क्रीडा

Tokyo Paralympics : पॅरालिम्पिक समारोह सोहळ्यात भारतीय ध्वजवाहकाचा मान ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखराकडे

टोकियो :  टोकियो येथे सुरु असलेल्या पॅरालिम्पिक स्पर्धेचा समारोह सोहळा आज आयोजित करण्यात आला आहे. या समारोह सोहळ्यात भारतीय ध्वजवाहकाचा मान ‘गोल्डन गर्ल’ अवनी लेखरा हिला (Avani Lekhra) मिळाला आहे. 19 वर्षीय पॅरालिम्पिक शूटर अवनी लेखराने टोकियो  पॅरालिम्पिकमध्ये 10 मीटर एयर रायफल एसएच 1 या स्पर्धेत भारतासाठी पहिलं सुवर्ण पदक जिंकलं होतं. तसेच नंतर एका कास्य पदकावरही नाव कोरलं होतं. एकाच   पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकांची कमाई करणारी अवनी लेखरा ही पहिलीच खेळाडू आहे. 

टोकियो पॅरालिम्पिक 2020 मध्ये भारतीय संघाने आतापर्यंत एकूण 18 पदकं जिंकली आहेत. भारताने आतापर्यंत चार सुवर्ण, आठ रौप्य आणि सहा कांस्यपदके जिंकली आहेत. पॅरालिम्पिक खेळांच्या इतिहासातील भारताची ही सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचबरोबर भारत गुणतालिकेत 26 व्या स्थानावर आहे.

एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकांची कमाई 
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारताची नेमबाज अवनी लेखरा हिने 10 मीटर एअर रायफल एसएच 1 या स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं आहे. त्याचसोबत पॅरालिम्पिकमध्ये भारताला सुवर्णपदक मिळवून देणारी अवनी ही पहिली खेळाडू ठरली.  त्यानंतर शुक्रवारी अवनीने 50 मीटर राइफल थ्री पोजिशन स्पर्धेत कांस्यपदकावर नाव कोरलं. एकाच पॅरालिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी अवनी ही एकमेव भारतीय खेळाडू आहे. 

कोण आहे अवनी लेखरा? 
भारतीय नेमेबाज अवनी लेखरा ही मूळची राजस्थानातील जयपूरची राहणारी आहे. 2012 मध्ये अवनी आपल्या वडिलांसोबत जयपूरच्या धौलपूरला जात होती. त्यावेळी रस्त्यात तिच्या गाडीला अपघात झाला. या अपघातात अवनी  आणि तिचे वडील प्रवीण लेखरा दोघांनाही गंभीर दुखापत झाली. प्रवीण लेखरा यातून बरे झाले. अवनीला मात्र या अपघातात अपंगत्व आलं. 

अपघातामुळं अवनी पुन्हा कधीच स्वतःच्या पायावर उभी राहू शकणार नव्हती. त्यावेळी ती अत्यंत निराश झाली, तिनं स्वतःला एका खोलीत बंद केलं. या काळात तिनं अभिनव बिन्द्राचं आत्मचरित्र वाचलं. त्यामुळे तिला प्रेरणा मिळाली आणि तिनं नेमबाजीत आपलं करिअर करण्याचा निश्चय केला.

अवनीनं आपल्या घराजवळच्या शूटिंग रेंजवर आपला सराव सुरु केला. यामध्ये अवनीला तिच्या प्रशिक्षकांनी खूप साथ दिली. त्यांच्या मार्गदर्शनाखील अवनीनं आपला सराव पूर्ण केला आणि आज सुवर्णपदकासह कास्यपदकावरही आपलं नाव कोरलं. 

About the author

वेब डेस्क महाराष्ट्र माझा वेब डेस्क महाराष्ट्र माझा

Leave a Reply

Leave a Comment