पुणे – राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याच्या निषेध नोंदविण्यासाठी आणि राज्यपालांना पदमुक्त करा या मागणीसाठी आज पुण्यात बंड पुकारण्यात आला होता. याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. सकाळी १० वाजता डेक्कन येथील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून मूक मोर्चाला सुरवात झाली. या मोर्चामध्ये खासदार उदयनराजे भोसले, सुषमा अंधारे यांच्यासह अनेक नेते सहभागी झाले होते.
मूक मोर्चा झाल्यानंतर लालमहाल चौकात सभा झाली. मात्र संपूर्ण मूक मोर्चात चालणारे उदयनराजे हे सभेच्या मंचावर उपस्थित नसल्याने चर्चेला उधाण आले आहे. यावरूनच सुषमा अंधारे यांनी उदयनराजे यांना जोरदार टोला लगावला आहे. “मला असं वाटत उदयनराजेंना बोलण्यापेक्षा कृती महत्वाची वाटली असेल. कदाचित त्यांनी लालमहालात विचार केला असेल की भाजप आपण इतक्या वेळा बोलून देखील आपल्याला जुमानत नाही. त्यामुळे आपण भाजप विरोधी ठोस कृती म्हणून खासदारकीचा राजीनामा द्यावा. आणि त्यासाठी ते गेले असतील.” असा टोला सुषमा अंधारे यांनी लगावला आहे.
तर दुसरीकडे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे पुण्यात असून देखील मोर्चामध्ये सहभागी झाले नाहीत. यावरून देखील सुषमा अंधारे यांनी राज ठाकरेंना टोला लगावला आहे. “छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल मंचावरून बोलणं आणि सोयीस्कर राजकारण करत त्याला बगल देणं वेगळं. ज्यांना छत्रपती शिवरायांबद्दल मान, सन्मान, अभिमान अस्मिता आहे तो प्रत्येक वर्ग इथे एकवटलेला आहे. ज्यांना सोयीस्कर हितसंबंध जोपासत राजकारण करायचं आहे ते अनुपस्थित राहिले.” असा घणाघात सुषमा अंधारे यांनी राज ठाकरे यांच्यावर केला आहे.