कोल्हापूर – क्षयरोग हा जगातून समूळ नष्ट करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटनेच्या सहकार्याने विविध रणनिती आखली जात आहे. या वर्षी राज्यातून कोल्हापूर जिल्ह्याचे गोल्ड सबनॅशनल सर्टीफीकेशन २०२२ साठी नामांकन झाले आहे. दिनांक २३ डिसेंबर २०२२ ते २२ जानेवारी २०२३ दरम्यान जिल्ह्यातील १० गावामध्ये सर्वेक्षण पडताळणी होणार असून सर्वेक्षणाची सुरुवात सुळकुड येथून झाली आहे. या सर्वेक्षणासाठी घरी येणा-या स्वंयसेवकास योग्य ती माहिती देऊन सहकार्य करावे, असे आवाहन आरोग्य उपसंचालक डॉ. प्रेमचंद कांबळे यांनी केले.
सबनॅशनल सर्टीफीकेशन सर्वेक्षणाच्या उद्घाटन प्रसंगी अध्यक्षीय भाषणात ते बोलत होते. या वेळी जागतिक आरोग्य सल्लागार डॉ. योगेश वडगावे, डॉ. चेतन हांडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत शिंदे, सूळकुडचे सरपंच सुप्रिया भोसले, उपसरपंच शरद धळूगुडे, ग्रामविकास अधिकारी नीलकंठ चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ.विनायक भोई, डॉ.पी.एस.शिंदे, बाजीराव चौगले आदीजण उपस्थित होते.
उपसंचालक डॉ.प्रेमचंद कांबळे म्हणाले, क्षयरोग या आजारामूळे सामाजिक, आर्थिक नुकसान होते. हा आजार समूळ नष्ट करणे गरजेचे आहे. आजार सकस आहार व योग्य औषधोपचाराने पूर्णपणे बरा होतो. प्रधानमंत्री टी. बी. मुक्त भारत अभियान (निक्षय मित्र) अंतर्गत संस्था, उद्योग समूह, व्यक्ती,यांनी सामाजिक भावनेतून आपल्या तालुक्यातील किंवा कार्यक्षेत्रातील संमती दिलेल्या क्षयरुग्णांना पोषण आहार स्वरुपात मदत देऊन किमान एक वर्षासाठी दत्तक घेण्याचे आवाहनही त्यांनी केले.
जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. उषा जी.कुंभार यांनी प्रास्तविक भाषणात सबनॅशनल सर्टीफीकेशन विषयी माहिती दिली. सन २०२० मध्ये कोल्हापूर ग्रामीणला सिल्वर पदक व सर्टीफीकेशन मिळाले आहे. या वर्षी गोल्डसाठी केंद्रीय क्षयरोग विभाग व राज्यस्तरीय विभागाद्वारे सुळकुड, कुरुंदवाड, शहापूर,अमेनी,बोलावी,आकुर्डे, शिपूर, वैतागवाडी, महाडीक वसाहत, ट्रेंजरी ऑफिस या १० निवडलेल्या गावे/वॉर्डचे सर्वेक्षण होणार आहे. २०१५ ते २०२२ पर्यंतची रुग्ण माहिती व पडताळणी,खाजगी टी.बी. विरोधी औषधे विक्री पडताळणी, शासकीय टी.बी. विरोधी औषधे वितरण इत्यादी पडताळणी करण्यात येणार आहे. पडताळणी नंतर २०१५ च्या बेसलाईन नुसार ६०% रुग्ण संख्येत घट दिसुन आल्यास गोल्ड पदक व सर्टीफीकेशन कोल्हापुर जिल्ह्यास मिळू शकते अशी माहिती त्यांनी दिली.
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संजय डी. रणवीर म्हणाले, राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत भारत सरकारने 2025 पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचे महत्वाकांक्षी धोरण निश्चित केलेले आहे. सबनॅशनल सर्टीफीकेशन च्या पडताळणी नंतर कोल्हापुर जिल्ह्यास गोल्ड पदक व सबनॅशनल सर्टीफीकेशन फॉर टीबी एलीनिमेशन मिळेल अशी अशा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी शालेय विद्यार्थी यांनी समूहगीत सादर केले. ऊपस्थित लोकांना क्षयरोग जनजागरणपर माहिती पट दाखविण्यात आला. सूत्रसंचालन सी.पी.शिंदे यांनी केले. आभार दादासो चवई यांनी मांडले. या वेळी सदस्य दादासो चवई,सुरेश घाटे,सदस्या अर्चना परीट,डॉ.काकासो खोत,डॉ.चंद्रकांत हेरवाडे, डॉ.पी.आर.पाटील,डॉ. राजेद्र पाटील.डॉ.माने, डॉ.पाटील,दयानंद स्वामी,कुमार पाटील, सी.पी.शिंदे,मनिष परदेशी,सचिन जाधव, महेश पाटोळे, शिवानंद कोरबू, विनोद नायडु, एकनाथ पाटील, गटपर्वतक, आशा स्वंयंसेविका, शालेय विद्यार्थी, ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.