राजकीय ताकद आहे हे सिद्ध होईल.’ असे थेट आव्हानच तटकरे यांनी दिले आहे.

‘आम्ही रोज जनतेचे दर्शन घेत आहोत’
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आपल्या आमदार खासदारांना घेऊन अयोध्या दौरा करणार असल्याचे सांगितलं नंतर ‘त्यांना सगळीकडचं दर्शन घेऊ द्या. आम्ही मात्र जनतेचे रोज दर्शन घेत आहोत. त्यामुळे जनतेच्या दर्शनातून मिळणारा लोकशाहीचा पाठिंबा हा सर्वात महत्त्वाचा असतो.’ अशी खोचक टीका सुनील तटकरे यांनी केली आहे.

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र वेब डेस्क महाराष्ट्र

Leave a Reply

Leave a Comment